Leading International Marathi News Daily

सोमवार , १६ मार्च २००९

अखिल भारतीय धम्म सेनेच्या वतीने रविवारी व्हरायटी चौकातील गांधी पुतळ्याजवळ शेकडो अनुयायांच्या उपस्थितीत बौद्ध धर्मगुरू भदंत सुरेई ससाई यांच्या हस्ते सांकेतिक पद्धतीने गांधीजींना पुणे कराराचे दस्तावेज परत करण्यात आले.

महापालिकेकडून २११ भूखंड जप्त
कर न भरल्याने कारवाई

नागपूर, १५ मार्च/ प्रतिनिधी

१५ दिवसात ३० कोटी रुपये कर वसुलीचे आदेश महापालिकेचे आयुक्त असीम गुप्ता यांनी दिल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून सुटीच्या दिवशीही विभागीय कार्यालयांतर्फे कर वसुलीवर भर देण्यात आला आहे. आज धरमपेठ विभागीय कार्यालयाने विशेष मोहिमेंतर्गत थकित करापोटी २११ भूखंड जप्त केले.

उत्सवांचे विद्रूपीकरण थांबवा
चंद्रकांत ढाकुलकर

माणसाच्या प्रगतीसोबतच त्याचे बौद्धिक, सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनही प्रगत होत गेलेले दिसते. जीवनाच्या याच अभिसरणातून त्याच्या सार्वजनिक जीवनाला व्यापून राहिलेले उत्सव आणि सणवारही आकारत गेले. एकेकटय़ात विखुरलेला माणूस पुढे कुटुंब आणि या उत्सवांच्या निमित्ताने अधिकाधिक समाजाभिमुख होत गेलेला दिसतो.

मिनरल वॉटरला पहिली पसंती
नागपूर, १५ मार्च / प्रतिनिधी

उन्हाच्या काहिली पाठोपाठच पाण्याची टंचाई निर्माण होत असते. उन्हात हॉटेलमध्ये किंवा बाहेर कुठे गेलो की पाणी विकत घेऊन पिण्याशिवाय पर्याय नसतो. ‘मिनरल वॉटर’च्या नावाखाली सध्या विकल्या जाणाऱ्या बाटलीबंद पाण्याचा तडाखेबंद खप चालू आहे. ‘पाण्याचा पैसा करण्या’चा हा उद्योग फोफावला आहे.
निसर्गाने वरदहस्त ठेवल्याने कुठे धो-धो पाणी आहे, तर कुठे त्याच्या अवकृपेने कायम पाणीटंचाई.फार पूर्वी पाण्याला मोल नव्हते. मात्र गेल्या काही वर्षांत पाणी अनमोल झाले आहे. धरणे-तलावातून साठविलेल्या पाण्याचा पैसा शासन शेतकरी व सर्वसामान्यांकडून वसूल करू लागले.

शहर बस वाहतूक नियंत्रणासाठी नागपूर महापालिकेचा विभागच नाही
नागपूर, १५ मार्च/ प्रतिनिधी

शहर बस वाहतुकीच्या संपूर्ण नियंत्रणाची जबाबदारी असून देखील महापालिकेने अद्याप शहर बस वाहतूक नियंत्रण विभाग स्थापन केलेला नाही.
महापालिका आणि स्टार बस व्यवस्थापन यांच्यातील करारानुसार बसची देखभाल दुरुस्ती वगळता वाहतुकीवरील नियंत्रण तसेच कराराचे पालन होत असल्याची खात्रीजमा महापालिकेला करावायची आहे. परंतु, त्यासाठी काही ठोस पावले न उचलता, मोजक्या बस संख्येवर संपूर्ण शहराची वाहतूक स्टार बस व्यवस्थापनाच्या हाती सोपण्याचा निर्णय घेण्यात आला.

बोईंगची पायाभरणी मान्सूननंतर -डॉ. केसकर
हँगर्स व इमारतीचा आराखडा तयार

नागपूर, १५ मार्च/प्रतिनिधी

बोईंगच्या देखभाल दुरुस्ती प्रकल्पाचा आराखडा तयार असून यासंदर्भात कंपनीची भागीदार एअर इंडियाशी बोलणी झाली आहे. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे प्रकल्पाचा पायाभरणी समारंभ मान्सूननंतरच होणार असल्याची माहिती बोईंग इंडियाचे अध्यक्ष व बोईंग इंटरनॅशनलचे उपाध्यक्ष डॉ. दिनेश केसकर यांनी आज येथे दिली.

संत गाडगेबाबा जयंती व महिला दिन
नागपूर, १५ मार्च / प्रतिनिधी

राष्ट्रसंत गाडगेबाबा बहुउद्देशीय जनसेवा संस्थेतर्फे काटोल येथील परमहंस पुंडलिक महाराज देवस्थान येथे कर्मयोगी संत गाडगेबाबा यांचा जयंती महोत्सव व जागतिक महिला दिन पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काटोल नगरपरिषदेचे उपाध्यक्ष चरणसिंग ठाकूर होते. प्रा. अजय खडसे, संजय भिलकर, परीक्षित चिलाये, संदीप खेडकर, मनीष वानखेडे, मोरेश्वर नांदेकर, डॉ. अनिल गवळी, श्यामराव मदनकर, अरुणराज मोतीकर, सुधाकर वावरकर, विद्या दोडके, प्रतिभा गवळी प्रामुख्याने उपस्थित होत्या. चरणसिंग ठाकूर यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. समाजाच्या विकासासाठी महिलांनी एकत्रित येणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. प्रा. अजय खडसे व अनिल गवळी यांनी गाडगे महाराजांचे कार्य व स्वच्छता अभियानावर माहिती दिली. संस्थेचे संस्थापक अरुणराज मोतीकर यांनी समाजाची दशा आणि दिशा यावर भाष्य केले. विद्या दोडके यांनी महिलांच्या सामाजिक स्थितीवर प्रकाश टाकला. संत गाडगे महाराजांचे स्मारक काटोल येथे उभारण्यासाठी संस्थेतर्फे चरणसिंग ठाकूर यांच्याकडे मागणी करण्यात आली. कार्यक्रमाचे औचित्य साधून संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुधाकर वावरकर व महिला अध्यक्ष विद्या दोडके यांचा चरणसिंग ठाकूर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. संचालन माधुरी शिरपूरकर यांनी केले. सुरेखा शिरपूरकर यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.

स्वाती काळे यांना ‘उत्कृष्ट कार्यकर्ता’ पुरस्कार
नागपूर, १५ मार्च/ प्रतिनिधी

राजपत्रित अधिकारी महासंघाच्या तेविसाव्या वर्धापन दिन कार्यक्रमात स्वाती मकरंद काळे यांना सरकारी सेवेतील उल्लेखनीय कामाबद्दल २००८ सालचा ‘उत्कृष्ट कार्यकर्ता’ पुरस्कार देण्यात आला. स्वाती काळे यांनी राज्याचे सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हातून हा पुरस्कार स्वीकारला. सौ. स्वाती कोलारकर- काळे या राज्य सरकारच्या वित्त व लेखा विभागात वर्ग १ अधिकारी म्हणून १९९३ साली रुजू झाल्या. सध्या त्या मुंबईत विक्रीकर उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. ‘टॅक्सबीट्स-गंधाली’या मासिकाचे त्यांनी सात वर्षे संपादन केले असून, सध्या ‘विक्रीकर दर्पण’ या मासिकाच्या त्या मुख्य संपादक आहेत. २००५ ते २००७ या काळात महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी संघटनेच्या त्या सदस्य होत्या. कार्यालयीन कामाव्यतिरिक्त व्हॉईस मॉडय़ुलेशनचा व्यावसायिक अभ्यासक्रम आणि झी टीव्हीचा स्क्रिप्ट रायटिंगचा व्यावसायिक अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला आहे. सध्या त्या राजकीय क्षेत्रातील स्त्रियांवर संशोधन करत आहेत. नागपूर येथील इतिहास संशोधक डॉ. श.गो. कोलारकर व सौ. शकुंतला कोलारकर यांच्या त्या कन्या आहेत. त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही पत्र पाठवून त्यांचे अभिनंदन केले आहे.

‘क’ संवर्गातील पदभरतीची प्रात्यक्षिक परीक्षा २१ मार्चला
नागपूर, १५ मार्च / प्रतिनिधी

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयातर्फे नागपूर विभागातंर्गत गट ‘क’ संवर्गातील पदभरती संदर्भात १ मार्चला घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची पदनिहाय यादी प्रादेशिक कार्यालयात सूचना फलकावर लावण्यात आली आहे. प्रात्याक्षिक २१ व २२ मार्चला होणार असून मुलाखती २३ ते २६ मार्च या कालावधीत होणार आहे. सर्व उमेदवारांना प्रात्याक्षिक परीक्षेसाठी व मुलाखतीसाठी पत्र पाठविण्यात आले आहे. ज्या उमेदवारांना पत्र मिळणार नाहीत त्यांनी परीक्षा व मुलाखतीसाठी नियोजित ठिकाणी पोहचावे, असे आवाहन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयाचे सहसंचालक एस.एम. हस्ते यांनी केले.

सिकलसेल ओळखपत्र शिबीर २७ मार्चला
नागपूर, १५ मार्च / प्रतिनिधी

सिकलसेल सोसायटी ऑफ इंडियातर्फे २७ मार्चला सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत महाराजबाग येथे ‘सिकलसेल ओळखपत्र’ शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात शक्यतोवर सिकलसेल रुग्णाला आणू नये. येताना रुग्णाचे पासपोर्ट आकाराचे चार रंगीत फोटो, एस.एस. पॅटर्न अहवालाच्या चार झेराक्स प्रती, २५ रुपयाची पोस्टाची तिकीट, पाणी, पेन व जेवनाचा डबा सोबत आणावा. सिकलसेल ओळखपत्र असल्यास रुग्णाला कोणत्याही शासकीय रुग्णालयात नि:शुल्क रक्त व औषधोपचार मिळतो. सिकलसेल नियंत्रण केंद्राच्या मदतीने हे ओळखपत्र शिबीर आयोजित करण्यात आले आहे. ज्यांना सिकलसेल आहे व अद्यापपर्यंत ओळखपत्र तयार केले नाही, त्यांनी ओळखपत्र तयार करून घेण्याचे आवाहन सोसायटीतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी सोसायटीचे अध्यक्ष संपत रामटेके (९४२२८२२२८७) व सचिव संजीव गजभिये (९४२२८०८६२९) यांच्याशी संपर्क साधावा.

जवाहरनगरात पाण्याची पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू
नागपूर, १५ मार्च / प्रतिनिधी

मानेवाडा मार्गावरील जवाहरनगर परिसरात ३५ लाख रुपये खर्च करून पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन टाकण्यात येत आहे. या कामाचा शुभारंभ सुधार प्रन्यासचे माजी विश्वस्त व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव प्रमोद दरणे यांच्या हस्ते नुकताच पार पडला. या पाईप लाईनमुळे जवाहरनगर, खानखोजेनगर व जुना सुभेदार ले-आऊटमधील काही भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होणार असल्याची माहिती महापालिकेचे कार्यकारी अभियंता शशिकांत हस्तक यांनी याप्रसंगी दिली. यावेळी नगरसेवक अशोक काटले, टी.आर. शिंदे, सुरेश भांडारकर, रहाटे गुरुजी, पप्पुसिंग ठाकूर, अभय गोटेकर, नितीन किनगावकर, जवाहर काळे, राजेश दारोकर, शेखर राहुळकर, रमेश बरबटे, संजय पांडे, राजू राणेकर, पालुसिंग ठाकूर प्रामुख्याने उपस्थित होते.

सावरगावात गळाची यात्रा
नरखेड, १५ मार्च / वार्ताहर

सावरगाव येथे दरवर्षी प्रमाणे धुलीवंदनच्या पर्वावर गळाची यात्रा उत्साहात पार पडली. हजारो भाविकांनी मेघराज देवाजींची पूजा करून दर्शन घेतले. मालगुजारी काळापासून ही प्रथा सुरू आहे. माजी आमदार सुनील शिंदे यांच्या घरून ‘गळी’ लागणारा व्यक्ती व गावातील प्रतिष्ठित नागरिक वाजत गाजत गळाचे यात्रेत आले. काही वेळ बैठक होऊन गळी लागणारा रामदास मारुती वाघे यांना धोतर, दुपट्टा व कापड नारळ याचा अहेर देऊन गळी लावली गेली. वीसफूट उंचीच्या लोखंडी खांबावर आडवा दंडा बॉलबेरींगने फीट केला आहे. त्याचे एका बाजूने तरंगता बाधला जातो. त्यावेळेस भवानी माता अंगात संचारते आडव्या दंडय़ाला दोन्ही टोकाला दोर बांधून पाच फेरे मारतात. त्याच्या एका हातात नारळ व दुसऱ्या हातात मोर पंखाचा गुछा असतो. अर्धे फेरे मारताच उत्तर दिशेने हातातील नारळ फेकतो ते झेलण्यासाठी लोक टपून असतात. गळाची व्यवस्था भोजराज बालपांडे यांनी केली. मधू गजभिये, ईश्वर रेवतकर, गणेश रेवतकर, हेमराज मेटांगळे यावेळी उपस्थित होते.

शताब्दी चौकाचे लवकरच सौंदर्यीकरण
आमदार पडोळेंचे आश्वासन
नागपूर, १५ मार्च / प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी चौकाचे सौंदर्यीकरण व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा लवकरच बसवण्यात येईल, असे आश्वासन आमदार दीनानाथ पडोळे यांनी दिले.
आमदार दीनानाथ पडोळे यांनी शताब्दी चौकाची नुकतीच पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापालिकेचे अधिकारी कराडे, माजी विरोधी पक्षनेते राजू बहादुरे, नगरसेवक सुभाष भोयर उपस्थित होते. नागरिक संघर्ष समितीतर्फे काही दिवसांपूर्वी शताब्दी चौकात स्थायी समितीचे अध्यक्ष कृष्णा खोपडे यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तेव्हा त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी चौकाचे सौंदर्यीकरण व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्याचे तसेच त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्याचे आश्वासन दिले होते. अर्थसंकल्पात तरतूद करून त्यांनी हे आश्वासन पूर्ण केले. परंतु कामाला अद्यापही सुरुवात झाली नसल्याचे पडोळे यांच्या लक्षात आणून देण्यात आले. या कामाची लवकरात लवकर सुरुवात करावी, अशी मागणी याप्रसंगी करण्यात आली. यावेळी महेंद्र वासनिक, सतीश कांबळे, घनश्याम बुटले, सुनील कांबळे व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

गाळेधारकांना विक्रीपत्र करून देण्याचे म्हाडाचे आश्वासन
नागपूर, १५ मार्च/प्रतिनिधी

त्रिमूर्तीनगर येथील म्हाडाच्या वसाहतीच्या २८० एमआयजी गाळेधारकांना विक्रीपत्र करून देण्याचे आश्वासन म्हाडाच्या मुख्याधिकाऱ्यांनी दिल्याचा दावा गाळेधारक गृहनिर्माण सहकारी संस्थेने केला आहे. गाळेधारकाचे शिष्टमंडळ सोमवारी मुख्याधिकाऱ्यांना भेटले. त्रिमूर्तीनगर येथील म्हाडाच्या वसाहतीतील २८० गाळेधारकांना २३ वर्षांंपासून विक्रीपत्र करून देण्यात आले नाही, याकडे त्यांचे लक्ष वेधले. येत्या गुडी पाडव्याच्या पूर्वी गाळ्यांची विक्री करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याचे संस्थेच्या सचिवांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे. शिष्टमंडळात सुरेश बोपर्डीकर, मधुकर चकोले, श्रीमती नरांजे, जयगोपाल हरडे, डॉ. अडावदकर, मुकुंद महाजन उपस्थित होते.

शहर काँग्रेस सेवादलचा ईद आणि होळी मिलन
नागपूर, १५ मार्च/ प्रतिनिधी

नागपूर शहर काँग्रेस सेवादलच्या वतीने ईद आणि होळी मिलन समारंभ देवडिया काँग्रेस भवनात उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्य संघटक रामगोविंद खोब्रागडे होते. यावेळी आमदार दीनानाथ पडोळे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष जयप्रकाश गुप्ता, राष्ट्रीय युवा फ्रन्टचे अध्यक्ष पिंटू बागडी, दलित बहुजन मंचचे अध्यक्ष राजू बाराहाते, डॉ. गजराज हटेवार, तुफैल असहर, विक्रम संतोषवार, हरीष खंडाईत, प्रदेश सेवादलचे शांतीलाल गांधी, सुलभा नागपूरकर, स्मिता कुंभारे, उमा शेराम, ईसहाक कप्तान अंसारी, कामगार नेता पुष्पा सुरडकर, फातमा कौसर आदी मंडळी उपस्थित होती. पाहुण्यांचे स्वागत गुलाल, फूल आणि मिठाई वाटून करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार दीनानाथ पडोळे यांनी रामगोविंद खोब्रागडे यांच्या कुशल संघटन कौशल्यांची प्रशंसा केली. आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्ष निश्चितच विजयी होणार आहे. त्यासाठी सेवादलच्या सर्व कार्यकर्त्यांनी घरोघरी विकास कामांची माहिती द्यावी, असे आवाहन रमेश गुप्ता यांनी केले. खोब्रागडे यांनी सर्वांना ईद आणि होळीच्या शुभेच्छा देऊन निवडणुकीतील विजयासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक बबन दुरुगकर यांनी केले. संचालन रमेश नांदे यांनी केले. तर आभार सुभाष साधनकर यांनी मानले.

परिचारिका व इतर शाखेच्या विद्यार्थिनींसाठी पतंजली योग संस्थेचे शिबीर
नागपूर, १५ मार्च/ प्रतिनिधी

मातृसेवा संघाच्या परिचारिका व प्रशिक्षणार्थी व इतर शाखेच्या विद्यार्थिनींसाठी रामदेवबाबा प्रणीत पतंजली योग संस्थेचे शिबीर आयोजित करण्यात आले होते. ज्योती संजय गर्गे यांनी विद्यार्थिनींना योगाचे धडे दिले. शिबिराचा समारोप मातृसेवा संघाच्या सभासद ममता चिंचवडकर, श्रीमती पैठणकर. ज्येष्ठ आहार तज्ज्ञ डॉ. जयश्री पेंढारकर उपस्थित होत्या. योग शिबिरामुळे विद्यार्थिनींना मनशांतीचे धडे मिळाले. याचा त्यांच्या पुढील जीवनात लाभ होईल, असा आशावाद ममता चिंचवडकर यांनी व्यक्त केला. यावेळी डॉ. पेंढारकर यांचेही भाषण झाले. कार्यक्रमाचे संचालन मीनू बन्सोड हिने केले.

भिडे कन्या शाळेच्या मुलींनी तयार केले नैसर्गिक रंग
नागपूर, १५ मार्च / प्रतिनिधी

राष्ट्रीय हरितसेनेच्या ‘खेलो होली, इको फ्रेंडली’ या अभियानातंर्गत भिडे कन्या शाळेच्या परिमल इको क्लबच्या विद्यार्थिनींनी पळस, बीट व विविध रंगीत फुले व पानापासून रंग तयार केले.
राष्ट्रीय हरित सेनेच्या समन्वयक डॉ. मंगला गावंडे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थिनींनी रासायानिक रंगांएवजी नैसर्गिक रंगांचा उपयोग करावा, असे आवाहन केले. सर्व शिक्षा अभियानातंर्गत विदेशी भाषा केंद्रात महापालिकेच्या शिक्षिकांना या विद्यार्थिनींनी नैसर्गिक रंग तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. विद्यार्थिनींनी शाळेच्या समोर नैसगिंक रंगांचा स्टॉल लावून रंगाची विक्री केली असून त्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. शाळेच्या मुख्यध्यापिका डॉ. पल्लवी देशपांडे यांनी विद्यार्थिनींना प्रोत्साहन दिले.

प्रहारमधील शिक्षण भविष्यात उपयोगी पडणारे -मेजर जनरल पित्रे
नागपूर, १५ मार्च / प्रतिनिधी

सी.पी. अ‍ॅन्ड बेरार एज्युकेशन सोसायटी संचालित प्रहार या संघटनेत नुकतीच मेजर जनरल शशिकांत पित्रे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी चर्चा केली. शाळेच्या परिसराचे अवलोकन करताना शाळेचे ग्रंथालय, कला कक्ष, विज्ञान प्रयोगशाळा, संगणक, भोजन कक्ष, शूटिंग रेंज विभागात भेट दिली. प्रहारमध्ये विद्यार्थ्यांना मिळणारे शिक्षण त्यांना भविष्यात उपयोगी पडणार असून त्यांनी त्यांचा फायदा करून घ्यावा, असे आवाहन शशिकांत पित्रे यांनी केले. शालेय अभ्यासक्रमाबरोबर मुलांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले. कर्नल सुनील देशपांडे यांनी पित्रे यांना प्रहारसंबंधी माहिती दिली. प्रारंभी विद्यार्थ्यांनी मेजर जनरल शशिकांत पित्रे व श्रीमती पित्रे यांचे स्वागत केले. याप्रसंगी नौसेनेचे सरखेल हे अ‍ॅडमिरल भास्कर सोमन लिखित पुस्तक प्रहार विद्यालयाला भेट दिले. कार्यक्रमाला शमा देशपांडे, भारती पेंडके व प्रहार विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती टोंगो उपस्थित होत्या.

आजाराला कंटाळून आत्महत्या
नागपूर, १५ मार्च / प्रतिनिधी

गोपालनगरातील उस्मान लेआऊटमध्ये राहणाऱ्या धनंजय विठ्ठल देवघरे यांचा घरी सकाळी गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह सापडला. छताच्या हुकाला ओढणीने गळफास होता. प्रतापनगर पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. ‘जीवनाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे’ लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली. रामेश्वरी मार्गावरील त्रिशरण चौकाजवळील एका विहिरीत रविवारी सकाळी एका महिलेने उडी घेतल्याने त्या परिसरात खळबळ उडाली. या महिलेला कुणीतरी उडी घेताना पाहिले. नागरिकांनी पोलीस व अग्मिशमन दलाला कळवले. अजनी पोलीस तसेच अग्निशमन दलाचे जवान तेथे पोहोचले. बऱ्याच वेळाने त्या महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. जयभीम बौद्ध विहाराजवळ राहणाऱ्या चंद्रकला कृष्णा नागदिवे या वृद्ध महिलेचा हा मृतदेह असल्याचे नागरिकांनी ओळखले. अनेक दिवसांपासून ती आजारी असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

पेट्रोल विक्रीची रक्कम घेऊन नोकर फरार
नागपूर, १५ मार्च / प्रतिनिधी

पेट्रोल विक्रीची रक्कम घेऊन नोकर फरार झाल्याची तक्रार पंप मालकाने िहगणा पोलिसांकडे केली. वर्धा मार्गावर जामठा येथे मॉडर्न सव्‍‌र्हिस स्टेशन नावाचा पेट्रोल पंप आहे. तेथे दिनेशकुमार लालमन तिवारी हा नऊ वर्षांपासून नोकर होता. ४ मार्चला त्याने ४ लाख ३३ हजार ९४४ रुपये मालकाकडे जमा केले नाही. शहरातून येतो, असे सांगून तो फरार झाल्याची तक्रार मालकाने केली. िहगणा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

दोन मुलींचा जळाल्याने मृत्यू
नागपूर, १५ मार्च / प्रतिनिधी

ग्रामीण भागात दोन मुलींचा जळाल्याने मृत्यू झाला. सिलेवाडा येथील गोमती असपू कश्यप हिने १३ मार्चला दुपारी एक वाजताच्या सुमारास अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. तिला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी खापरखेडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. उमरेडजवळील सेव येथील कोमल अनिल वाकडे ही १३ मार्चला सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास चुलीवर स्वयंपाक करीत असताना चुलीचा भडका उडून ती पेटली. तिला मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी उमरेड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
कार्पोरेशन कॉलनीत कार जळाली कार्पोरेशन कॉलनीत घरासमोर उभी असलेली कार रविवारी सकाळी जळालेली आढळली. श्रीकांत दिनेश दुबे यांनी त्यांची होंडा सिटी कार (एमएच ३१ सीएस ८९५) काल रात्री घरासमोर उभी ठेवली. आज सकाळी त्यांना ती जळालेली दिसली. अंबाझरी पोलिसांकडे या प्रकाराची तक्रार करण्यात आली.