Leading International Marathi News Daily
सोमवार, १६ मार्च २००९

शो मस्ट गो ऑन..
गांगुलीने निवृत्ती घेतली. आता काय? सुरेश रैनाचा विचार करा. सचिनला दुखापत झाली ठीक आहे. रोहित शर्मा संघात घ्या. द्रविड खेळत नाहीय. हरकत नाही. गौतम गंभीर आहे. खेळाडू कोण याला फार महत्त्व नाही. मॅच जिंकणे महत्त्वाचे. The show must go on. cricket must go on.
शेअर बाजारातही हेच आहे. market must go on निर्देशांक २१००० असो १५००० असो वा ८००० असो. अ‍ॅबन ऑफ शोअर चालत नाहीय, टाटा स्टील घसरलाय! हरकत नाही. एचडीआयएल खाली आलाय. चालायचंच. जगात मंदी असता आपणाकडे तेजी कशी असेल हा विचार करायचा, ये भी दिन जायेंगे म्हणत सन २०१० संपायची वाट बघायची. १९८३ चा वर्ल्डकप जिंकल्यावर पुन: चांगले दिवस यायला पंचवीस वर्षे जायला लागली. इथं तर दीड-दोन वर्षांचा प्रश्न आहे.
एकदा का या निवडणुका पार पडल्या की येणाऱ्या शासनाला उसंत मिळेल. नवीन सुधारणा अनिवार्य ठरतील. औद्योगिक उत्पादनात वाढ होईल अशी पावले टाकावी लागतील. अमेरिकेतही मंदी ओसरू लागेल, आणि पुन: सर्वच राष्ट्रांना अर्थव्यवस्थेला गती द्यावी लागेल. २०१२ सालच्या ऑलिंपिक्सचा खर्च २०१० पासून वेग घेईल. पोलादाची मागणी वाढेल. पुन: कोरसचे चक्र फिरायला लागेल

 

आणि भारतही टाटा स्टीलबाबत अपवाद असणार नाही.
पण हे सर्व स्वप्नरंजन राहायचे नसेल तर शासनाला व रिझव्‍‌र्ह बँकेला नीरोसारखे फिडल वाजवून चालणार नाही. बँकांनी अनार्जित कर्जाचा बागुलबोवा उभा केला तरी स्वस्त दराने योग्य कर्जदाराला करावाच लागेल. इन्फ्रास्ट्रक्चरलमधले प्रकल्प सुरू करण्यासाठी, अमेरिकेप्रमाणे मोठय़ा बांधकाम कंपन्यांना भांडवल पुरवावेच लागेल. तोवर निवेशकांनी धीर धरायला हवा. अर्थव्यवस्था सन २०१० च्या अखेरीस सुधारेल याचा अर्थ तोवर काहीच होणार नाही असे नाही. आजचा ८५०० च्या आसपासचा निर्देशांक २००९ अखेरीस १२००० ते १३००० पर्यंत गेला तर तो सन २०१० च्या डिसेंबपर्यंत १६००० ते १७००० होऊ शकेल. पण तरीही ही वाढ आजच्या निर्देशांकाच्या दुप्पट असणार आहे हे ध्यानात घ्यायला हवे.
आज लहान निवेशकांनी शेअर बाजारात खरेदीला न उतरणे, हे सर्वात चांगले ठरेल. ज्यांची आधीची वरच्या भावात गुंतवणूक आहे त्यांनी घाईने विक्री करणे इष्ट ठरेल. अंशत: काही कंपन्यांतून बाहेर पडायचे असेल तर defensive stocks मध्ये जिथे किं/उ गुणोत्तर कमी आहे तिथे खरेदी करणे चांगले ठरेल. बँकांमध्ये Axis Bank विचारात घेता येईल व अणुऊर्जेचे प्रकल्प लवकर सुरू होतील, हा आशावाद ABB सुद्धा लक्षणीय निवड ठरेल. भेलचा शेअर फार घसरत नाही आणि लार्सेन टुब्रो जरी ५७५ रुपयांपर्यंत आला असला तरी इंजिनिअरिंग क्षेत्रातली ती सवरेत्कृष्ट कंपनी आहे. सत्यम कॉम्प्युटरमध्ये जर लार्सेन टुब्रोने ५१ टक्के गुंतवणूक करायचे ठरवले तर तिच्या इंफोटेक व्यवसायाला आपोआप धंदा मिळेल. इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्यांमध्ये एचडीआयएल ६३ ते ६५ रुपयाला मिळत आहे. कुल्र्याला तिच्या निवेशिकांना चांगली मागणी आली आहे. त्यामुळे तिला त्यासाठी भांडवलाचा पुरवठा आपोआप होईल. टीडीआरच्या विक्रीसाठी तिला खूप स्क्वेअरफूट जागा उपलब्ध आहे आणि कमी भावाने विक्री झाली तरी मार्च ०९ च्या तिमाहीसाठीचे उपार्ज निदान पाच रुपये व्हावे.
शेअर्सच्या भावात वाढ होण्यासाठी आता मार्च तिमाही आकडय़ांचा चाप (Trigger) सुटायला हवा. ते आकडे एप्रिलअखेर मिळतील. त्यामुळे मेमध्ये शेअर बाजार बरा चालेल. निवडणुकांचे निकालही १६ मे रोजी लागतील. कुठल्याही एका पक्षाला २०० पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत हे स्पष्ट आहे. तेव्हा प्रादेशिक पक्षांच्या कुबडय़ा घ्याव्याच लागतील व त्या घेऊन संपुआचे विद्यमान सरकारच बहुधा नव्या अवतारात वाटचाल करील, पण या सर्व संभवनीय गोष्टी आहेत. तिसऱ्या आघाडीलाही १५०च्या वर जागा मिळाल्या तर अनेकांची महत्त्वाकांक्षा जागृत होईल पण तसे घडणे जरा कठीण दिसते.
अ‍ॅक्सिस बँकेचा भाव सध्या खूपच कमी आहे. मार्च ०८ वर्षांचे तिचे शेअरगणिक उपार्जन २९ रुपये होते. मार्च ०९ वर्षांसाठी ते ४५ ते ४८ रुपये व्हावे. मार्च १० व मार्च ०११ या वर्षांसाठी त्यात २० टक्के वाढ व्हावी. त्यामुळे मे ०१० पर्यंत म्हणजे सव्वा वर्षांत अ‍ॅक्सिस बँकेचा शेअर सध्याच्या २८० रुपयांवरून ४४० रुपयांपर्यंत गेला तर सध्याच्या खरेदीवर ४० ते ६० टक्के भाववाढ मिळेल.
सध्या बहुतेक शेअर्सचे भाव इतके खाली आहेत की निर्देशांकातील व निफ्टीतील शेअर्समध्ये २५ ते ४० टक्के भाववाढ सहज मिळायला हवी. अशी भाववाढ मिळणाऱ्या शेअर्सच्या यादीत एल.आय.सी. हाउसिंग, स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया, कोलगेट, रिलायन्स कम्युनिकेशन्स, सेल, एबीबी, थ्री आय इंफो, टाटा स्टील यांचा समावेश करावा लागेल. पण या शेअर्समध्ये गुंतवणूक करतानाही आजच्या परिस्थितीत तरी जोखीम आहे हे नाकारून चालणार नाही.ज्यांना जोखीम घ्यायची नसेल त्यांनी असलेले भागभांडार जरी सांभाळले तरीही सध्याच्या भावात २५ टक्के वाढ मिळेल.
शेअर बाजारात सत्यम कॉम्प्युटरचे अंतिम भवितव्य काय राहील, यावरच निर्देशांक १०००० च्या वर डिसेंबपर्यंत जाईल की नाही हे ठरणार आहे. अ‍ॅबन ऑफ शोअरचे कर्ज जरी खूप मोठे असले तरी त्याचे पुनर्गठन करण्यासाठी तिला डिसेंबर ०९ पर्यंत मुदत आहे. शिवाय मे पासून अमेरिका व युरोपमध्ये वसंत ऋतू व उन्हाळा सुरू झाला की पेट्रोलची मागणी वाढेल. सध्या बॅरलला ४५ डॉलरचा भाव आहे. तो पुन: ६५ डॉलर्सपर्यंत जाण्याची शक्यता आहे. तसा तो वर गेला तर ड्रिलिंगचा व्यवसाय पुन: तेजी पकडेल. अशा अनेक कारणांमुळे मे ते जुलै व नोव्हेंबर- डिसेंबर हे महिने निवेशकांना दिलासा देणारे ठरतील. तोवर तरी The show must go on!
वसंत पटवर्धन
फोन : ०२० २५६७०२४०