Leading International Marathi News Daily
सोमवार, १६ मार्च २००९

ग्लोबल उद्योजक
यशोगाथा

एका टिपिकल नोकरी करणाऱ्या मराठी कुटुंबातील मुलगा देश-परदेशातील प्रवासाची आवड असणारा, परदेशी जाण्याचे स्वप्न पाहणारा, सर्वसाधारण ३०-३५ वर्षांमागे हे सर्व फारच कठीण वाटत होते. माहिती-तंत्रज्ञानातील क्रांतीनंतर मराठी माणसाला नोकरीकरिता अमेरिका-युरोपची कवाडे उघडली तरीही निर्यातीच्या क्षेत्रामध्ये मराठी माणूस अभावानेच आढळत होता. उद्योगाच्या क्षेत्रामध्ये विशेषत: निर्यातीच्या क्षेत्रात काहीतरी करून दाखवायचे व साऱ्या जगात आपला भारतीय माल पोहोचला पाहिजे याची जिद्द बाळगणारे आर. बी. कन्सल्टण्टचे राजन बांदेकर यामुळेच तेजाळत आहे. औषधाचे निर्यात सल्लागार म्हणून त्यांचे नाव आदराने घेतले जाते. निर्यातीच्या नवनवीन वाटा ते सतत धुंडाळतच असतात.
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होताच त्यांनी एक्स्पोर्ट मॅनेजमेण्टचा कोर्स पूर्ण केला. सिपला, लायका, लुपीन यासारख्या प्रतिथयश कंपन्यांमध्ये नोकरी केल्यानंतर काही दुर्धर आजारामुळे साधारण वर्षभर ते या उद्योगापासून दूर राहिले. परंतु नंतर मात्र राखेतून झेप घेणाऱ्या फिनिक्स पक्ष्याप्रमाणे त्यांनी आपल्या निर्यातीच्या व्यवसायच वाढवत नेले. ३० वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत कंपनीच्या कामानिमित्त व केंद्र सरकारचा प्रतिनिधी म्हणून आजपर्यंत जवळपास १०८ देशांना भेटी दिल्या आहेत. या काळात भारतीय

 

उत्पादनासाठी नव्या बाजारपेठा शोधण्याची संधी त्यांना मिळाली. चीनसारख्या मोठय़ा देशाबरोबरच जगाच्या एका कोपऱ्यात असलेल्या निर्यातीच्या दृष्टीने दुर्लक्षित असलेल्या पापुआ न्यू गिनिया, सोलोमनसारख्या देशांमध्येही भारतीय व्यवसायाला फायदेशीर ठरू शकतील, अशा नव्या बाजारपेठा उपलब्ध असल्याचे त्यांनी शोधून काढले. भारतासारख्या पारंपरिक शत्रू राष्ट्राचा चिनी बाजारपेठेत शिरकाव अशक्यप्राय होता. रजिस्ट्रेशनची सक्ती, भाषेची अडचण यामुळे भारतीय निर्यातीला मर्यादा होत्या. मात्र या सर्व अडथळ्यांवर मात करून त्यांनी चीनमध्ये निर्यातीचे धाडस केले व आयात परवाना मिळविला. १९८७-८८ मध्ये सुरू केलेल्या या निर्यातीचा व्याप आता भारताला ५००-६०० कोटींचे परकीय चलन मिळवून देण्याइतका वाढला आहे.
बांदेकर यांच्या या कार्याचा उचीत गौरवही झाला. जागतिक बाजारपेठेत भारताची प्रतिमा उंचावल्याबद्दल व औषध उत्पादनांच्या निर्यातीत वाढ केल्याबद्दल १९९७-९८ साली ‘फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशन’तर्फे राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते ‘राष्ट्रपती पुरस्कार’ त्यांना लाभला. त्याचप्रमाणे १९९६-९७ साली व्यापार मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने देण्यात येणारा ‘त्रिशुल’ हा सर्वोच्च निर्यात पुरस्कार, १९९०-९१ साली रिझव्‍‌र्ह बँकेचे आर. एन. मल्होत्रा यांच्या हस्ते औषध निर्यातीद्वारे सर्वाधिक परकीय चलन मिळविल्याबद्दल देण्यात येणारा ‘निर्यात पुरस्कार’ त्यांच्या नावावर जमा आहेत. मुंबई विद्यापीठांतर्गत येणारी प्रसिद्ध महाविद्यालये, तसेच चेम्बर ऑफ कॉमर्स या ठिकाणी ‘इण्टरनॅशनल मार्केटिंग’ या विषयावर अनेक व्याख्यानेही त्यांनी दिली आहेत. ‘आंतरराष्ट्रीय अर्थ व आरोग्य’ विषयावरील परिसंवादात भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्वही बांदेकर यांनी केले आहे. औषधांच्या निर्यातीच्या क्षेत्रात जाणवणारी स्पर्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर जाणवते. आपल्या वस्तूंचा दर्जा टिकविणे, तसेच दिलेला शब्द पाळणे या गोष्टींचे भान ठेवणे फारच महत्त्वाचे असते. त्यावरच देशाची व्यापारातील विश्वासार्हता पणाला लागलेली असते. आपल्या व्यवसायातील अडचणी, मर्यादा याविषयी खरेदीदाराला विश्वासात घेऊन व्यवसायातील संभ्रमता टाळता येते असे त्यांचे म्हणणे आहे. निर्यातीच्या क्षेत्रात मराठी माणूस अभावानेच आढळतो. त्याचे कारण स्पष्ट करताना बांदेकर म्हणाले, की मराठी माणसांचा दृष्टिकोन तात्काळ फायदा हा असतो. त्यामुळे कर्ज काढून मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक करणे, धंद्यात धोका पत्करणे यासाठी तो सहजासहजी तयार नसतो. त्यामुळे उद्योग क्षेत्रात मागे पडत असतो. या व्यवसायात जाणवणाऱ्या अडचणींविषयी बांदेकर म्हणतात, की येणाऱ्या अडचणींना अडथळ्याचा दगड न समजला ‘स्टेपिंग स्टोन’ म्हणून मी उपयोग केला. व्यापारी निर्यातीबाबतीत गंभीर नसतात. त्यामुळे फक्त माल विकून पैसा करणे हाच हेतू ठेवतात. या व्यवसायात आपण देशाची पत पणाला लावत असतो याची जाणीव त्यांना नसते. आंतरराष्ट्रीय निर्यात व्यापारात स्वत:चे स्थान निर्माण करण्याची व देशाच्या गंगाजळीत भर टाकण्याची गरज आहे. भारत हा निर्यात क्षेत्रात जगात मागच्या स्थानावर असण्याचे हेच कारण आहे, असे त्यांना वाटते. सुदैवाने भारत सरकारचे निर्यात धोरण कमालीचे उदार आहे याचा फायदा देशभरातील निर्यातदारांनी घ्यायची गरज आहे, पण तसे होत नाही याची त्यांना खंत आहे. आज जवळपास ७ औषधी कंपन्यांना निर्यात सल्लागार म्हणून राजन बांदेकर सेवा पुरवित आहेत. भारतीय कंपन्यांची जागतिक क्षेत्रातील विश्वासार्हता टिकविण्यासाठी ते कंपन्यांची निवडही काटेकोरपणे करतात. त्यासाठी कंपनीच्या उच्च अधिकाऱ्यांना भेटणे, फॅक्टरी व्हिजिटस्, मालाचा दर्जा तपासणे या बाबतीत ते स्वत: प्रयत्नशील असतात. अशा प्रकारे सर्व मार्केटस् व्यवस्थित चालू असताना साऊथ अमेरिका हा अगदी वेगळा प्रांत त्यांनी निवडला व सध्या सल्लागार म्हणून साऊथ अमेरिकेत काम चालू आहे. भारतीय वंशाच्या व्यावसायिकाने सुरू केलेल्या औषधांच्या दुकानांच्या चेनच्या वाढीला बांदेकरांचा मोलाचा वाटा आहे. एका दुकानापासून सुरू केलेल्या दुकानांची संख्या आता शंभरच्या वर आहे. भारतीय निर्यातदार तेथे जाण्यास धजावत नाहीत. कारण भाषा व वेळेचा फरक. भारतीय निर्यातदारांकडून माल घेऊन त्याची प्रत, दर्जा पॅकिंग व किंमत पारखून उत्कृष्ट प्रतीचा माल निर्यात करण्यात जास्तीत जास्त भर असतो. त्यामुळे भारतीय मालाच्या उत्कृष्टतेची खात्री आता तेथे निर्माण झाली आहे. हा व्यवसाय बराच वाढून १० वर्षांत कंपनीची बरीच भरभराट झाली आहे. मालाबरोबरच बरेच भारतीय लोकांची वर्णी कंपनीत लागली आहे.
औषधनिर्मितीचा व्यवसाय म्हणजे माणसाच्या जीवनमरणाशी जोडला गेलेला व्यवसाय आहे. त्यामुळे मी प्रत्येक बाबतीत काटेकोर राहतो. कदाचित हेच माझ्या यशाचे गमक असेल, असे राजन बांदेकर म्हणतात, नव्याने निर्यातीच्या क्षेत्रात पदार्पण करणाऱ्यांसाठी या व्यवसायात बराच वाव असल्याचे त्यांना वाटते. ठराविक पठडीत अडकून न पडता वेगवेगळ्या नव्या वाटा शोधत राहून आत्मोन्नती करता येते व अशा नव्या वाटा धुंडाळण्याच्या उद्योगांमुळेच हा उद्योजक निर्यातीच्या क्षेत्रात पाय रोवून उभा आहे.
जयराज साळगावकर