Leading International Marathi News Daily

सोमवार , १६ मार्च २००९

साहित्य, संगीत, कला आणि तत्त्वचिंतन या क्षेत्रांतील व्यक्तींनी हिंदू-मुसलमानांच्या ऐक्याचा आपापल्या परीने प्रयत्न केला. त्यांना थोडे यशही आले, पण ते फारच अल्प म्हणावे लागेल. या ठिकाणी एका ऐतिहासिक सत्याची नोंद करणे औचित्याचे होईल. मुसलमानांपूर्वीही भारतात आक्रमक आले होते. मुसलमानांप्रमाणेच तेदेखील मध्य आशिया आणि त्यापलीकडच्या पश्चिम राष्ट्रांतून आले होते. शक, हूण, कुशाण, यहुदी अशी नावे घेता येतील. जगज्जयाची

 

महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या अलेक्झांडरच्या ग्रीक सेनेने भारतावर मोठे आक्रमण केले. हे सारे एकतर परत गेले अथवा इथल्या लोकांशी मिळून-मिसळून राहिले. कालांतराने इथलेच होऊन गेले. अशा प्रकारचा मिलाफ मुसलमान-हिंदूंचा होऊशकला नाही. सनातन वैदिक धर्मधारणांच्या तुलनेने इस्लामची तत्त्वे अगदीच नवी होती. इथले लोक बहुदेववादी, मूर्तिपूजक, तर मुसलमान एकेश्वरवादी आणि मूर्तिपूजाविरोधक. इथे संन्यस्त वृत्ती, चारित्र्याची शुद्धता, साधनशुचिता यांना महत्त्व येते, तर मुसलमान अधिक व्यवहारी होते. याचा एक परिणाम म्हणून या राजकीय सांस्कृतिक आक्रमणाच्या विरोधासाठी काही समाजपुरुष पुढे आले. भारतात इस्लामचा शिरकाव प्रथम अरब व्यापाऱ्यांमार्फत मलबार किनारपट्टीवर झाला. इ.स. ६७० ते ७१० या काळात म्हणजे इस्लाम उदयानंतर लगोलग पश्चिम आशियातून अरब धर्मप्रसारासाठी बाहेर पडले. अवघ्या चाळीस वर्षांत त्यांनी जगातील निम्म्याहून अधिक देशांत आपला शिरकाव केला. त्यांचा सर्वाधिक प्रभाव आधी स्पेन-पोर्तुगालवर झाला. पण थोडय़ाच वर्षांत तिथून त्यांचे उच्चाटन करण्यात आले. स्थानिक जनसमाजाने इस्लामशी कणखरपणे टक्कर दिली. भारतात मात्र असे होऊशकले नाही. मच्छीमारी, सागरी वाहतूक, तस्करी याबरोबरच कसाईकाम, दारूगोळा, शस्त्रास्त्रांचे काम अशा अनेक व्यवसायांत जे धाडस आणि क्रौर्य अभिप्रेत असे, ते हिंदूंपेक्षा मुसलमानांनी अधिक दाखविले. त्यांचा संघर्ष त्यांच्या पाठोपाठ व्यापारी म्हणून आलेल्या डच, फ्रेंच आणि इंग्रज यांच्याशी घडला. पण हे सारेच भारतात परके असल्यामुळे त्यांची वेळोवेळी आपापसात तडजोडही होत राहिली. मलबारमधील आरंभीचे मुसलमानी आक्रमण मुख्यत: व्यापारी होते, राजकीय नव्हते; पण त्याच सुमाराला वायव्य प्रदेशात झालेले इस्लामी हल्ले मात्र राजकीय होते. आजही पश्चिम भारताची बहुतेक किनारपट्टी मुसलमानी अधिसत्तेखाली आढळते. सिंध तर इस्लामी राष्ट्राचाच भाग आज आहे. गुजरातेतील अनेक बंदरांवर मुसलमानी हुकूमत आहे. मुंबईखाली उत्तर कोकण, दक्षिण कोकण, त्याखाली कर्नाटक-केरळचा सागरी भाग मुसलमानी वर्चस्वाचा आहे. केरळमध्ये काही भागांत तर मुसलमानांचे अधिक्यही दिसते.
अशोक कामत

सौरडाग म्हणजे काय? ते कसे निर्माण होतात?
आपला सूर्य हा वाटतो तसा पूर्णपणे एकजिनसी चकचकीत पिवळसर पांढऱ्या रंगाचा गोळा नाही. सूर्याच्या या चकचकीत दिसणाऱ्या पृष्ठभागावर काही काळय़ा रंगाचे डागही दिसतात. या काळय़ा रंगाच्या डागांना सौरडाग असे संबोधले जाते. या सौरडागांचा प्रदेश हा सूर्याच्या सर्वसाधारण पृष्ठभागापेक्षा कमी तापमानाचा असल्यामुळे तो काळसर दिसतो. सूर्याच्या सर्वसाधारण पृष्ठभागाचे तापमान सुमारे साडेपाच हजार अंश सेल्सिअस असताना या सौरडागांचे तापमान मात्र चार हजार अंश सेल्सिअसपेक्षाही कमी असल्याचे आढळले आहे. सौरडागांचे हे प्रदेश म्हणजे अत्यंत तीव्र अशी चुंबकीय क्षेत्रे आहेत. इथले चुंबकत्व पृथ्वीच्या पृष्ठभागावरील चुंबकत्वापेक्षा कित्येक हजार पटींनी तीव्र असते. सूर्य हा वायूचा गोलक आहे. सूर्यावरचे वायू हे सूर्याच्या स्वत:च्या अक्षाभोवती वेगवेगळय़ा वेगाने भ्रमण करीत असतात. (त्यामुळे सूर्याचा विषुववृत्ताजवळचा साडेचोवीस दिवसांचा असणारा भ्रमणकाळ हा वाढत जाऊन दोन्ही ध्रुवांजवळ चौतीस दिवसांचा होतो.) भ्रमणकाळातील या फरकामुळे सूर्याच्या चुंबकीय क्षेत्रात अनेक घडामोडी होतात. सूर्याचं चुंबकीय क्षेत्र वाकतं, ताणलं जातं आणि त्याला पीळही पडतात. चुंबकीय क्षेत्राच्या या तोडमोडीमुळे लगतच्या पृष्ठभागावरील वायूंवर परिणाम होतो व पृष्ठभागाला ‘भेगा’ किंवा ‘छिद्र पडतात. यामुळे तिथे अंतर्भाग व पृष्ठभाग या दरम्यान होणाऱ्या ऊर्जेच्या अभिसरणात बाधा येते आणि त्याजागी कमी तापमानाचा प्रदेश म्हणजेच सौरडाग निर्माण होतो. सौरडागांचा आकार हा सुमारे पाचशे किलोमीटरपासून कित्येक हजार किलोमीटर इतका असू शकतो. यातले काही डाग तर दहा-बारा पृथ्वी सहज सामावल्या जातील, इतके प्रचंड असतात. छोटे डाग फक्त काही दिवसांपर्यंत टिकाव धरू शकतात, तर मोठय़ा डागांचे आयुष्य कित्येक आठवडय़ांचे असू शकते.
श्रीनिवास औंधकर
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

त्यांनी जरी एक आणि फक्त एकच ‘मात्’ म्हणजे ‘मदर’ ही कादंबरी लिहिली असती तरी जगप्रसिद्ध कादंबरीकार म्हणून त्यांची गणना झाली असती. ते म्हणजे रशियाच्या जडणघडणीला योगदान दिलेले साहित्यिक मॅक्झिम गॉर्की हे होय. १६ मार्च १८६८ रोजी एका गरीब सुताराच्या घरात त्यांचा जन्म झाला. बालपणीच आईवडिलांचे छत्र हरपले. त्यांच्या आजोबांनी त्यांना घराबाहेर हाकलले चक्क वयाच्या अवघ्या १० व्या वर्षीच. जी जी कामे समाजाने हलकी ठरवली, ती सर्व त्यांनी बालपणापासूनच केली. बोटीवरील आचाऱ्याला मदतनीस म्हणून काम करत असताना त्या आचाऱ्याजवळील असलेली ग्रंथसंपदा त्यांनी वाचली आणि त्यांचे जीवनच बदलले. ते स्वत: आता लिखाण करू लागले. खरे नाव अल्येक्सेई माक्सिमोविच पेश्कोव, पण लिखाणासाठी त्यांनी टोपणनाव घेतले मॉक्झिम गॉर्की. ‘मकार चुद्रा’ ही त्यांची पहिलीच कथा गाजल्यावर अनेक वृत्तपत्रांतून लेखन करायची संधी त्यांना मिळाली. त्या काळात रशियात झारशाहीच्या अत्याचाराविरुद्ध भोंगा वाजवला कामगारांनी! त्यांच्या जगप्रसिद्ध ‘मात्’ या कादंबरीत एका कामगाराचे नेत्यात आणि त्याच्या अडाणी आईचे क्रांतिकारकात झालेल्या रूपांतराची कथा आहे. ेत्यांचे लिखाण झारशाहीला मारक ठरल्याने झारने त्यांना तुरुंगात टाकले. १९१७ मध्ये रशियात क्रांती झाल्यानंतर राजकारणापासून चार हात लांब राहून साहित्य निर्मितीत रस घेतला. सोव्हिएत संघाचे ते संस्थापक. कष्टकरी समाजावर प्रेम करणारा हा आगळावेगळा क्रांतिकारी साहित्यिक १९३६ च्या सुमारास कालवश झाला.
संजय शा. वझरेकर

चीनमधील ही गोष्ट. तिथल्या एका प्रांतात राजाला नागरिकांनी कबुतरे भेट देण्याची प्रथा होती. नव्या वर्षांच्या शुभेच्छा म्हणून प्रजा राजासाठी दुरून दुरून भेटायला यायची. येताना प्रत्येकजण आपल्याबरोबर कबुतरे आणायचा. राजाला पांढरीशुभ्र, गुबगुबीत, गोजिरवाणी कबुतरे फार आवडायची. राजाची मर्जी संपादन करण्यासाठी लोक जेवढी मिळतील तेवढी कबुतरे आणून राजाला खूश करण्याचा प्रयत्न करायचे. जास्त कबुतरांची भेट आणणाऱ्याला राजाही खूश होऊन बक्षिसी द्यायचा. बक्षिसांच्या आशेने राज्यातले नागरिक वर्षभर कबुतरे पकडायचे. त्यामुळे झाले काय की, त्या चिमुकल्या निरागस पक्ष्यांचे जीवन फारच दु:खाचे आणि कायम भीतीने भरून गेले. कधी कोण कुठून येईल आणि पट्दिशी आपल्याला पकडून पिंजऱ्यात ठेवेल याचा नेम नाही म्हणून ती इवली पाखरे कायम भेदरलेली असायची. त्यांची छोटुली हृदये कायम भीतीने धडधडत राहायची. त्यांच्या मण्यांसारख्या डोळय़ांत भय साचून राहू लागले. सदैव घाबरलेले, भेदरलेले आणि दचकणारे ते पक्षी फारच केविलवाणे आणि दयनीय दिसायला लागले. त्या प्रांतातल्या वनात पशुपक्ष्यांवर, वृक्षवेलींवर, नदीनाल्यांवर, निर्झरांवर, कडेकपारींवर, डोंगरदऱ्यांवर खूप प्रेम करणारा आणि सदैव त्यांच्या संगतीत राहणारा वृद्ध होता. साऱ्यांची तो काळजी घ्यायचा. कबुतरांची केविलवाणी अवस्था, त्यांचे दु:ख, त्यांचे भयपूर्ण जीवन त्याला अस्वस्थ करू लागले. त्याने निश्चय केला की, आणखी वाट पाहणे नको. सरळ जाऊन सम्राटांची भेट घ्यावी. वृद्ध राजगृही गेला. राजाची त्याने भेट घेतली. त्याला प्रणाम करून नम्रपणाने आणि शांत आवाजात वृद्ध राजाला म्हणाला, ‘महाराज, आपल्याला कबुतरे भेट देण्याची राज्यात प्रथा आहे. या प्रथेचे कारण मी आपल्याला विचारू इच्छितो. आपण कृपावंत होऊन मला त्याविषयी सांगाल का?’ राजा म्हणाला, ‘माझा दयाळूपणा दाखवण्यासाठी मी प्रत्येक वर्षांच्या पहिल्या दिवशी कबुतरे आकाशात मुक्त सोडतो. भव्य आकाशात मुक्तपणे संचार करणारी ती कबुतरे माझ्या उदार मनाचे गुणगान करतच उडत असतील.’ ‘क्षमा असावी महाराज,’ वृद्ध म्हणाला, ‘आपल्याला आकाशात सोडण्यासाठी कबुतरे हवीत म्हणून जनता जास्तीत जास्त कबुतरे मिळवण्याचा प्रयत्न करते. पकडताना आणि पकडल्यावर अनेक कबुतरे मृत्युमुखी पडतात. पकडले जाण्याच्या धास्तीने ती कायम घाबरलेली असतात. आपल्याला खरोखर दया दाखवायची असेल तर कबुतरे पकडायला आपण राज्यात बंदी करावी. कबुतरांनी मुक्तपणे संचार करावा, असे आपल्याला मनापासून वाटत असेल तर त्यांना पकडले जाण्याचे दु:ख देऊ नका.’ राजाने वृद्धाच्या विनंतीला आनंदाने मान्यता दिली आणि राज्यातली कबुतरे भयमुक्त झाली. आपल्या आनंदासाठी दुसऱ्याला दु:ख आपण देत नाही ना हा विचार प्रथम करणे आवश्यक आहे. आजचा संकल्प - मी इतरांना दु:ख होईल असे वागणार नाही.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com