Leading International Marathi News Daily

सोमवार , १६ मार्च २००९

रंग बरसे..!
राजा धनराज गिरजी हायस्कू लमध्ये एड्सग्रस्त मुलांसाठी शंकरराव भोई स्मृती प्रतिष्ठानमार्फत विशेष रंगपंचमी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी या मुलांनीही रंगपंचमीचा आनंद लुटला.

ट्रिपल कनेक्टिव्हिटी
युती-आघाडय़ांची जुळवाजुळव करण्यासाठी मित्रपक्ष म्हणविणाऱ्यांवर टाकण्यात येणारा दबाव, उमेदवारांची शोधाशोध, निवडून येण्याची समीकरणे.. अशा वातावरणामध्ये कंडय़ा पिकविल्या जाणारच. प्रत्यक्ष प्रचारापूर्वीच्या या ‘गॉसिप’ धुळवडीमध्ये पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव यांच्यावरही निवडणूक रंग उधळण्यात आले! जाधवसर हे अहमदनगरमधून लढणार, शिर्डी हा सज्ज आहे, दक्षिण-मध्य मुंबई हा तर त्यांच्यासाठी हक्काचाच आहे, पुण्यामध्ये कलमाडीला डच्चू देऊन जाधवसरांच्या माध्यमातून नवा चेहरा देणार.. अशा एक ना अनेक मतदारसंघांसमवेत जाधवसरांचे नाव जोडले गेले.

श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीसाठी खासदार आढळराव यांची शिफारस
पिंपरी, १५ मार्च/प्रतिनिधी

मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे जिल्हाप्रमुख गजानन बाबर यांचे नाव अंतिम स्पर्धेत असतानाच आज दस्तुरखुद्द खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी पिंपरी-चिंचवडचे काँग्रेस नगरसेवक श्रीरंग बारणे यांच्या नावाची शिफारस केल्याने आता मुसंडी मारून बारणे यांचे नाव पुढे आले आहे.या मतदारसंघातून बाबर यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाले होते. रायगड जिल्ह्य़ात शिवसेनेची शेकापबरोबर युती असल्याने उमेदवारीची अंतिम बोलणी करण्यासाठी त्यांना आज मुंबईत शिवसेना भवनमध्ये बोलावण्यात आले होते.

आंब्याची निर्यात घटणार
मुस्तफा आतार, पुणे, १५ मार्च

देश-विदेशातील मोठमोठय़ा आयटी कंपन्यांसह लहान उद्योगांना जागतिक आर्थिक मंदीचा फटका बसत असताना त्यातून फळांचा राजा आंबाही आता सुटला नाही. दरवर्षी आखाती देशांसह अमेरिका, जपान देशांमध्ये होणाऱ्या निर्यातीला या मंदीचा चांगला फटका बसणार असून, त्यामुळे सुमारे तीस टक्के निर्यात यंदा घटणार आहे.

मिठाई व्यापाऱ्याच्या खून प्रकरणी दोघांना अटक
व्याजाने दिलेल्या पैशाच्या तगाद्याला कंटाळून खून केल्याचे निष्पन्न

पुणे, १५ मार्च / प्रतिनिधी

रविवार पेठेतील मिठाई व्यावसायिक गिरीश हिरालाल शहा यांचा खून करणाऱ्या दोघा तरूणांना सहकारनगर पोलिसांनी आज दुपारी अटक केली. व्याजाने दिलेले पैसे वसूल करण्यासाठी शहा यांनी तगादा लावल्यामुळे चिडलेल्या मारेकऱ्यांनी त्यांचा खून केल्याचे तपासात उघडकीस आले.

तोरण्यावर १००वी ‘चढाई’
स्वाती कर्वे

रविवार १५ मार्च २००९ची सकाळ. साडेदहा-अकरा वाजल्यापासून काल रात्री तोरण्यावर चढलेल्या २५ जणांपैकी दोन-चार, दोन-चारजण खाली येऊ लागले. पायथ्याशी असलेला हॉल ३०-३५ माणसांनी फुलला. चार खुच्र्या मांडल्या गेल्या आणि त्यातल्याच गिर्यारोहकांनी- महेश इंगळे, विनायक दारव्हटकर यांनी आयोजित केलेला छोटेखानी कार्यक्रम नीटसपणे पार पडला.

नारायणगावला शेतकऱ्याची आत्महत्या
नारायणगाव, १५ मार्च/वार्ताहर

चाळकवाडी (ता. जुन्नर) येथील शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून विष प्राशन करून नेवासा (जि. अहमदनगर) येथे आत्महत्या केली. दरम्यान, कर्जामुळे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याची या भागातील दुसरी घटना आहे. बबन बाळाजी वाघ (वय. ६२) या शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केलेली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, की वाघ यांनी पिंपळवंडी येथील यशवंत ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्थेतून १ लाख रुपये कर्ज घेतलेले आहे. तसेच अन्य पावणेदोन लाखाचे कर्ज त्यांच्यावर होते. अल्प जमिनीतून कर्जफेड होत नसल्याने व कर्जाचा बोजा वाढत चालल्याने त्यांचे मानसिक संतुलन बिघडले होते. काही दिवस ते बेपत्ता झाले होते. बेपत्ता असल्याची तक्रार संगमनेर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. अहमदनगर जिल्ह्य़ातील नेवासा जवळील उसाच्या शेतात त्यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर मृतदेह वाघ कुटुंबीयांच्या ताब्यत देण्यात आला. बबन वाघ यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. दरम्यान कर्जाला कंटाळून आत्महत्या करण्याची ही तिसरी घटना तालुक्यातील असून चाळकवाडी व काळवाडी या शेजारी गावातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत.

‘राष्ट्रपिता अब्राहम’चे आज प्रकाशन
पुणे, १५ मार्च / प्रतिनिधी

सनी पाटोळे यांनी लिहिलेल्या ‘राष्ट्रपिता अब्राहम’ या कादंबरीचे प्रकाशन येत्या सोमवारी (१६ मार्च) फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या हस्ते होणार आहे. एस. एम. जोशी सभागृहात सोमवारी सायंकाळी होणाऱ्या या प्रकाशन समारंभाला ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर प्रसिद्ध लेखिका डॉ. सरला बार्णबस या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारणार आहेत. इस्रायली, मुस्लिम व ख्रिस्ती लोक ज्याला जगातील अनेक राष्ट्रांचा मूळ पुरुष मानतात, त्या अब्राहमाच्या जीवनावरील बायबलवर आधारित ही ऐतिहासिक कादंबरी कॉन्टिनेन्टल प्रकाशनने प्रकाशित केली आहे.

गटविकास अधिकाऱ्याच्या निलंबनाची मागणी
पुणे, १५ मार्च / प्रतिनिधी

शालेय पोषण आहाराच्या तपासणीसाठी येऊन लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार होत असून या प्रकरणी भोरच्या गटविकास अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी किकवीच्या ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे. या प्रकरणी कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही गावक ऱ्यांनी दिला आहे.
या गटविकास अधिकाऱ्याबद्दल भोर व वेल्हा तालुक्यातील शिक्षकांच्या बऱ्याचशी तक्रारी आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

दारूसाठी पैसे नाकारणाऱ्या पत्नीच्या हाताचा अंगठा तोडला
पिंपरी, १५ मार्च / प्रतिनिधी

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून वाकड काळा खडक झोपडपट्टीतील एकाने आपल्या पत्नीच्या हाताच्या अंगठय़ाचा चावा घेऊन तुकडा पाडल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दादू भीमराव पाटोळे (वय ४०, रा. काळा खडक झोपडपट्टी, वाकड) असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी त्याची पत्नी लक्ष्मी दादू पाटोळे (वय ३५, रा. काळा खडक झोपडपट्टी, वाकड) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. लक्ष्मीने काल रात्री दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याकारणावरून दादूने चिडून तिच्या हाताचा अंगठा चावून तुकडा पाडल्याचे पोलिसांनी सांगितले. दादूला आज पहाटे पाच वाजता अटक करण्यात आली आहे. अधिक तपास सहायक फौजदार लिंबराज बनसोडे करीत आहेत.