Leading International Marathi News Daily

सोमवार , १६ मार्च २००९

राज्य

..अन् पाणावल्या डोळ्यांच्या कडा
नाशिक, १५ मार्च / प्रतिनिधी

उपस्थित सर्वाच्याच डोळ्यांच्या कडा पाणावलेल्या, आपल्या माणसाच्या आठवणीने दाटून येणारा हुंदका, आणि शूरवीरांच्या कार्याला सलाम करण्यासाठी होणारा टाळ्यांचा गजर.. अशा भावपूर्ण वातावरणात शनिवारी रात्री येथे गंगाघाटावर ‘सी न्युज सर्वाच्या सोबत’ या स्थानिक वृत्त वाहिनीतर्फे मुंबई येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद व जखमी झालेल्या जवानांच्या कुटुंबियांचा तसेच या हल्ल्याप्रसंगी धाडसी कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. गोदा उत्सव अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहीद व जखमी जवानांच्या शौर्याची थोडक्यात माहितीही यावेळी चित्रफितीव्दारे दिली जात होती.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील
आगीत २०० हेक्टर वनसंपत्तीचे नुकसान
चंद्रपूर, १५ मार्च/ प्रतिनिधी
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पांढरपौनी व पिपर्डा परिसरात लागलेली आग विझवण्यात रविवारी पहाटे वन कर्मचाऱ्यांना यश आले. या आगीत कुठल्याही प्रकारची वन्यजीव हानी झालेली नसली तरी वनसंपत्तीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. ही आग वणवा नसून मानवनिर्मित असल्याचा व यात २०० हेक्टर जंगल जळून राख झाल्याचा अहवाल प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. शेषराव पाटील यांनी वन मंत्रालयाला पाठवला आहे.

नाशिकच्या डॉ. मनोज चोपडांचा हृदय शस्त्रक्रियेत विक्रम
नाशिक, १५ मार्च / प्रतिनिधी
हृदयात छिद्र असलेल्या अडीच ते साडेसात वयोगटातील १४ मुलांवर एकाच दिवशी यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आपण यशस्वी झालो असून हा एक विक्रम असल्याची माहिती येथील डॉ. मनोज चोपडा यांनी पत्रकार परिषदेत दिली. शिर्डी येथे आयोजित कार्यशाळेत या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. कार्यशाळेमध्ये व्हिएतनामचे डॉ. ह्य़ू यांनीही सहभाग घेतला होता. नंदुरबार, धुळे, जळगाव, जव्हार आदी भागातून सर्वेक्षण करून या मुलांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली होती. केंद्र शासनाची एन. आर. एच. एम. योजना, जीवनदायी योजना व विविध ट्रस्टच्या मदतीमुळे या शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

कोकणात बारा मास सुरू आहे पर्यावरणाचीच होळी!
जितेंद्र पराडकर, संगमेश्वर, १५ मार्च

कोकण आणि भातशेती यांचे जसे अतूट नाते आहे, तद्वत कोकण आणि शिमगोत्सव यांचेही नाते जुळलेले आहे. कोकणच्या ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांत शिमगोत्सवाचे सर्वाधिक महत्त्व रत्नागिरी जिल्ह्यातच आहे. शिमगा या सणात मानापमानाचे नाटय़ तर अधिक रंगते. ग्रामदेवतेच्या या खेळात मानपानाला सर्वाधिक महत्त्व आहे. यामुळे अनेक गावांतील शिमगोत्सवावर प्रशासनाने बंदीही घातलेली आहे. या उत्सवात जसा गावातील एखाद्या पार्टीचा अपमान होतो, त्याच पद्धतीने उत्सव साजरा करणाऱ्या मंडळींकडून पर्यावरणाचा ऱ्हास होऊन कोकणच्या हिरव्यागार निसर्गाचाही सातत्याने अपमान होत आहे.

गुहागर किनारपट्टीवर मत्स्य दुष्काळाचे सावट
चिपळूण, १५ मार्च/वार्ताहर

मासळीचा दुष्काळ असल्याने गेले दोन महिने होडय़ा गुहागरच्या समुद्रकिनारी उभ्या असून मच्छिमार मोठय़ा संकटात सापडला आहे. दरम्यान, निवडणुकीची धावपळ व आचारसंहिता असल्याने परिस्थितीने अगतिक झालेल्या मच्छिमारांच्या या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे.

दहावीच्या उत्तरपुस्तिका असलेली पोस्टाची बॅग येवला बस स्थानकातून लंपास
येवला, १५ मार्च / वार्ताहर

दहावी परीक्षेच्या उत्तरपुस्तिका व १४ हजार ५०० रूपये असलेली पोस्टाची सीलबंद बॅग येथील बस स्थानकातून चोरटय़ांनी लांबविली असून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास टपाल कार्यालयाचे शिपाई माधव खरोटे यांनी बस स्थानकात बारदानाची सीलबंद बॅग देशमाने येथे रवाना करण्यासाठी आणली होती. बॅगेत दहावीच्या उत्तरपुस्तिकांचा गठ्ठा तसेच देशमाने गावातील टपालासह १४ हजार ५०० रूपयांची रोकड होती. फलाट क्रमांक सहावर खरोटे उभे असताना नियंत्रकाने दुसऱ्या पोस्टाची बॅग घेण्यासाठी संबंधित शिपायास बोलविले. या कालावधीत बॅग कुणीतरी लांबविल्याचे लक्षात आले. याप्रकरणी येवला पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवैध रॉकेल विक्री: एकास अटक
कल्याण, १५ मार्च/वार्ताहर

शहाड येथे रेल्वे स्थानकानजीक नवरंग सोसायटीमध्ये अवैधरीत्या पांढऱ्या व निळ्या रंगाच्या रॉकलेचा साठा बाळगणाऱ्या चौकडीपैकी एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे, तर चार जण फरारी आहेत. याप्रकरणी दोन लाख ८० हजार ६५५ रुपये किमतीचा अवैध रॉकेलचा साठा जप्त करण्यात आला आहे. निळ्या रंगाच्या रॉकेलमध्ये ब्लिचिंग पावडर टाकून त्याचे पांढरे रॉकेल तयार करून काळ्या बाजारात त्याची विक्री केली जात असल्याची माहिती शिधावाटप अधिकाऱ्यांना मिळाली होती. शिधावाटप अधिकाऱ्यांनी सापळा रचून या टोळीतील धर्मेन्द्र कनोजिया याला अटक केली. पोलिसांनी शुभ्र आणि निळ्या रंगाचा रॉकेलचा साठा जप्त केला आहे.

रामकृष्ण नायक अत्यवस्थ
मडगाव, १५ मार्च

गोवा हिंदू असोसिएशनचे एक आधारस्तंभ रामकृष्ण नायक यांना शनिवारी हृदयविकाराचा झटका आल्याने मडगाव येथील अपोलो व्हिक्टर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले आहे.
गोमंत विद्या निकेतन या संस्थेच्या कार्यालयात काम करीत असतानाच चार दिवसांपूर्वी त्यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने एका खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. परंतु शनिवारी सकाळी त्यांची प्रकृती आणखी बिघडल्याने त्यांना अपोलो व्हिक्टर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात येणार आहे. त्यांच्या प्रकृतीला धोका नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

माजी आमदार भाई पाटील यांचे निधन
वाडा, १५ मार्च/वार्ताहर
वसई तालुक्यातील देपिवली येथील रहिवासी व शेकापचे माजी आमदार भाई ऊर्फ भालचंद्र शिवराम पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. १९५७ ते ६२ व १९६७ ते ७२ या कालावधीतच भिवंडी विधानसभा मतदारसंघातून शेकापच्या तिकिटावर ते निवडून आले होते. पाटील यांनी एक उत्कृष्ट शेतकरी नेते व शिक्षणसम्राट म्हणून किर्ती मिळविली होती. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी दुगाडफाडा (भिवंडी) येथे पहिले वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले. तसेच दुगाडफाटा, दिघाशी येथे माध्यमिक शाळा उघडून त्यांनी ग्रामीण भागातील मुलांची शिक्षणाची सोय केली.

घरफोडी करणाऱ्या दोन संशयितांना अटक
देवळा, १५ मार्च / वार्ताहर

तालुक्यातील पिंपळगाव (वा.) शिवारात घरफोडी करून लॅपटॉप संगणकासह इतर साहित्य चोरणाऱ्या दोन परप्रांतीय तरूणांना मुद्देमालासह देवळा पोलिसांनी अटक केली.
झाडी-एरंडगाव कालव्यातील बोगद्याचे काम करणारा ठेकेदार विश्वनाथ परदेशी यांच्या शेतात भाडय़ाने राहात होता. त्याच्या घराचे कुलूप तोडून चोरटय़ांनी लॅपटॉप (संगणक), की बोर्ड, मीटर आदी संगणकाचे सर्व साहित्य चोरून नेले असल्याची फिर्याद संबंधित ठेकेदार विनयन पाचायन यांनी देवळा पोलिसात दाखल केली. शनिवारी पिंपळगाव (वा.) येथे दोन परप्रांतीय दोन बॅगा घेऊन जात असल्याचे नंदू वाघ यांना दिसताच त्यांनी संशयितांना पकडून ठेवले व त्याविषयी पोलिसांना कळविले. त्यानंतर देवळा पोलिसांनी त्यांना मुद्देमालासह ताब्यात घेतले.