Leading International Marathi News Daily

सोमवार , १६ मार्च २००९

क्रीडा

एकदिवसीय मालिकेत वीरू आणि भारताच्या वीरश्रीचेच दर्शन
हॅमिल्टन, १५ मार्च/ एफटीआय

यशाची शिखरे एकामागून एक पादाक्रांत करणाऱ्या महेंद्र सिंग धोनीच्या टीम इंडियाची खरी कसोटी लागेल असे न्यूझीलंडच्या दौऱ्यात लागेल अशी बऱ्याच जाणकारांनी मते बनवली होती. हा दौरा त्यांना खडतर जाईल आणि कदाचित पराभावाचे तोंडही त्यांना पहावे लागेल असेही भाकीत बऱ्याच क्रिकेट पंडितांनी वर्तविले होते. भारताचा यापूर्वीचा न्यूझीलंडमधला इतिहास पाहता बरेचजण यावर विश्वासही ठेवत होते. पण भारतीय संघाने आकडेवारीचे टेन्शन न घेता न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत ३-१ असा फडशा पाडला आणि तिथे भारताची सर्वात यशस्वी कामगिरी करण्याचा बहुमान मिळविला.

किवी संघाच्या कसोटीतील कामगिरीबाबत मोल्स आशावादी
हॅमिल्टन, १५ मार्च/वृत्तसंस्था

पाचव्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळविल्यामुळे आमच्या संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. कसोटी मालिकेतही अशाच प्रकारे खेळ करून आम्ही विजय मिळवू, असा आत्मविश्वास न्यूझीलंड संघाचे प्रशिक्षक अँडी मोल्स यांनी व्यक्त केला आहे. एकदिवसीय मालिका भारताने जिंकली असली तरी ट्वेन्टी-२० चे दोन सामने धरून आम्हीही तीन विजय मिळविले आहेत. त्या अर्थाने पाहता दोन्ही संघांत ३-३ अशी बरोबरी झाली आहे, असे ते म्हणाले.

सचिनपेक्षा सेहवाग स्फोटक
इयन ओब्रायनकडून कौतुक

हॅमिल्टन, १५ मार्च/ पीटीआय
चौथ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात धुवाँधार फलंदाजी करीत गोलंदाजीची पिसे काढणाऱ्या वीरेंद्र सेहवागचा न्यूझीलंडच्या क्रिकेट खेळाडूंनी चांगलाच धसका घेतलेला दिसतो. प्रतिस्पर्धी संघाचा मध्यमगती गोलंदाज इयान ओब्रायनने तर सेहवाग हा सचिन तेंडुलकरपेक्षाही विस्फोटक फलंदाजी करतो असे म्हटले आहे. प्रत्यक्षात मात्र सलग तीन एकदिवसीय सामन्यात २४४ धावा सचिनने जमविल्या होत्या तर सेहवागने न्यूझीलंड दौऱ्यातच सलग पाच सामने खेळताना २९९ धावा केल्या होत्या. तरीही ब्रायनला दिल्लीचा हा धडाकेबाज फलंदाजच आक्रमक भासतो.

सानियाचे आव्हान संपुष्टात
इंडियन वेल्स, १५ मार्च / पीटीआय

बीएनपी परिबास ओपन टेनिस स्पर्धेत काल दुहेरीमध्ये पराभव स्वीकारावा लागलेल्या भारताच्या सानिया मिर्झाला आज एकेरीमध्येसुद्धा विजय मिळविता न आल्याने तिचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेले आहे. सानियाने जरी निराशा केलेली असली तरी भारताचा स्टार टेनिसपटू लिएंडर पेसने मात्र पुरुषांच्या दुहेरीतील पहिला सामना जिंकत विजयी सलामी दिली आहे. लिएंडर पेस आणि त्याचा झेक प्रजासत्ताकचा सहकारी लुकास ड्लॉही यांना पहिल्याच सामन्यात चांगलाच घाम गाळावा लागला.

अंबर बुद्धिबळ : आनंदची लेकोशी बरोबरी
नाइस (फ्रान्स), १५ मार्च / पीटीआय

विश्वविजेता आणि भारताचा ग्रॅण्डमास्टर विश्वनाथन आनंद याने अंबर ब्लाइंडफोल्ड व रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत प्रतिस्पर्धी पीटर लेकोशी १-१ अशी बरोबरी साधत सलामीच्या लढतीत संमिश्र यश मिळविले. आनंदने ब्लाइंडफोल्डमधील डाव सहज जिंकला पण रॅपिड बुद्धिबळ या त्याच्या आवडत्या प्रांतात मात्र तो मागे पडला आणि लेकोविरुद्ध त्याला पराभव मान्य करावा लागला. त्यामुळे त्याला १-१ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. ब्लाइंडफोल्ड व रॅपिड बुद्धिबळाच्या प्रत्येकी एका फेरीनंतर अर्मेनियाचा लेव्हॉन अ‍ॅरोनियन आघाडीवर आहे. त्याने दोन्ही लढतीत विजय मिळविला. व्ॉसिली इव्हानचुकला त्याने दोन्ही लढतींत नमविले. या स्पर्धेतील इतर लढतींत मात्र १-१ अशा बरोबरीचाच निकाल लागला.

आयपीएलसाठी अतिरिक्त सुरक्षाव्यवस्था नाही
नवी दिल्ली, १५ मार्च / वृत्तसंस्था

केंद्रीय गृहमंत्रालयाने इंडियन प्रीमियर लीगच्या आयोजकांना नव्या तारखा निश्चित करण्याची सूचना केलेली असतानाच आता या स्पर्धेसाठी कोणतीही अतिरिक्त सुरक्षाव्यवस्था पुरविण्यात येणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. गृहमंत्रालयाने म्हटले आहे की, ‘ज्या राज्यांत या स्पर्धेचे आयोजन होणार आहे, त्यांनी आपल्यापरीने सुरक्षाव्यवस्था पुरवावी आणि ही सुरक्षाव्यवस्था पुरविण्यास ते सक्षम असतील, तरच त्यांनी स्पर्धेच्या तारखांना हिरवा कंदिल दाखवावा. पण केंद्राकडून निमलष्करी दलाची मदत मिळेल, अशी अपेक्षा बाळगू नये.’

‘आयसीएलच्या मुद्यावर बीसीसीआयचे वर्तन लाजीरवाणे’
हॅमिल्टन, १५ मार्च/ वृत्तसंस्था

इंडियन क्रिकेट लीगमध्ये खेळलेल्या खेळाडूंवर बहिष्कार टाकण्याच्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या भूमिकेवर येथील प्रसारमाध्यमांनी जोरदार टीका केली आहे. भारतीय क्रिकेट मंडळाचे चिटणीस निरंजन शहा यांचे वर्तन तर एखाद्या बदमाशाप्रमाणेच आहे, अशी कडवट टीकाही येथील प्रसारमाध्यमांनी केली आहे.

पूर्व व पश्चिम विभागाला अंतिम फेरी गाठण्याची आशा
देवधर करंडक क्रिकेट
कटक, १५ मार्च / पीटीआय
देवधर करंडक क्रिकेट स्पर्धेत यापूर्वीच्या लढतीत बोनस गुणांसह विजय मिळवल्यामुळे मनोधैर्य उंचावलेल्या पूर्व आणि पश्चिम विभागाला उद्या, सोमवारी होणाऱ्या लढतीत आपापल्या प्रतिस्पध्र्याविरुद्ध विजय मिळवण्याचा विश्वास आहे. या स्पर्धेत साखळी फेरीतील अखेरच्या लढती उद्या, सोमवारी होणार आहेत. पूर्व विभागाला गतविजेत्या मध्य विभागासोबत लढत द्यावी लागणार आहे तर पश्चिम विभागापुढे पाहुण्या झिम्बाब्वे अध्यक्ष इलेव्हन संघाचे आव्हान आहे.

भारतीय क्रिकेट इतिहासामध्ये धोनीची यंग ब्रिगेड सर्वोत्तम
पतौडी यांची स्तुतीसुमने
भोपाळ, १५ मार्च/ पीटीआय

न्यूझीलंडमध्ये एकदिवसीय मालिकेत अभूतपूर्व यश संपादन केल्यानंतर ‘भारतीय क्रिकेट इतिहासामध्ये धोनीची यंग ब्रिगेड सर्वोत्तम’ असल्याचे मत भारताचे माजी कर्णधार नवाब मन्सूर अली खान पतौडी यांनी व्यक्त केले आहे. न्यूझीलंडमधल्या एकदिवसीय मालिका विजयानंतर धोनीची यंग ब्रिगेड भारतीय क्रिकेट इतिहासामध्ये सर्वोत्तम असून त्यांना आगामी कसोटी सामना मालिका जिंकण्याची सुवर्ण संधी आहे, असे मत पतौडी यांनी व्यक्त केले आहे. ते पुढे म्हणाले की, धोनीची यंग ब्रिगेड ही वैयक्तिक विक्रमासाठी खेळत नसून देशाचे नाव उंचावण्यासाठीच मैदानात उतरते आणि त्यामुळेच त्यांना पराभूत करणे अन्य संघाना कठीण जात आहे. न्यूझीलंडमध्ये भारताची एवढी चांगली कामगिरी कधीच झाली नव्हती. त्यामुळे हा संघ सर्वोत्तम असल्याचे मला वाटते. भारतीय संघाने या पुढेही विजयाचा ध्वज असाच उंचवावा. त्यांची सध्याची कामगिरी फारच उत्कृष्ट दर्जाची होत असून यापुढेही त्यांनी यामध्ये सातत्य म्राखायला हवे, असेही पतौडी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

भारताच्या पराभवाला रोहितचा क्रम कारणीभूत -क्रो
नवी दिल्ली, १५ मार्च / पीटीआय

पाचव्या आणि अखेरच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात रोहित शर्माला चौथ्या क्रमांकावर पाठविण्याच्या कर्णधार धोनीचा निर्णय न्यूझीलंडच्या पथ्यावर पडल्याचे मत न्यूझीलंडचा माजी कर्णधार मार्टिन क्रो याने एका स्तंभात म्हटले आहे. क्रोने लिहिले आहे की, या मालिकेत ३-० अशी आघाडी घेतल्यानंतर भारतीय संघ निर्धास्त बनला होता. त्याचाच फायदा किवींनी उठविला. जर त्यांना खरोखरच ही मालिका ४-० अशी जिंकायची असती तर धोनीने रोहित शर्माऐवजी चौथ्या क्रमांकावर यायला हवे होते. जेव्हा रोहित शर्मा मैदानात उतरला तेव्हा तुम्हाला जाणीव झाली असेल की कर्णधार व्हेटोरीच्या चेहऱ्यावर चांगली संधी चालून आल्याचे भाव होते. रोहित शर्मासारख्या अननुभवी खेळाडूवर दडपण टाकण्याची त्याची चाल यशस्वी ठरली. क्रोने म्हटले आहे की, ज्यावेळी वीरेंद्र सेहवाग ऐन भरात होता, त्याचवेळेस मैदानात उतरलेल्या रोहित शर्माने स्ट्राइक बदलत ठेवण्याची काळजी घेतली नाही, परिणामी सेहवागचा सूर बिघडला आणि तो बाद झाला.

हॉकी : पाकिस्तानची भारतावर २-३ ने मात
जोहर बहरु, १५ मार्च/ पीटीआय

अंतिम सामन्यात प्रतिस्पध्र्यासमोर नांगी टाकण्याची परंपरा भारतीय हॉकी संघाने आजही कायम ठेवली. २१ वर्षांखालील चार देशांच्या हॉकी स्पर्धेत पाकिस्तानने भारतावर २-३ अशी मात केली. पाकिस्तान हॉकी संघाचा कर्णधार हसिम अब्दुल खान याने ७३ व्या मिनिटाला विजयी आघाडी मिळवून देणारा गोल केला अन् भारताच्या विजयाची शक्यताच मावळली. भारताचा मनदीप अन्तीलने दोन गोल करीत कडवे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला होता. पाकिस्तानकडून हसिमनने दोन तर मुहम्मद जुबेरने एक गोल नोंदविला. खेळाच्या पाचव्या मिनिटाला पाकिस्तानच्या जुबेरने गोलरक्षक मृणाल चौबे याला चकवत संघाला गोल नोंदवून दिला. भारतीय संघाचा बचाव भेदण्यात पाकिस्तानला यश आले. तरीही दोनदा लाँग पासवर गोल करण्यात पाकिस्तानला अपयश आले.