Leading International Marathi News Daily

सोमवार , १६ मार्च २००९

व्यक्तिवेध

कायद्याकडे केवळ व्यवसाय म्हणून न बघता, न्यायदान या जोडशब्दाचा नेमका अर्थ ज्यांनी गेल्या ३६ वर्षांत आपल्या कार्यातून कायम सिध्द केला, ते न्या. हेमंत लक्ष्मण गोखले यांची अलीकडेच मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली आहे. याआधीची दोन वर्षे न्या. गोखले अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून कार्यरत होते. अलाहाबाद उच्च न्यायालय हे भारतातील सर्वात मोठे न्यायालय समजले जाते. तेथे प्रलंबित खटल्यांची यादी प्रचंड मोठी होती. न्या. गोखले यांनी दोन वर्षांत ती आटोक्यात आणली आणि तेथील न्याय-प्रशासनातही आमूलाग्र सुधारणा केल्या. सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याच्या आस्थेने निवाडा देणारे न्यायाधीश असा त्यांचा लौकिक आहे. त्यामुळे त्यांचे निवाडे हे नेहमीच स्वतंत्र न्यायबुध्दीने दिलेले असतात. वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशप्रश्नावर न्याय देताना अपील करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मूठभर असली तरी तो हजारो मुलांचा प्रश्न आहे, हे न्या. गोखले यांनी ताडले होते. त्यामुळे इतरही विद्यार्थ्यांना त्या अपीलात सहभागी होण्याचे आवाहन करण्याची व्यवस्था त्यांनी लावली आणि विद्यार्थी व पालकांच्या उपस्थितीने तुडुंब भरलेल्या सेंट्रल कोर्टमध्ये त्या विद्यार्थ्यांच्या हिताचा न्याय दिला होता. मुंबईचा नगरविकास आराखडा, पर्यावरणाचे

 

संरक्षण, शिक्षकांचे प्रश्न अशा अनेक सामाजिक विषयांवर न्या. गोखले यांनी अभ्यसपूर्ण आणि पथदर्शक निवाडे दिले आहेत. जिल्हा पातळीवरील न्यायनिवाडे मराठीतून देण्यास मुभा मिळावी, यासाठीही न्या. गोखले यांनी महत्त्वाची भूमिका घेतली. मुळात कोणत्याही विषयावर स्वत:ची ठाम भूमिका घ्यायची आणि त्यानुसार अनुसरण करायचे हा त्यांचा विशेष गुण. त्याच भूमिकेतून त्यांनी त्यांच्या मुलाला मराठी शाळेतच शिकवले. मराठी भाषा जोपसणाऱ्या, वृध्दिंगत करणाऱ्या अनेक व्यक्ती-संघटनांना त्यांचे व्यक्तिगत पाठबळ ते देतात. रुईया महाविद्यालयाच्या माजी मराठी विभाग प्रमुख मीना गोखले या त्यांच्या पत्नी. त्यांच्या सहवासात न्या. गोखले यांनी साहित्यप्रेमही सतत जोपासले आहे. संगीतातही त्यांना विशेष रुची आहे. न्या. गोखले यांचा जन्म बडोद्याचा. १९४९ सालचा. त्यांचे शिक्षण झाले दादरच्या बालमोहन विद्यामंदिर शाळेत. एम. ए. आणि एलएल. एम. या पदव्या त्यांनी विशेष प्राविण्यासह प्राप्त केल्या. त्यातही एलएल. एम. करताना दोन विषयांत ते सर्वप्रथम आले होते. त्यांचा वकिली बाणा विद्यार्थी दशेतच दिसून आला होता. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी अनेक वादविवाद व वक्तृत्व स्पर्धा गाजवल्या होत्या. त्या काळात ते पुरोगामी विद्यार्थी चळवळीतही अग्रेसर होते. बांगलादेश युध्दाच्या वेळी बांगलादेशी निर्वासितांना भेटणे, बाबा आमटे यांच्या आनंदवनात जाऊन येणे अशांतून त्यांनी स्वत:च्या सामाजिक जाणीवा स्वयंस्फूर्तीने वाढवल्या. आणि तोच पैलू त्यांच्या कारकीर्दीत लक्षणीय ठरला. न्याययंत्रणा ही सामान्य अशिलासाठी राबवली जावी, अन्यायग्रस्त माणूस हे तिचे केंद्रस्थान असावे, यासाठी सातत्याने जीव ओतून काम करणे, ही त्यांची कार्यसंस्कृती. अशा कार्यकुशल व्यक्तीला आतापर्यंत चार उच्च न्यायालयांमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात सनद घेतली १९७३ मध्ये. वकील असताना ते कामगारांना न्याय मिळवून देणारे अनेक खटले यशस्वीपणे लढले होते. १९९४ मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली. तत्कालीन नियमानुसार ते लगोलग गुजरातमध्ये न्यायाधीश म्हणून रुजू झाले. १९९९ मध्ये ते पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात परत आले. जानेवारी २००७ मध्ये काही काळ ते मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती झाले. मग अलाहाबादचे मुख्य न्यायमूर्ती आणि आता मद्रासचे. न्यायदानाच्या वेळी तर्कशुध्द कठोरता आणि एरवीच्या वागण्यात ऋजुता यांचा मिलाफ त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आहे. त्यांच्या परिवर्तनवादी विचारसरणीचा आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेचा तो परिपाक आहे. न्या. हेमंत गोखले यांच्यासारख्या व्यक्ती न्यायव्यवस्थेची विश्वासार्हता टिकवण्यात मोलाचे योगदान देत असतात. त्यांना नव्या आव्हानात्मक जबाबदाऱ्या पेलण्याची संधी मिळणे, हे म्हणूनच महत्त्वाचे.