Leading International Marathi News Daily

सोमवार , १६ मार्च २००९

अल्पबचत योजनेतील गुंतवणुकीच्या प्रचारासाठी मेहकर तहसील कार्यालयासमोर लावलेल्या फलकाची अशी दुर्दशा झाली तरी प्रशासनाचे दुर्लक्ष कायम आहे.

अकोला जिल्ह्य़ावर जलसंकट; ८४ गावातील पाणीपुरवठा खंडित
वीज बिलाच्या थकबाकीमुळे महावितरणची कारवाई
अकोला, १५ मार्च/ प्रतिनिधी
वीज बिलाच्या थकबाकीमुळे ‘महावितरण’ने अकोट येथील ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची वीज कापल्याने जलसंकट तीव्र झाले आहे. वीज बिलाच्या थकबाकीमुळे अन्य पाच प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा बंद करण्याचा इशाराही महावितरणने दिल्यामुळे अकोला जिल्ह्य़ातील पाणीटंचाईचे संकट अधिक तीव्र होण्याचे संकेत आहेत.

मोर्शी, वरूड तालुक्यातील सोयाबीन उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित
अमरावती, १५ मार्च / प्रतिनिधी

अमरावती जिल्ह्य़ातील केवळ चार तालुक्यांना सोयाबीनची नुकसान भरपाई मिळाली आहे पण, मोर्शी आणि वरूड तालुक्याला या मदतीपासून दुर्दैवाने वंचित ठेवण्यात आले. आंदोलनांच्या माध्यमातून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला, तरीही सरकार काहीही करू शकलेले नाही, असा आरोप शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख डॉ. अनिल बोंडे यांनी केला आहे.

संत तुकाराम महाराज बीज कार्यक्रम सर्वत्र उत्साहात
चंद्रपूर, १५ मार्च/प्रतिनिधी

खरे कुणबी समाजाच्या वतीने जगत्गुरू संत तुकाराम बीज कार्यक्रम रवींद्रनाथ टागोर प्राथमिक शाळेच्या प्रांगणात नुकताच पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य रमेशचंद्र मुनघाटे यांनी केले. अध्यक्षस्थानी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष डॉ. विजय देवतळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून हरिभाऊ बरबटकर, बबनराव कळसकर, खरे कुणबी समाजाचे जिल्हाध्यक्ष देवीदास बानवले, डॉ. बबन लोणारे, अ‍ॅड. पंचकुमार कारेकार, सरपंच गणपत कुडे, राम शेरकी, नामदेव लढी, नामदेव शेरकी, जे. डी. पोटे, सुरेश थोरात उपस्थित होते.

एस.एस. विर्क यांच्या नियुक्तीने यवतमाळात आनंद
यवतमाळ, १५ मार्च / वार्ताहर
एस.एस. विर्क यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाल्याबद्दल येथील गुरूद्वारात त्यांच्या अनेक चाहत्यांनी पेढे वाटून आनंद साजरा केला तर पोलीस विभागातील अनेक कर्मचाऱ्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.

राहुल खंदारे यांचा सत्कार
अमरावती, १५ मार्च / वार्ताहर

स्लमडॉग मिलिऑनर या ऑस्कर पुरस्कार विजेता चित्रपटाचे प्रॉडक्शन कंट्रोलर राहुल खंदारे यांचा तालुक्यातील कंझारा येथील उर्दू डी.एड. कॉलेज येथे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ. मजीद अ. समद होते. प्रमुख पाहुणे म्हणून जी.एस. वानखडे, एजाजोद्दीन, अ. कादीर होते.

‘बेटी बचाओ’ अभियानांतर्गत मार्गदर्शन शिबीर
गोंदिया, १५ मार्च / वार्ताहर
दृष्टी बहुउद्देशीय विकास संस्थेच्यावतीने ‘बेटी बचाओ’ अभियानांतर्गत महिला मार्गदर्शन शिबीर शारदा वाचनालय सभागृहात नुकतेच झाले. या शिबिराचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक कृष्णा यांनी केले. जिल्ह्य़ात स्त्रीभ्रूण हत्या करणाऱ्याला कायद्याने शिक्षा व्हावयास पाहिजे, व त्यासाठी कायद्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक कृष्णा यांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भिमराव मेश्राम होते.

तरुणाची आत्महत्या
अकोला, १५ मार्च/प्रतिनिधी
तेल्हारा तालुक्यातील थार येथील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. थार येथील मंगेश समाधान फोकमारे (२८) हा तरुण भांबेरी येथे सासुरवाडीला जातो असे सांगून शुक्रवारी घरून निघाला. मात्र, गावाजवळच असलेल्या अंबादास फोकमारे यांच्या शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत तो आढळला. ऑटो चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या मंगेशवर ऑटो फायनान्सचे कर्ज होते अशी माहिती आहे.

खामगावात बीज महोत्सव
खामगाव, १५ मार्च / वार्ताहर
संत शिरोमणी तुकाराम महाराज बीज महोत्सव येथे नुकताच साजरा झाला. दिलीप सानंदा यांनी यावेळी बोलताना तुकोबा सर्वधर्मसमभावाचे समर्थक होते, असे सानंदा यांनी सांगितले. अठरा पगड जातींना एकत्र आणण्याचे महान कार्य तुकोबांनी केले. संत तुकोबा वृक्ष संगोपनाचे सच्चे पुरस्कर्ते होते, असे सानंदा म्हणाले.

खामगावजवळील वाडीत घर व गोठय़ाला आग
खामगाव, १५ मार्च / वार्ताहर
वाडी येथील लक्ष्मी नगर भागात घर व गोठय़ाला आग लागून २० हजार रुपयांचे नुकसान झाले.
अनिल श्रीराम खर्चे यांच्या गोठय़ाला अचानक आग लागली. वेळीच आगीवर नियंत्रण प्राप्त न झाल्याने गोठय़ातील साहित्य व लगतचे घरही आगीने नष्ट झाले.

मारहाण प्रकरणी दाम्पत्यावर गुन्हा
खामगाव, १५ मार्च / वार्ताहर

मारहाण प्रकरणी दाम्पत्यावर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बाळापूर फैल भागातील सुदाम विठ्ठल मारकर व त्याच्या आईचा पैशाच्या कारणावरून वाद सुरू होता.
आकाश विठ्ठल मारकर व शोभा आकाश मारकर यांनी त्यास लाकडी फळीने मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी मारकर दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला.

दुसऱ्या पत्नीच्या घरी पतीची आत्महत्या
अकोला, १५ मार्च/प्रतिनिधी
दुसऱ्या पत्नीजवळ राहणाऱ्या वृद्ध पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी महात्मा फुले नगरात उघडकीस आली. गेल्या आठ दहा वर्षांपासून तो दुसऱ्या पत्नीजवळ राहत हेता. अनंतराव समरथ इंगळे (६०) याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे शनिवारी उघडकीस आले. महात्मा फुले नगरात तो दुसऱ्या पत्नीजवळ राहत हेाता. तेथेच शुक्रवारी रात्री त्याने आत्महत्या केली. अनंतरावच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नसून, सिव्हिल लाईन्स पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर आज
खामगाव तालुका विधिसेवा समितीच्यावतीने राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर उद्या, १६ मार्चला सजनपुरी येथे सायंकाळी ६.३० वाजता आयोजित करण्यात आले आहे. या कायदेविषयक शिबिराचा जास्तीत जास्त महिला व पुरुषांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका विधि सेवा समितीचे अध्यक्ष, जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.एस. शिवणकर यांनी केले आहे.

विजेच्या धक्क्याने मुलगी जखमी
खामगाव, १५ मार्च / वार्ताहर

घरातील उपकरणातून विजेचा धक्का लागल्याने बाळापूर फैल भागातील मुलगी जबर जखमी झाल्याची घटना घडली. दीपमाला संपत दाभाडे या मुलीला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

क्षुल्लक कारणावरून युवकास मारहाण; गुन्हा दाखल
खामगाव, १५ मार्च / वार्ताहर
क्षुल्लक कारणावरून युवकास मारहाण करणाऱ्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बाळापूर फैल भागातील योगेश राळेभात याला सुदाम मारकाने दगड मारला. या तक्रारीवरून पोलिसांनी सुदाम विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दारू बाळगणाऱ्या दोघांवर गुन्हा
विनापरवाना दारू बाळगणाऱ्या दोघांवर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राजेंद्र समाधान गावंडे व गजानन सुखदेव इंगळे हे दोघे दारू घेऊन जात असताना पोलिसांनी त्यांना अडवून तपासणी केली. दारूच्या ५० शिश्या आढळून आल्या.

रंग टाकल्यावरून मारहाण; दोन अटकेत
पुसद, १५ मार्च / वार्ताहर
धुलीवंदनच्या दिवशी रंग टाकण्याच्या वादावरून झालेल्या वादाचे पडसाद शनिवारी उमटले. प्रवीण भीमराव गुथडे (२१) यास शेख अन्सार आणि शेख निसार यांनी लोखंडी सळाखीने मारहाण केली. यात दुथडे हा जबर जखमी झाला. पोलिसांनी आरोपींना तात्काळ अटक केली. वैयक्तिक भांडणाला सामाजिक स्वरूप येऊ नये, याची ठाणेदार ज्ञानेश्वर कडू यांनी विशेष काळजी घेऊन परिस्थिती हाताळली.