Leading International Marathi News Daily

सोमवार , १६ मार्च २००९

विविध

बिन लादेन लपलाय
हिंदकुश पर्वतराजीत..

न्यूयॉर्क, १५ मार्च/पीटीआय

जगातील मोस्ट वॉँटेड दहशतवादी ओसामा बिन लादेन हा पाकिस्तानातील चित्राल भागात हिंदकुश पर्वतराजीत लपून बसला असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. प्रसारमाध्यमांनी लादेन दिसल्याच्या या बातम्या दिल्या असून त्यात कितपत तथ्य आहे हे अजून स्पष्ट झालेले नाही. अमेरिकेने अधिकृतरीत्या लादेनचा ठावठिकाणा जाहीर केलेला नाही. अमेरिकेतील ९/११ च्या हल्ल्यात लादेनचा हात होता व त्या हल्ल्यात सुमारे तीन हजार लोक मारले गेले होते, तेव्हापासून ओसामा बिन लादेन हा मोस्ट वॉँटेड दहशतवादी आहे. चित्राल पर्वतराजी व खोऱ्यांमध्ये तो दडून बसला आहे, असे न्यूयॉर्क डेली न्यूजने म्हटले आहे.

संरक्षणवादी आर्थिक भूमिका टाळण्यावर जी-२० देश राजी
लंडन, १५ मार्च/पीटीआय

जागतिक मंदी संपवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचा निर्धार करतानाच संरक्षणवादी भूमिका टाळण्यावर जी-२० देशांनी भर दिला आहे. जी-२० देशांच्या गटात श्रीमंत व उदयोन्मुख देशांचा समावेश आहे. येत्या दोन एप्रिलला जी-२० देशांच्या प्रमुखांची बैठक लंडन येथे होत असून, त्याच्या पूर्वतयारीसाठी आज अर्थमंत्र्यांची बैठक झाली. संरक्षणवादी धोरण सोडण्याचे सूतोवाच करण्यात आल्याने एक प्रकारे भारताच्या भूमिकेला पाठिंबा मिळाला आहे. लंडन येथे होणाऱ्या बैठकीला पंतप्रधान मनमोहन सिंग हे उपस्थित राहणार आहेत.

‘अडवाणी हेच ‘रालोआ’चे पंतप्रधानपदाचे उमेदवार’
वाराणसी, १५ मार्च/पीटीआय

एनडीएमध्ये पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवरून कुठलेही मतभेद नसून लालकृष्ण अडवाणी हेच आमचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत, असे स्पष्टीकरण भाजप नेते मुरली मनोहर जोशी यांनी आज केले. माजी मनुष्यबळ विकास मंत्री मुरली मनोहर जोशी यांनी पीटीआयला सांगितले की, एनडीएने काही महिन्यांपूर्वी सर्व मित्र पक्षांच्या बैठकीत अडवाणी यांच्या नावाची पंतप्रधानपदासाठी घोषणा केली आहे. त्यामुळे त्याबाबत मतभेद होण्याचा प्रश्नच नाही.

हिमाचल प्रदेशात रॅगिंग विरोधात अध्यादेश काढणार
सिमला १५ मार्च/पीटीआय

रॅगिंगच्या प्रकरणात वैद्यकीय शाखेच्या एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर हिमाचल प्रदेश सरकारने अशी प्रकरणे हाताळण्यासाठी नवीन वटहुकूम जारी करण्याचे ठरवले आहे. १९९२ पासून रॅगिंगबाबतचा कायदा बदलण्यात आलेला नाही. त्यामुळे आता त्यात काही सुधारणा करण्यात येत आहेत.

महात्मा गांधींच्या मौल्यवान वस्तूंचे लखनौस्थित संस्था करणार जतन
नवी दिल्ली, १५ मार्च / पीटीआय

पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरावी म्हणून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी परिधान केलेल्या कपडय़ांप्रमाणेच आता त्यांची पत्रे आणि छायाचित्रे या मौल्यवान ठेव्याचेही जतन करण्यात येणार आहे. लखनौस्थित इंडियन कन्झव्‍‌र्हेशन इन्स्टिटय़ूट यांनी महात्माजींचा कुर्ता आणि अन्य वस्त्रे हा भूतकाळातील आठवणींचा ठेवा जतन केला आहे. आता या संस्थेची तज्ज्ञ मंडळी गांधीजींची वैयक्तिक पत्रे, छायाचित्रे, नोंदवही याचप्रमाणे विविध व्यक्तींना त्यांना दिलेल्या भेटी असा ठेवा जतन करणार आहे. गांधीजींच्या परंपरांचे जतन आणि संवर्धन या प्रकल्पांतर्गत इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अ‍ॅण्ड कल्चरल हेरिटेज विभागातर्फे गांधीजींच्या कपडय़ांचे संवर्धन करून ते तीन वर्षांपूर्वी साबरमती आश्रमाला परत पाठविण्यात आले होते.

गांधीजींच्या वस्तूंचे लखनौची संस्था करणार जतन
नवी दिल्ली, १५ मार्च / पी.टी.आय.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी परिधान केलेल्या कपडय़ांप्रमाणेच आता त्यांची पत्रे आणि छायाचित्रे या मौल्यवान ठेव्याचेही जतन करण्यात येणार आहे. लखनौस्थित इंडियन कन्झव्‍‌र्हेशन इन्स्टिटय़ूट यांनी महात्माजींचा कुर्ता आणि अन्य वस्त्रे हा आठवणींचा ठेवा जतन केला आहे. आता गांधीजींची पत्रे, छायाचित्रे, नोंदवही तसेच विविध व्यक्तींनी त्यांना दिलेल्या भेटी जतन केल्या जाणार आहेत.