Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत मोडता घालणाऱ्यांवर राहुल गांधी नाराज
मुंबई, १६ मार्च/प्रतिनिधी

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या जागावाटपात मोडता घालणाऱ्या राज्यातील एका प्रभावशाली नेत्यावर राहुल गांधी नाराज असल्याचे राहूल गांधी यांचे एक निकटवर्तीय खासदार यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीत वितुष्ट यावे व त्याचे परिणाम राज्य सरकारवरही व्हावेत यासाठी राज्यातील एक माजी मुख्यमंत्री सक्रीय असून असे झाल्यास राज्यात नाहक सेना-भाजपला मोकळे रान मिळेल, असे या खासदाराने राहुल गांधी यांच्या कानावर घातले.

माकपच्या जाहीरनाम्याची घोषणा; युपीए सरकारवर विश्वासघात केल्याचा आरोप
नवी दिल्ली, १६ मार्च/खास प्रतिनिधी

छोटय़ा-मोठय़ा प्रादेशिक पक्षांना एकत्र आणून तिसऱ्या आघाडीचे सूत्रसंचालन करणाऱ्या मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने आज लोकसभा निवडणूक जाहीरनाम्याची घोषणा करताना आज काँग्रेस आणि भाजपच्या धोरणांवर चांगलेच तोंडसुख घेतले. केंद्रातील मनमोहन सिंग सरकारने अलिप्त राष्ट्र चळवळीशी फारकत घेऊन परराष्ट्र धोरणाच्या मुद्यावर देशाचा विश्वासघात केल्याचा आरोप माकपचे सरचिटणीस प्रकाश करात यांनी केला. माकपचे मुख्यालय असलेल्या ए. के. गोपालन भवन येथे आज दुपारी पक्षाचा निवडणूक जाहीरनाम्याची घोषणा करताना करात यांनी मनमोहन सिंग सरकारवर सर्व आघाडय़ांवर अपयशी ठरल्याचा ठपका ठेवला.

पंतप्रधानपदासाठी सपाचे मनमोहन सिंग यांना समर्थन
नवी दिल्ली, १६ मार्च/खास प्रतिनिधी

प्रकाश करात यांच्याकडे माकपचे नेतृत्व असेपर्यंत तिसऱ्या आघाडीत सामील होणार नाही, असा निर्धार आज समाजवादी पार्टीने व्यक्त केला. समाजवादी पार्टीशी उत्तर प्रदेशात काँग्रेसचा जागावाटपाचा समझोता होऊ शकलेला नाही. तरीही पक्षाचे सरचिटणीस अमर सिंह यांनी पंतप्रधानपदासाठी मनमोहन सिंग यांच्याच नावाचे जोरदार समर्थन केले आहे. लोकसभा निवडणुकांनंतर सोनिया गांधी आणि काँग्रेसशिवाय केंद्रात गैरभाजप सरकार सत्तेवर येणे शक्यच नाही, असेही अमर सिंह यांनी म्हटले आहे.

नंदूरबारवरील काँग्रेसच्या गारुडाला उतरती कळा
जयप्रकाश पवार
नाशिक, १६ मार्च

आदिवासीबहुल नंदूरबार लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला. माणिकराव होडल्या गावित हेच साधारणत: अडीचहून अधिक दशकापासून या बालेकिल्ल्याचे निष्ठावान रखवालदार. पर्यायाने दिल्ली दरबारातील मराठी प्रातांचे सर्वाधिक जुनेजाणते म्हणूनही त्यांचा नावलौकीक. पण, एवढा प्रदीर्घ कालावधी या महोदयांच्या नशिबात येवूनही त्यांच्या हातून मतदारसंघात पाहिजे तेवढय़ा प्रमाणात आणि सामान्य आदिवासींना भावेल, अशी कामे होवू शकली नाहीत असा विरोधकांचा रोष.

लोकप्रतिनिधींचा लेखाजोखा आता वेबसाइटवर !
मुंबई, १६ मार्च / प्रतिनिधी

तुमच्या प्रभागाचा नगरसेवक सभागृहात नागरी प्रश्नांवर किती वेळा बोलला, कोणत्या विषयावर बोलला, प्रभागातील किती कामे झाली, कोणत्या पक्षाचे नगरसेवक पालिकेत बोलतात, किती कामे करतात या साऱ्यांचा लेखाजोगा आता वेबसाईटवर उपलब्ध होणार आहे. 'प्रजा डॉट ऑर्ग' नावाने सुरू करण्यात आलेल्या वेबसाईटवर मुंबईतील नगरसेवक, आमदार, खासदार यांची 'खरी' कामगिरी मांडण्यात येणार आहे. मुंबईच्या महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी पालिकेचा कारभार पारदर्शक होण्यासाठी या वेबसाईटवर आवश्यक ती माहिती देण्यात येईल असे स्पष्ट केले.

बिहारमधील नोकरशहा राजकारणात उतरताहेत!
पाटणा, १६ मार्च / वृत्तसंस्था

दिल्लीचे माजी पोलीस आयुक्त आणि काँग्रेसचे बिहारमधील औरंगाबादचे खासदार निखिल कुमार यांच्याकडून प्रेरणा घेऊन अनेक आयपीएल व आयएएस अधिकारी आता राजकारणात उतरू पाहत आहेत. त्यांना खाकी वर्दी नकोशी झाली असून, आता खादी कपडे परिधान करून ते ‘जनसेवा’ करू इच्छित आहेत. पोलीस महासंचालक दर्जाचे एक अधिकारी गुप्तेश्वर पांडे यांनी स्वेच्छा निवृत्त स्वीकारून भाजपचे बक्सर लोकसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहेत.

येडीयुरप्पा यांच्या चिरंजीवासाठी ‘ऑपरेशन लोटस’
शिमोगा, १६ मार्च / वृत्तसंस्था

येत्या लोकसभेच्या निवडणुकीत कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांचे चिरंजीव बी. वाय. राघवेंद्र हे भरघोस मतांनी निश्चित विजयी व्हावेत म्हणून भाजपने ‘ऑपरेशन लोटस’ हाती घेतले आहे. भाजपच्या अलीकडेच पार पडलेल्या निवडणूक समितीच्या बैठकीस संबोधताना मुख्यमंत्री म्हणाले, की राघवेंद्रराव यांचा विजय निश्चितपणे व्हायला हवा आणि त्यासाठी तळाच्या कार्यकर्त्यांपासून अगदी वरिष्ठ नेत्यांपर्यंत सर्वानी काटेकोरपणे काम करायला हवे.

आठवणीतील लढती
लाट आणि ललाट!

लाट ही अशी चीज आहे, की ती एखाद्याचे ‘ललाट’ बदलू शकते. हेच सामथ्र्य ग्रहांमध्येही आहे; असे म्हटले जाते. केवळ ग्रहांच्या प्रतिकूल स्थितीमुळे जगज्जेत्या नेपोलिअन बोनापार्टला वॉटर्लूच्या लढाईत हार खावी लागली होती. शौर्य त्याच्याठायी नेहमीप्रमाणे तेव्हाही होतेच; परंतु ग्रहमान अनुकूल नसल्याने ऐनवेळी ते निकामी ठरले असे म्हणतात. १९८४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस (आय)चे माधवराव शिंदे आणि भाजपचे अटलबिहारी वाजपेयी यांच्यातील सामना ‘लाट आणि ललाट’ अशाच स्वरूपाचा म्हणावा लागेल. ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी इंदिरा गांधी यांची हत्या झाल्याने काँग्रेसच्या बाजूने सहानुभूतीची लाट होतीच. काँग्रेसला त्याची पुरेपूर कल्पना असल्याने उमेदवार निवडीबाबत त्यावेळी फार विचार केला गेला नाही.

प्रचारासाठी हेलिकॉप्टर्सची टंचाई
नवी दिल्ली, १६ मार्च / वृत्तसंस्था

यंदाचा लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना प्रचारासाठी हेलिकॉप्टर्स हवी आहेत. मात्र हेलिकॉप्टर्सची उपलब्धता कमी आणि मागणी जास्त, अशी एकंदर अवस्था असल्याने हेलिकॉप्टर उपलब्ध न झाल्यास मोटारींतूनच धावपळ करणे काही नेत्यांच्या नशिबी येणार असे एकंदरीत चित्र आहे. देशांतर्गत प्रवासासाठी एकंदर १४५ हेलिकॉप्टर्स उपलब्ध असताना मागणी मात्र २५० हेलिकॉप्टर्सची आहे.

हातकणंगलेत प्रकाश आवाडेंच्या बंडखोरीचे संकेत
इचलकरंजी, १६ मार्च / वार्ताहर

हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये माजी मंत्री आमदार प्रकाश आवाडे यांचा बंडखोरी करण्याचा निर्णय जवळपास निश्चित झाला आहे. एकदोन दिवसात ते स्वत: या निर्णयाची घोषणा करण्याची दाट शक्यता आहे. आवाडे यांच्या हालचाली व त्यांनी मतदार संघातील प्रमुखांशी साधलेला संपर्क पाहता ते प्रचाराची सुरुवात उमेदवारीची घोषणा केल्यानंतर लगेचच करतील असे दिसत आहे. गेल्या पंधरवडय़ापासून आमदार प्रकाश आवाडे हे लोकसभा निवडणुकीच्या िरगणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. चर्चेच्या पातळीवर असणारा हा मुद्दा आता त्याच्या कृतीतून सिद्ध होत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्यांचा हा निर्णय पाहता हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या खासदार श्रीमती निवेदिता माने यांच्याशी चुरशीची लढत होणार आहे. मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलू लागली आहेत. रविवारी (१५ मार्च) आमदार आवाडे यांचा ५६ वा वाढदिवस होता. लोकसभा निवडणूक लढविण्याचे निश्चित केल्याने वाढदिवसाचे कोणतेही कार्यक्रम आचारसंहितेचे उल्लंघन होण्याच्या शक्यतेने घेतले नव्हते. त्या निमित्ताने होणारी माध्यमातील जाहिरातबाजीही बोलकी होती. वाढदिवशी ते शहरात नव्हते. पण त्यांना शुभेच्छा देणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी, नागरिकांनी त्यांना लोकसभा निवडणूक लढविण्याचा जोरदार आग्रह केला. कार्यकर्त्यांनी आग्रहपूर्वक केलेली मागणी फलद्रूप होण्याची शक्यता आता स्पष्टपणे जाणवू लागली आहे.

लालू-राबडींचे मंदिर बांधणे पडले महागात
सासराम, १६ मार्च/पीटीआय

बिहारमधील रोहतस जिल्ह्य़ात आलमपूर खेडय़ामध्ये लालू-राबडी यांचे मंदिर बांधण्यात येत असून निवडणूक अयोगाने या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. मंदिर उभारणीत पुढाकार घेणारे राजेश्वर यादव यांना निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर अटक करण्यात आली पण नंतर त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. या मंदिरासाठी ५४ लाख रुपये खर्च येणार आहे. राजेश्वर यादव हे लालू-राबडी जोडप्याचे कट्टर समर्थक असून त्यांनी १ मार्चला या मंदिराचे भूमिपूजन केले होते. बड्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हे मंदिर येते. येथून २० कि.मी अंतरावर हे मंदिर २८०० चौरस फूट क्षेत्रात उभारण्यात येत आहे. मंदिराच्या इमारतीचे काम जोरात सुरू असतानाच निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली आहे, दरम्यान पोलिसांनी राजेश्वर यादव यांना अटक केली असून त्यांच्यावर निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे, असे पोलीस अधीक्षक विकास वैभव यांनी सांगितले. अटक केल्यानंतर लगेचच त्यांना जामिनावर सोडण्यात आले. यादव यांच्या मातोश्री मुखिया देवी या मंदिर उभारणीत मोठी भूमिका पार पाडीत असून त्यांनी मोठी जमीनही दिली आहे. सार्वजनिक देणग्याही गोळा करण्यात आल्या आहेत. लालू-राबडी म्हणजे कृष्ण-राधेचे अवतार आहेत, असे या मंडळींचे म्हणणे आहे. मुखिया देवी यांनी सांगितले की, लालू-राबडी या दोघांनी गरिबांच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले आहेत, त्यांची प्रतिष्ठा वाचवली आहे.

शेकडो मुस्लिम नेते, कार्यकर्ते भाजपत
नवी दिल्ली, १६ मार्च/ पी.टी.आय.

गाझियाबाद जिल्ह्य़ातील शेकडो मुस्लिम नेते आणि कार्यकर्ते आज भाजपमध्ये दाखल झाल्याने भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांचे गाझियाबाद लोकसभा मतदारसंघातून विजयी होण्याच्या आशा दुणावल्या आहेत. गेल्या ५० वर्षांत काँग्रेसने आमची खूप प्रतारणा केली आमचे भवितव्य अधांतरी राहिले म्हणून आम्ही आमच्या मुलांच्या चांगल्या भवितव्याच्या आशेने भाजपात प्रवेश केला आहे. या पक्षाच्या विजयासाठी आम्ही तन-मनाने काम करणार आहोत, असे येथील एक कार्यकर्ते राजा मथीन नूरी यांनी सांगितले. या वेळी राजनाथ सिंगसुद्धा उपस्थित होते. येथील मोठय़ा जनसमुदायाला संबोधून भाषण करताना राजनाथ सिंह म्हणाले की, आमचे नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार सत्तेवर आल्यास मुस्लिम समाजाच्या उत्कर्षांसाठी त्यांच्या मुलांच्या शिक्षण आणि नोकरी-व्यवसायांसाठी चांगल्या योजना राबविण्याचे मी आश्वासन देतो. गेल्या ५० वर्षांत काँग्रेसने सतत दुटप्पी धोरण राबवून मुस्लिम समाजाला अंधारात ठेवले. रालोआच्या अवघ्या सहा वर्षांच्या सत्ता काळात बऱ्याच हितकारी योजना राबविण्याचे छाननी समितीने आपल्या निष्कर्षांत म्हटले आहे आणि म्हणून पुन्हा रालोआ सत्तेवर आल्यास या समाजाला आम्ही निश्चितच न्याय देऊ! या कार्यक्रमाला पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाचे प्रमुख शहनवाझ हुसेन हेही उपस्थित होते.