Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
लोकमानस

निवडणूक बोहल्यावर चढण्यापूर्वी..!

 

पंधराव्या लोकसभेच्या गठणासाठी लवकरच देशभर सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. ‘नेमेचि येतो मग पावसाळा’ प्रमाणे आरोप-प्रत्यारोप, धार्मिक, प्रादेशिक, जातीय भावनांना फुंकर घालून मतदारराजाचे तुष्टीकरण करण्याचा आटोकाट प्रयत्न निवडणुकीच्या मैदानात उतरणाऱ्या सर्वच पक्ष, संघटनांकडून केला जाणार आहे. निवडणुकीत कुठल्याही एका पक्षाला स्वबळावर निर्विवाद बहुमत मिळवणे असंभव असल्यामुळे आघाडी विळ्याभोपळ्याची मोट बांधणे अपरिहार्य ठरणार आहे. स्थानिक, प्रादेशिक पक्षांना त्यामुळे अवाजवी, अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होणार आहे. निवडणुका संपल्यावर आशिया खंडातली सर्वात मोठी अखंडीत लोकशाही म्हणून उदो, उदो करत स्वत:ची पाठ थोपटून घेणार. परंतु, नि:पक्षपातीपणे आत्मपरीक्षण केल्यास ती आत्मवंचना असल्याचे आढळून येईल. देशाचे सार्वभौमत्व अबाधित राखण्यासाठी जाज्ज्वल्य राष्ट्रीय भावनेबरोबरच देशाची आर्थिक स्थिती सुदृढ असणे क्रमप्राप्त आहे.
सांप्रत आपला देश कर्जात बुडत चाललाय, नवकोट नारायणांची संख्या वाढत आहे, संघटित कर्मचाऱ्यांच्या पदरात पगारवाढीचे माप टाकून त्यांना संतुष्ट केले जात आहे. मध्यम वर्गातून नवश्रीमंत मध्यमवर्ग उदयास येत आहे. तर दुसऱ्या बाजूला असंघटित कामगार शेतकरी, भूमिहीन आदिवासी आदीदारिद्रय़ रेषेखाली जीवनमान जगणाऱ्यांची संख्या कितीतरी पटीने वाढत आहे. वाढत्या आर्थिक दरीमुळे ‘आहे रे’वाल्यांचे अस्तित्व ‘नाही रे’वाल्यांच्या असंतोषाच्या उद्रेकामुळे धोक्यात येणार आहे, ज्याचे पर्यवसन देशाच्या विघटनामध्ये अटळ आहे. रशियाच्या पतनाबरोबर अन् चीनने आर्थिक सुधारणेचा मार्ग अनुसरल्यावर समाजवादी अर्थव्यवस्थेचा प्रयोग फसला आहे तर आर्थिक मंदीच्या झंझावातात अमेरिकेच्या अनियंत्रित भांडवलशाहीचे पितळ उघडे पडले आहे. निवडणुकीच्या बोहोल्यावर चढणाऱ्यांकडे देश एकसंघ राखण्यासाठी कोणता ठोस आर्थिक कार्यक्रम आहे?
विनायक वढावकर, अंधेरी, मुंबई

हे तर सत्तेचे दलाल!
‘काँग्रेसची दिवाळखोरी’ हा अग्रलेख (७ मार्च) वाचला. तो सर्वच राजकारण्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारा आहे. विजय मल्ल्यांना पुढे करण्यापेक्षा महात्माजींच्या नावाने मते मागणाऱ्या काँग्रेसनेच या वस्तू लिलावात विकत घ्यायला हव्या होत्या, हे अग्रलेखात व्यक्त केलेले मत रास्त आहे. काँग्रेसवाल्यांना महात्माजी आणि त्यांचे विचार हवे आहेत ते फक्त सत्तेच्या राजकारणापुरते. त्यांच्या आदर्शाशी सत्ताधीशांचा काही संबंध नाही.
महात्माजींच्या या स्वप्नांचा चुराडा स्वार्थी राजकारण्यांनी केला. त्यांचे विचार फक्त पुस्तकांतच राहिले. गांधीजींच्या आदर्श विचारांनुसार जनतेने त्याग करावा, असे उपदेशाचे डोस आमचे नेते जनतेला पाजतात. दोन लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यावर पंतप्रधानांनी आर्थिक पॅकेज जाहीर केले.
सवंग लोकप्रियता मिळविण्यासाठी कर्जे माफ करण्यात आली. ‘कर्जमाफी आम्हीच केली’, असे नगारे पिटत शेतकऱ्यांचे जाणते राजे क्रिकेट आयपीएल स्पर्धा वगैरेंमध्ये मश्गुल होत, पेपरमध्ये पानभर जाहिराती देत पंतप्रधानकीचे स्वप्न पाहू लागले. शेतकऱ्यांच्या समस्या मात्र कायम राहिल्या. वास्तविक महात्मा गांधी राजकारणातल्या नैतिकतेलाच सर्वाधिक महत्त्व देत. आजच्या राजकारण्यांना त्याचे महत्त्व काय कळणार?
विवेक ढापरे, कराड

..यांना दलितांची मते मागण्याचा नैतिक अधिकार नाही!
महाराष्ट्राची लोकसंख्या २००१च्या जनगणनेनुसार नऊ कोटी ६८ लाख ७८ हजार ६२७ आहे. तर दलितांची (नवबौद्धासह अनुसूचित जातींची) लोकसंख्या एक कोटी ५७ लाख २० हजार ३६८ आहे. म्हणजे १६.२ टक्के आहे या १६.२ टक्क्यांमध्ये नवबौद्धांची संख्या सहा टक्के आहे. नवबौद्धांना अनुसूचित जातीच्या सर्व सवलती, घटना आदेश १९ मध्ये १९९०ला संशोधन करून शिखांप्रमाणेच देण्यात आल्या आहेत.
या घटनात्मक तरतुदीनुसार, महाराष्ट्र शासनाने नोकऱ्यांकरिता अनुसूचित जातींना १६.२ टक्केनुसार आरक्षण ठेवण्याचा आदेश अद्याप काढलेला नाही. त्यामुळे बजेटमध्ये दलितांना सहा टक्केकमी निधी उपलब्ध होत आहे. ही शासनाची कृती घटनाविरोधी आहे. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीत दलितांची मते मागण्याचा काहीच नैतिक अधिकार नाही.
केंद्र सरकारने त्यांच्या वर्ग ३ व ४ च्या महाराष्ट्रातील दलित कर्मचाऱ्यांकरिता फक्त १० टक्केच आरक्षण ठेवण्याचा आदेश २००५ ला काढला आहे. घटनात्मक तरतुदीनुसार दलितांकरिता १६.२ टक्के आरक्षण ठेवावयास पाहिजे होते. त्यामुळे दलितांना केंद्रीय बजेटमध्ये महाराष्ट्रात सहा टक्के कमी निधी उपलब्ध होत आहे. ही केंद्र सरकारची कृती घटनाविरोधी आहे. त्यामुळे यु.पी.ए. सरकारलासुद्धा येत्या लोकसभेच्या निवडणुकीत दलितांची मते मागण्याचा काहीच नैतिक अधिकार नाही.
२३ डिसेंबर २००८ला राज्यसभेने अनुसूचित जातीजमाती आरक्षण विधेयक यू.पी.ए. व एन.डी.ए.ने चर्चा न करता संमत केले. हे विधेयक ८५व्या घटना दुरुस्तीला विरोध करणारे आहे. ८५व्या घटना दुरुस्तीमुळे अनुसूचित जातीजमातींना वर्ग १ मधील सर्व पदांकरिता बढतीमध्ये आरक्षण देण्यात आले आहे. परंतु राज्यसभेच्या संमत झालेल्या बिलामध्ये बढतीमधील आरक्षण फक्त वर्ग १च्या खालच्या पदापर्यंतच ठेवण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या सर्व विद्यापीठांत मॅनेजमेंट संस्थांमध्ये, आय.आय.टी.मध्ये, मेडिकल कॉलेजमध्ये अशा ४० संस्थांमध्ये हे बढतीमधील आरक्षण फक्त वर्ग १च्या खालच्या पदापर्यंतच ठेवण्यात आले आहे व ८५ वी घटना दुरुस्ती दुर्लक्षित करण्यात आली आहे. तेव्हा यू.पी.ए. व एन.डी.ए. हे दोन्ही दलितांच्या विरोधात आहेत, हे या विधेयकावरून सिद्ध होते. या विधेयकाची १२ फेब्रुवारीला देशभरातील दलित संघटनांनी जाहीर होळी केली व २४ फेब्रुवारीला दिल्लीत दलित संघटनांचा एक मोर्चा, दलितांचे आरक्षण कायम रहावे म्हणून आयोजित केला होता. या विधेयकामुळे यू.पी.ए.बरोबर एन.डी.ए.लाही दलितांची मते मागण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही.
राज्यसभेमध्ये संमत झालेल्या या दलितविरोधी विधेयकामुळे आता राज्यसभा व विधान परिषदांमध्येही आरक्षण ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.
रमेश रंगारी, कांदिवली, मुंबई

‘श्री’ सिनेमाची आठवण झाली!
प्लाझा सिनेमात ‘स्लमडॉग करोडपती’ पाहिला. ‘जय हो’ची आतुरतेने वाट बघत होतो. पण सिनेमा संपला तरी हे गाणे आलेच नाही. शेवटी निम्मेअधिक लोक बाहेर गेल्यावर ‘जय हो’ दाखवायला सुरुवात झाली. दुसरे गाजलेले गाणे ‘ओ साया’ तर दाखवलेच नाही. यामुळे मला माहीममधल्या जुन्या ‘श्री’ सिनेमाची आठवण आली.
‘श्री’ सिनेमात तर कधीकधी आधीचे रीळ नंतर व नंतरचे आधी दाखवत असत. आधीच्या रिळात मेलेला हीरो पुढच्या रिळात जिवंत होत असे! प्लाझामध्ये सिनेमा पाहण्याचा एकच फायदा म्हणजे तिकिटांच्या किमती कमी आहेत. बाकी सुविधा शून्य, दृश्याचा दर्जा अगदीच सुमार!
श्रीकांत पाटील, माहीम, मुंबई

दर्जा सुमार, आठ पुरस्कार
तब्बल आठ ऑस्कर अ‍ॅवार्ड्स एकाच वेळी खिशात घालण्याचा इतिहास घडविणाऱ्या ‘स्लमडॉग मिलिऑनर’वर परखडपणे लिहिण्याचे ‘धैर्य’ दाखविल्याबद्दल अवधूत परळकर यांचे, माझ्यासारखे शेकडो चोखंदळ प्रेक्षक मनापासून अभिनंदन करतील! इतक्या सुमार दर्जाच्या चित्रपटावर ऑस्करचा पाऊस कसा काय पडू शकतो हे अनाकलनीय आहे. अर्थात पत्रलेखक परळकर यांनीच त्याचे उत्तरही दिले आहे. पुरस्कार मिळालेले सर्वच चित्रपट श्रेष्ठ असतातच असे नाही. (पूर्वी जगभर गाजलेला ‘टायटॅनिक’ व सध्या मराठीत धुमकूळ घालणारा ‘सही रे सही’ हे याच जातकुळीत मोडणारे.)
सुरेश कडपा, डोंबिवली