Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९

मोहिते-पाटील द्वयींमध्ये समेटाची कार्यकर्त्यांना आशा
माळशिरस, १६ मार्च/वार्ताहर

माढय़ासाठी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांची उमेदवारी जाहीर झाली,तसेच त्यांच्या अकलूजच्या प्रचार कार्यालयाचे शानदार उद्घाटनही झाले. मात्र दरम्यान झालेल्या नातेपुते येथील सभेच्या वेळी दादा व पपांना पवारांसोबत बघितल्याने शेवटच्या क्षणी काहीतरी घडेल, अशी भाबडी अपेक्षा तालुक्यातील मोहिते-पाटीलप्रेमींना वाटू लागली आहे.

हातकणंगलेत प्रकाश आवाडे यांचे बंडखोरी करण्याचे संकेत
इचलकरंजी, १६ मार्च / वार्ताहर

हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये माजी मंत्री आमदार प्रकाश आवाडे यांचा बंडखोरी करण्याचा निर्णय जवळपास निश्चित झाला आहे. एकदोन दिवसात ते स्वत: या निर्णयाची घोषणा करण्याची दाट शक्यता आहे. आवाडे यांच्या हालचाली व त्यांनी मतदार संघातील प्रमुखांशी साधलेला संपर्क पाहता ते प्रचाराची सुरुवात उमेदवारीची घोषणा केल्यानंतर लगेचच करतील असे दिसत आहे.

सांगलीतील दोन घटना : ठेवीदाराला मारहाण केल्याने भाजप नेता पोलिसांच्या ताब्यात
सत्याविजय बँक कर्मचाऱ्यांची माजी नगरसेवकाला मारहाण
सांगली, १६ मार्च / प्रतिनिधी
एका ठेवीदाराला मारहाण केल्याप्रकरणी भाजपचे माजी शहर जिल्हाध्यक्ष हणमंत पवार यांना पोलिसांनी सायंकाळी ताब्यात घेतल्याने पोलीस ठाण्याच्या आवारात काही काळ तणावाचे वातावरण होते. तर दुसऱ्या एका घटनेत सत्यविजय सहकारी बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भाजपचे माजी नगरसेवक अजित आडवाणी यांना कर्जवसुलीसाठी जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. या दोन्ही घटनेची सांगली शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

मतदान ओळखपत्रांचे आटपाडीत वाटप
आटपाडी, १६ मार्च / वार्ताहर

वारणानगर येथील सुराज्य फाऊंडेशनच्या वतीने आटपाडी तालुक्यातील काळेवाडी येथे ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्राचे वाटप सरपंच श्रीमती सीताबाई काळे, अण्णासाहेब काळे, दीपक गुंडेकर व संदीप जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. सुराज्य फाऊंडेशनने राबविलेला हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत सरपंच श्रीमती काळे यांनी व्यक्त केले. बाबुराव रास्ते व ज्येष्ठ नागरिकांनी ओळखपत्र दिल्याबद्दल सुराज्य फाऊंडेशनचे आभार मानले.
या वेळी तालुका व्यवस्थापक दीपक गुंडेकर यांनी सुराज्य फाऊंडेशनच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. अपारंपरिक ऊर्जामंत्री विनय कोरे व फाऊंडेशनचे अध्यक्ष एन. एच. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

ब्राह्मण वधू-वर मेळाव्याचे आयोजन
माळशिरस, १६ मार्च/वार्ताहर

अकलूज येथील ब्राह्मण सेवा संघ व गणपती मंदीर ट्रस्टच्या वतीने २८ मार्च रोजी कर्मवीर बाबासाहेब माने-पाटील खुल्या नाटय़गृहात सर्वपक्षीय ब्राह्मण वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन केले आहे. इच्छुकांनी २० मार्चपर्यंत भ्रमणध्वनी क्रमांक ९४२२०६८८५१ व ९८६०३१२९९५ वर नावे नोंदवावीत, असे आवाहन ब्राह्मण सेवा संघाचे अध्यक्ष अण्णा कुलकर्णी यांनी केले आहे.

व्यक्ती विकास केंद्रातर्फे महानवचेतना शिबिर
सोलापूर, १६ मार्च/प्रतिनिधी

व्यक्ती विकास केंद्राच्या वतीने सोलापुरात पार्क स्टेडियममध्ये दि. २६ ते २९ मार्च दरम्यान महानवचेतना शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात शहरी व ग्रामीण भागातील स्त्री-पुरुषांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे. पहाटे ५ ते ८ व सायंकाळी ७.३० ते १० पर्यंत चालणाऱ्या या शिबिरात सुमारे एक लाख नागरिकांचा सहभाग असेल, अशी अपेक्षा संस्थेचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक महेशगिरीजी यांनी सांगितले. देशात विविध ठिकाणी संस्थेने महानवचेतना शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. ही संस्था जगातील १५५ देशांमध्ये कार्यरत आहे.

राज्यपाल एस. सी. जमीर आज पाचगणीत
सातारा, १६ मार्च/प्रतिनिधी
महाराष्ट्राचे राज्यपाल एस. सी. जमीर मंगळवारी १७ मार्च रोजी सातारा जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर येत आहेत. ते पाचगणी येथे संजीवन विद्यालयास भेट देऊन महाबळेश्वरला मुक्काम करणार आहेत.
राज्यपाल एस. सी. जमीर हे मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता मुंबई येथून शासकीय हेलिकॉप्टरने पाचगणीकडे प्रयाण करणार आहेत. सायंकाळी ४.५० वाजता त्यांचे संजीवन विद्यालय ट्रस्ट हायस्कूल पाचगणी येथील हेलिपॅडवर आगमन, सायंकाळी ५ ते ६.३० संजीवन हायस्कूलला भेट देऊन राज्यपाल महाबळेश्वरकडे प्रयाण करणार आहेत. त्यांचे सायंकाळी ७ वाजता जुने राजभवन महाबळेश्वर येथील गिरिचिंतन बंगला येथे आगमन व मुक्काम होणार आहे. बुधवारी १८ मार्च रोजी सकाळी १० वाजता पोलोग्राऊंड महाबळेश्वर येथील हेलिपॅडवरून शासकीय हेलिकॉप्टरने राज्यपाल राजभवन मुंबईकडे प्रयाण करणार आहेत.

अल्पवयीन मेहुणी जावयाने पळवली!
सातारा, १६ मार्च/प्रतिनिधी
जाधववाडी (ता. कोरेगाव) येथील विवाहित मुलीच्या बापानेच आपली दुसरी अविवाहित मुलगी घेऊन जावई फरार झाल्याची तक्रार वाठार पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी या लफडेखोर जावयाचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. संतोष तुकाराम मोहिते (मु.पो. कोलतरे, ता. दापोली, जि. रत्नागिरी) या जावयाचा विवार चार वर्षांपूर्वी सुवर्णा हिच्याशी झाला होता. सहा महिन्यांपूर्वीच तिच्या बाळंतपणात घरकामात मदत करण्यासाठी १७ वर्षांच्या तिच्या बहिणीला कोलतरे येथे पाठविले होते. तिथे राहिल्यानंतर १२ फेब्रुवारी रोजी या दोन्ही मुली व सहा महिन्यांची नात हे जाधववाडी येथे आले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी वाठार स्टेशन येथे कपडे शिवण्यासाठी जाते, असे सांगून धाकटी बहीण घरातून निघून गेली.

वीरशैव सभेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी प्रा. झपके
सोलापूर, १६ मार्च/प्रतिनिधी
महाराष्ट्र वीरशैव सभेच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या अध्यक्षपदी सांगोल्याचे प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, तर सरचिटणीसपदी महेश अंदेली यांची एकमताने निवड करण्यात आली. लिंगशेट्टी मंगल कार्यालयात संघटनेचे मावळते जिल्हाध्यक्ष नागनाथ तोडकर यांच्या अध्यक्षतेखाली निवडलेले पदाधिकारी पुढीलप्रमाणे- कार्याध्यक्ष- संजय देशमुख, मल्लिनाथ विभूते, डॉ. चंद्रशेखर हविनाळे, सुरेश घोंगडे (मोहोळ), चिटणीस- प्रा. भीमराव कोरे, विवेक देवणे (बार्शी), खजिनदार- राजेंद्र मायनाळ, महिला संघटक- विजया थोबडे, सहसंघटक- चित्रा वनेरकर, युवा संघटक-चिदानंद वनारोटे, सहसंघटक- गौरीशंकर जक्कापुरे, सिद्धाराम कलशेट्टी. बैठकीस डॉ. शिवमूर्ती शाहीर, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, सिद्धय्या स्वामी-हिरेमठ, महेश थोबडे, नरेंद्र गंभीरे, गुरुनाथ करजगीकर, प्रकाश हत्ती आदींची उपस्थिती होती.

लोकमंगलच्या शिबिरात २५७ रुग्णांची तपासणी
सोलापूर, १६ मार्च/प्रतिनिधी

लोकमंगल हॉस्पिटलच्या वतीने मुस्ती (ता. दक्षिण सोलापूर) येथे सर्व रोगनिदान शिबिर आयोजिले होते व शिबिरात २५७ रुग्णांची तपासणी करून मोफत उपचार करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन सरपंच राजेंद्र गायकवाड यांच्या हस्ते आणि ग्रामविस्तार अधिकारी पठाण यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. शिबिरात वैद्यकीय अधीक्षक डॉ. बी. जी. शितोळे, कर्करोगतज्ज्ञ डॉ. राजशेखर स्वाती, कान-नाक-घसातज्ज्ञ डॉ. राहुल खांडेकर, नेत्ररोगतज्ज्ञ लीना अंबरकर यांनी रुग्णांची तपासणी केली.