Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

मोहिते-पाटील द्वयींमध्ये समेटाची कार्यकर्त्यांना आशा
माळशिरस, १६ मार्च/वार्ताहर

 

माढय़ासाठी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांची उमेदवारी जाहीर झाली,तसेच त्यांच्या अकलूजच्या प्रचार कार्यालयाचे शानदार उद्घाटनही झाले. मात्र दरम्यान झालेल्या नातेपुते येथील सभेच्या वेळी दादा व पपांना पवारांसोबत बघितल्याने शेवटच्या क्षणी काहीतरी घडेल, अशी भाबडी अपेक्षा तालुक्यातील मोहिते-पाटीलप्रेमींना वाटू लागली आहे.
माढा या पुनर्रचीत लोकसभेच्या खुल्या मतदारसंघाच्या निर्मितीपासून अनेकांना खासदारकीची स्वप्ने पडत होती. कित्येकांनी उमेदवारी घोषित करून प्रचाराच्या फेऱ्याही पूर्ण केल्या. याच दरम्यान राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह व बंधू प्रतापसिंह यांची नावे पुढे येवून नवा वाद चव्हाटय़ावर आला. वास्तविक या घराण्यास अनेकवेळा अशा वादातून जावे लागल्याचे व त्या त्या वेळी त्यावर तोडगा निघाल्याचे तालुक्यातील जनतेने पाहिले आहे. १९९८ साली प्रतापसिंहांनी भाजपात प्रवेश केला व त्यानंतर त्यांच्या पत्नी पद्मजादेवी मोहिते-पाटील व त्यांचे दीर मदनसिंह मोहिते पाटील यांच्यात सरळ लढत झाली होती. कालांतराने वातावरण शांत झाल्यानंतर तब्बल १० वर्षांनी पुन्हा नेमकी हीच परिस्थिती समोर आली.
वास्तविक मागे हटण्यास कुणी तयार नसले तरीही यावर तोडगा निघेल ही तालुक्यातील मोहिते-पाटील समर्थकांची भाबडी समजूत होती. अशातच या मतदारसंघातील पवार यांची उमेदवारी स्वत: विजयसिंह मोहिते-पाटील यांनी घोषित केली तर पवार यांनी त्यास दुजोरा दिला व तालुक्यातील मोहिते पाटील प्रेमींच्या आशा मावळल्या. पवारांनी मतदारसंघाचा दौरा करताना नातेपुते येथे आयोजित केलेल्या सभेसाठी शरद पवार हे विजयसिंह मोहिते पाटील व प्रतापसिंह मोहिते पाटील यांना एकत्रित आपल्या गाडीतून घेऊन आल्याचे सर्व मोहिते-पाटील प्रेमींनी पाहिले व दादा-पपांना एकत्र पाहिल्यावर अजूनही काहीतरी घडेल या भोळ्या आशावादाच्या चर्चेला सुरुवात झाली.