Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

हातकणंगलेत प्रकाश आवाडे यांचे बंडखोरी करण्याचे संकेत
इचलकरंजी, १६ मार्च / वार्ताहर

 

हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये माजी मंत्री आमदार प्रकाश आवाडे यांचा बंडखोरी करण्याचा निर्णय जवळपास निश्चित झाला आहे. एकदोन दिवसात ते स्वत: या निर्णयाची घोषणा करण्याची दाट शक्यता आहे. आवाडे यांच्या हालचाली व त्यांनी मतदार संघातील प्रमुखांशी साधलेला संपर्क पाहता ते प्रचाराची सुरुवात उमेदवारीची घोषणा केल्यानंतर लगेचच करतील असे दिसत आहे.
गेल्या पंधरवडय़ापासून आमदार प्रकाश आवाडे हे लोकसभा निवडणुकीच्या िरगणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. चर्चेच्या पातळीवर असणारा हा मुद्दा आता त्याच्या कृतीतून सिद्ध होत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्यांचा हा निर्णय पाहता हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या खासदार श्रीमती निवेदिता माने यांच्याशी चुरशीची लढत होणार आहे. मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलू लागली आहेत.
रविवारी (१५ मार्च) आमदार आवाडे यांचा ५६ वा वाढदिवस होता. लोकसभा निवडणूक लढविण्याचे निश्चित केल्याने वाढदिवसाचे कोणतेही कार्यक्रम आचारसंहितेचे उल्लंघन होण्याच्या शक्यतेने घेतले नव्हते. त्या निमित्ताने होणारी माध्यमातील जाहिरातबाजीही बोलकी होती. वाढदिवशी ते शहरात नव्हते. पण त्यांना शुभेच्छा देणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी, नागरिकांनी त्यांना लोकसभा निवडणूक लढविण्याचा जोरदार आग्रह केला. कार्यकर्त्यांनी आग्रहपूर्वक केलेली मागणी फलद्रूप होण्याची शक्यता आता स्पष्टपणे जाणवू लागली आहे. विद्यमान खासदार निवेदिता माने यांच्याविषयीची नाराजी व मतदारसंघातून मिळणारा प्रतिसाद या आधारे आवाडे यांच्याकडून निवडणूक लढविण्याचे निश्चित झाले असून कार्यकर्त्यांना कामाला लागा असा संदेश दिला गेला आहे. इचलकरंजी परिसरात आमदार प्रकाश आवाडे यांनी विकासाची मोठी कामे केली आहेत. ते खासदार झाले तर केंद्र शासनाच्या विविध योजनांचा निधी अधिक प्रमाणात लोकसभा मतदारसंघात आणू शकतील. परिणामी विकासकामे होतील अशी अपेक्षा जनमानसातून व्यक्त होत आहे.