Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

कंटेनरला टेम्पोची धडक बसून दोघे जागीच ठार; एक जखमी
सांगली, १६ मार्च / प्रतिनिधी

 

मिरज-पंढरपूर मार्गावरील आगळगाव फाटय़ानजीक थांबलेल्या मालवाहू कंटेनरला भरधाव टेम्पोने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात चंदर शिवराम कोळेकर (वय ६५, रा किडेबिसरी, ता. सांगोला) व रायाप्पा कसाप्पा बोसगी (वय ५०, रा. सोमदेवरट्टी, जि. विजापूर) हे दोघेजण ठार झाले. हा अपघात सोमवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडला.
आगळगाव फाटय़ानजीक सिमेंट पाईपने भरलेला एक कंटेनर (एमएच ०६, एक्यू- ९९८) हा थांबला होता. याच वेळी विजापूर जिल्हय़ातील सोमदेवरट्टी येथील टाटा टेम्पो (क्रमांक- केए- २८, ५८६५) हा तासगाव येथील बेदाणा सौद्यासाठी घेऊन निघाला होता. सकाळी साडेअकरा वाजता या टेम्पोने कंटेनरच्या पाठीमागील बाजूस जोराची धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की टेम्पोचा अक्षरश: चक्काचूर झाला. या वेळी टेम्पोत चालक, क्लीनरसह नागज फाटा येथे उतरणारे दोन प्रवासी होते. या अपघाताचे वृत्त समजताच नागजचे माजी उपसरपंच भाऊसाहेब शिंदे यांनी अन्य प्रवाशांच्या मदतीने टेम्पोतील जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना शशिकांत पाटील यांच्या रुग्णवाहिकेतून कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेले. वाटेत चंदर कोळेकर व रायाप्पा बोसगी यांचे निधन झाले.
या अपघातात टेम्पोचालक आमगोंडा रायाप्पा बोसगी (वय ३०) हा किरकोळ जखमी झाला आहे. तर शैलेश रंगनाथ गायकवाड (वय २८, रा अंजनी) हा गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी सांगलीला हलविण्यात आले आहे. मृत चंदर कोळेकर हे दोन दिवसांपूर्वी नांगोळा येथील पाहुण्याकडे आले होते. किडेबिसरी येथे चुलतीचे निधन झाल्याचे वृत्त समजताच ते आपल्या मूळ गावी परतत होते. कुची येथे ते या टेम्पोत बसले होते. दुसरे मृत रायाप्पा बोसगी हे टेम्पोचालक आमगोंडा बोसगी याचे वडील आहे. जखमी शैलेश गायकवाड हा सुजलॉन कंपनीत नोकरीस असून नागजफाटा येथून घाटनांद्रेकडे जाण्यासाठी शिरढोण येथे या टेम्पोत बसला होता. या अपघातामुळे मुख्य मार्गावर दुतर्फा वाहतुकीची कोंडी झाली होती. याबाबत कवठेमहांकाळ पोलिसात नोंद झाली असून, अधिक तपास हवालदार पांडुरंग सर्वदे करीत आहेत.