Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

सांगलीतील दोन घटना : ठेवीदाराला मारहाण केल्याने भाजप नेता पोलिसांच्या ताब्यात
सत्याविजय बँक कर्मचाऱ्यांची माजी नगरसेवकाला मारहाण
सांगली, १६ मार्च / प्रतिनिधी

 

एका ठेवीदाराला मारहाण केल्याप्रकरणी भाजपचे माजी शहर जिल्हाध्यक्ष हणमंत पवार यांना पोलिसांनी सायंकाळी ताब्यात घेतल्याने पोलीस ठाण्याच्या आवारात काही काळ तणावाचे वातावरण होते. तर दुसऱ्या एका घटनेत सत्यविजय सहकारी बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भाजपचे माजी नगरसेवक अजित आडवाणी यांना कर्जवसुलीसाठी जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. या दोन्ही घटनेची सांगली शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
हणमंत पवार यांच्या हिंदू अर्बन पतसंस्थेत छायाचित्रकार अभिजित घोंगडे यांची ठेव आहे. सध्या ही पतसंस्था आर्थिक अडचणीत असल्याने ठेवीदारांच्या ठेवी परत मिळणे दुरापास्त झाले आहे. सोमवारी श्री. घोंगडे हे पतसंस्थेत ठेव परत मागण्यासाठी गेले होते. त्यावेळी श्री. घोंगडे व हणमंत पवार यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर श्री. घोंगडे यांनी आपणाला हणमंत पवार यांनी मारहाण केल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल केली. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास शहर पोलिसांनी हणमंत पवार यांना ताब्यात घेतले.
श्री. पवार यांना ताब्यात घेतल्याचे समजताच भाजप व शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्त्यांनी शहर पोलीस ठाण्याच्या आवारात एकच गर्दी केली होती. उपमहापौर शेखर इनामदार, नगरसेवक पृथ्वीराज पवार, युवराज बावडेकर, बाळू गोंधळी, संतोष देवळकर, जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड, बाबा कदम, श्रीकांत शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते पोलीस ठाण्याच्या आवारात जमा झाले होते. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. रात्री उशिरा श्री. पवार यांना अटक करण्यात आली आहे.
दुसऱ्या एका घटनेत सत्यविजय सहकारी बँकेतून भाजपचे माजी नगरसेवक अजित आडवाणी यांनी कर्ज घेतले होते. या कर्जाच्या वसुलीसाठी बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे एक पथक श्री. आडवाणी यांच्या बिपीन विजय सुपर मार्केटमधील दुकानात गेले होते. तेथे श्री. आडवाणी व वसुली पथकातील कर्मचाऱ्यांत वाद झाल्याने त्यांनी श्री. आडवाणी यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब पवार व अधिकाऱ्यांनी शहर पोलीस ठाण्यात येऊन आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. तर श्री. आडवाणी यांनी पैलवानाकडून आपणाला मारहाण केली गेल्याचा आरोप केला आहे.