Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

सांगलीत अजित घोरपडे यांची भूमिका निर्णायक ठरणार!
मिरज, १६ मार्च / दिगंबर शिंदे

 

काँग्रेसचा उमेदवार निश्चित झाल्यानंतरच सांगली लोकसभा निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार असले तरी बंडखोरीच्या शक्यतेने मिरज व कवठेमहांकाळ तालुक्यातील राजकीय क्षेत्र ढवळून निघत आहे. गेल्या २० वर्षांपासून लादलेल्या नेतृत्वाविरोधात संघर्ष हेच ब्रीद घेऊन दमदार राजकीय वाटचाल करणाऱ्या आमदार अजित घोरपडे यांची भूमिका काँग्रेसच्या यशापयशाला कारणीभूत ठरणार हे मात्र निश्चित!
विठ्ठलदाजी पाटील यांच्यानंतर कवठेमहांकाळ व मिरज पूर्व भागातील २९ गावांचे नेतृत्व कोणाकडे हा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून शिवाजीराव शेंडगे यांचे नाव पुढे आले. वरून लादलेले नेतृत्व म्हणून समविचारी गटांनी एकत्र येऊन बंडाचे निशाण ‘विकास आघाडी’च्या नावाखाली रोवले. या गटाला ताकद देण्याचे काम सांगलीच्या ‘विजय’ बंगल्यातून झाले. १९८९ पासून पाच वर्षांचा अवधी विकास आघाडीची बांधणी करण्यात गेला असला तरी या दरम्यान झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत विकास आघाडीच्या हाती या दोन्ही तालुक्यांची सत्ता आली.
या दोन्ही पंचायत समितीवर विकास आघाडीच्या विचाराची सत्ता येताच प्रस्थापितांविरोधात ताकद संघटित होऊ शकते, इतिहास घडू शकतो, याचा दाखला मिळाला. कवठेमहांकाळ पंचायत समितीचे सभापतिपद अजित घोरपडे, तर मिरज पंचायत समितीचे सभापतिपद विठ्ठलअण्णा पाटील यांच्याकडे आले. त्यानंतर कवठेमहांकाळच्या गडावर असणारे काँग्रेसचे निशाण खाली खेचण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले. कवठेमहांकाळ तालुक्यातील ८९ व मिरज तालुक्यातील २९ गावांत राजकीय संघर्षांची मुहूर्तमेढ रोवली गेली. याची फलनिष्पत्ती १९९५ च्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत दिसून आली. तत्कालीन राज्यमंत्री शिवाजीराव शेंडगे यांचा पराभव करून अजित घोरपडे यांनी विधानसभेत धडक मारली. अजित घोरपडे यांच्या विजयाचे श्रेय केवळ विकास आघाडीच्या विचाराला देता येणार नाही. कारण त्यामागे काँग्रेसमधील असंतुष्ट गटही होता. १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत कवठेमहांकाळमधून अजित घोरपडे, खानापूर- आटपाडीतून राजेंद्रअण्णा देशमुख, शिराळ्य़ातून शिवाजीराव नाईक, भिलवडी- वांगीतून संपतराव देशमुख व जतमधून मधुकर कांबळे या पाच बंडखोर उमेदवारांनी विजय संपादन केला होता. परिणामी राज्यातील सत्ता भारतीय जनता पक्ष- शिवसेनेच्या हाती सोपविण्यात सांगली जिल्ह्य़ातील बंडखोरीचा हा विचारच कारणीभूत ठरला.
राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर पुन्हा उमेदवारी शिवाजीराव शेंडगे यांना मिळताच सांगलीच्या ‘विजय’ बंगल्याशी असणाऱ्या नातेसंबंधाला तिलांजली देत अजित घोरपडे यांनी वैयक्तिक पातळीवर बंडखोरी करून विजय संपादन केला. मिळालेल्या पाच वर्षांच्या आमदारकीच्या काळात स्वत:ची ताकद निर्माण करून दुसऱ्यांदा विधानसभेत स्थान मिळवले. गेल्या पाच वर्षांत मात्र कवठेमहांकाळच्या अग्रणीमधून बरेच पाणी वाहून गेले. नवनवीन राजकीय संदर्भ गणिते बदलणारे ठरले. सांगली- कवठेमहांकाळचा राजकीय वाद हा तात्त्विक न राहता टोकाच्या संघर्षांत परावर्तित होत गेला. मिरज व कवठेमहांकाळ तालुक्यातील प्रत्येक गावात असणारा गट हा अजित घोरपडे व मदन पाटील यांच्यात विभागला गेला. ग्रामपंचायत व विकास सोसायटी यामधून या गटातच सत्तेसाठी हमरीतुमरी होत राहिली. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस असे स्वरूप या गटांसाठी क्वचितच लाभले. वैयक्तिक महत्त्वाकांक्षा हीच या राजकारणाची महत्त्वाची किल्ली ठरली.
विधानसभा मतदारसंघ पुनर्रचनेनंतर मिरज तालुक्याच्या २९ गावांचा समावेश मिरज विधानसभा मतदारसंघात झाला, तर तासगाव विधानसभा मतदारसंघाचा बहुतांशी भाग कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाला जोडला गेला. यामुळे कवठेमहांकाळची मिरजेशी असणारी नाळ तासगावशी जोडली गेल्याने राजकीय संदर्भ बदलले. मतदारसंघाची पुनर्रचना होताच अजित घोरपडे यांनी राजकीय दिशाही निश्चित करून जिल्ह्य़ातील वित्तीय संस्थांवर स्थान मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक व सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ता संपादनासाठी पक्ष- निरपेक्ष विचार सुरू केला. याची बीजे विकास आघाडीच्या बांधणीत आढळून येत आहेत.
सांगलीतील काँग्रेस उमेदवाराची घोषणा कधी होते? यावरच बंडखोरी होणार की नाही, हे निश्चित होणार आहे. खासदार प्रतीक पाटील यांची उमेदवारी निश्चित मानून काँग्रेसमधूनच बंडखोरी व्हावी, या अपेक्षेने इतर पक्ष फिल्डींग लावून आहेत. काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली, तर त्याला राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मिळेल, अशी गणिते आहेत. कारण गतवेळच्या निवडणुकीत दिनकर पाटील यांच्या बंडखोरीला काँग्रेसमधील असंतुष्टांचा प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष लाभ झाला होता. मात्र लाभ- तोटय़ाचे गणित मोडून काढून प्रतीक पाटील यांनी काँग्रेसला विजयाप्रत नेले. यामागे मदन पाटील यांची ताकदही अमूल्य ठरली. अशातच भारतीय जनता पक्ष सध्या ‘देखते रहो’च्या भूमिकेत आहे. काँग्रेस उमेदवारीवरच बंडखोरी अन् बंडखोरी कोणाची यावर सांगलीचे राजकीय चित्र अवलंबून आहे. एकूणच कवठेमहांकाळची बंडखोरी झाली, तर काँग्रेसला लाभाची ठरते की हानिकारक? याला वाळव्याची भूमिका कारणीभूत ठरणार आहे.