Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

वारणा कारखान्याच्या उर्वरित आठही जागा कोरे पॅनलकडे
पेठवडगाव, १६ मार्च / वार्ताहर

 

विक्रमी मताधिक्क्य़ाने विजय मिळवत विनय कोरे यांच्या नेतृत्वाखालील तात्यासाहेब कोरे पॅनेलने उर्वरित आठही जागांवर विजय मिळवत श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्यावरील आपली निर्विवाद सत्ता कायम ठेवली. सुमारे चौदा हजार मताधिक्क्य़ाच्या घरातील विजय सत्तारूढ गटाने साजरा केला. तर विरोधी चारही उमेदवारांच्या अनामत रक्कमा जप्त झाल्या. वारणानगर येथे मतमोजणी झाल्यानंतर निकाल घोषित होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करीत आनंद साजरा केला.
कोल्हापूर व सांगली जिल्ह्य़ातील कार्यक्षेत्र असलेल्या वारणानगर येथील श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकींना महाराष्ट्राचे अपारंपरिक ऊर्जामंत्री व जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नामदार विनय कोरे यांच्या नेतृत्वाखालील तात्यासाहेब कोरे पॅनेलवर २३ पैकी १५ जागांवर बिनविरोध निवड झाली होती. उर्वरित ८ जागांसाठी विक्रमी ९७.३७ टक्के मतदान झाले होते.
१७,९२० पैकी १७,३७४ जणांनी मतदानाचा हक्क बजाविला होता. आज सर्व मतपत्रिका एकत्र करून दोन फेऱ्यांत वारणानगर येथील शास्त्रीभवनमध्ये मतमोजणी झाली. सायंकाळी पाच वाजता निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष बोरकर यांनी निकाल जाहीर केला. पन्हाळ्याचे तहसीलदार श्रीरंग तांबे यांनी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. दुपारी पहिल्या फेरीत निकालाचा कल स्पष्ट होताच वारणानगर परिसरात जल्लोषात सुरवात झाली. या निवडणुकीत विनंती करूनही विरोधी उमेदवार निवडणुकीला सामोरे गेले आणि त्यांचा दारूण पराभव झाला.
मंत्री विनय कोरे यांनी या विक्रमी मताधिक्क्य़ातील विजयाबद्दल सभासदांचे व कार्यकर्त्यांचे आभार मानले. तसेच निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्याबद्दल निवडणूक अधिकारी व कर्मचारी यांचे कारखान्याचे कार्यकारी संचालक व्ही.एस.चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
आठ जागांवरील निवडणुकीतील विजयी उमेदवारांना पडलेली मते पुढीलप्रमाणे :- विनय विलासराव कोरे (१५,८७४), सुरेश शा.पाटील, कोडोली (१५,०९२), सुभाष आनंदराव पाटील, कोडोली (१५,३३८),शिवाजीराव आ.जाधव, बहिरेवाडी (१५,८३२), पांडुरंग शामराव पाटील, अंबप (१५,०३१), उदय सर्जेराव पाटील (१५,५०६), शोभाताई विलासराव कोरे (१५,७३३), सुवर्णाताई लालासो पाटील, तांदूळवाडी (१५,२७३),
एकूण तीन गटांमध्ये आठ जागांसाठी निवडणूक झाली. गट क्रमांक १ मध्ये एकूण जागा तीन होत्या आणि उमेदवार पाच होते. गट क्रमांक २ मध्ये एकूण जागा तीन होत्या उमेदवार चार होते. तिसऱ्या गटात जागा दोन होत्या उमेदवार तीन होते. सत्तारूढ कोरे पॅनेलने या तीन गटातील आठही जागाजिंकून कारखान्यावर एकतर्फी सत्ता मिळवली.
विरोधी गटातील पराभूत झालेल्या उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे :- वसंत शंकर पाटील सातवे (१४२७), राजाराम चव्हाण, सातवे (१४२७), किरण तुकाराम पाटील (१६८१) व हिराबाई कुंभार, सातवे (१२९३). या एैतिहासिक विजयाचा वारणा परिसरातील गावा-गावातून विजयोत्सव साजरा करण्यात आला.