Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

‘रसिकांशी थेट संवाद : चित्रपटाच्या जाहिरातींचा नवा फंडा’
कराड, १६ मार्च/वार्ताहर

 

जाहिरातबाजीच्या जमान्यात चित्रपट निर्मात्यांनी जाहिरातीचा नवा फंडा म्हणून ग्रामीण जनतेशी थेट संवाद साधण्याचा उपक्रम राबविला. नांदगाव (ता. कराड) येथील या प्रयोगाला आबालवृद्धांनी उदंड प्रतिसाद दशविल्याने जाहिरातबाजीचा हा नवा प्रयोग नवा पायंडा बनून राहण्याची शक्यता आहे.
नांदगावच्या द्वारका मंगल कार्यालयात अन्याय निवारण व लोकसमितीच्या वतीने ‘मेड इन चायना’ चित्रपटाचे निर्माता, कलाकारांशी ग्रामीण जनतेचा थेट संवाद कार्यक्रम आयोजित केला होता. या प्रसंगी कलाकारांना पाहणे व त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी गर्दी केली होती. निर्माता, दिग्दर्शक संतोष कोल्हे, कलाकार उपेंद्र लिमये, कांचन पगारे यांच्याशी चित्रपटशौकिनांच्या गप्पा चांगल्याच रंगल्या.
पुण्याजवळच्या ‘डाऊ’ कंपनी विरोधात हभप बंडातात्या कराडकरांनी केलेले आंदोलन निश्चितच कौतुकास्पद असून ते या ‘सेझ’ विरोधातील आंदोलनाचा हिरो ठरले तोच ‘सेझ’ विषय घेऊन ‘मेड इन चायना’ हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. या महत्त्वपूर्ण प्रश्नाच्या जागृतीसाठी हा चित्रपट महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास निर्माता, दिग्दर्शक संतोष कोल्हे यांनी या प्रसंगी व्यक्त केला.
आधुनिक शेतकऱ्याची व्यथा सांगणारा हा चित्रपट, वास्तव प्रश्नावर आधारित असून प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाला पुरस्कार प्राप्त झाले आहेत. शेतकऱ्यांचा प्रश्न केंद्रस्थानी मानून या चित्रपटाची निर्मिती केल्याने त्यास विशेष महत्त्व असल्याचे संतोष कोल्हे यांनी सांगितले.
यानंतर थेट प्रश्नोत्तरात मराठी चित्रपटाला इंग्रजी नाव का, हा प्रश्न अवधूत पाटील यांनी केला असता संतोष कोल्हे म्हणाले की, ‘सेझ’ या संकल्पनेचा जन्मच मुळात परदेशात चायनामध्ये झाला. आज बाजारात ‘मेड इन चायना’च्या वस्तू मोठय़ा प्रमाणात आणि स्वस्त दरात उपलब्ध आहेत. आपण त्या वस्तूंना भुलतो. पण या वस्तू एकदा बिघडल्या की दुरुस्तच होत नाहीत. मग पश्चाताप होतो. सेझच्या बाबतीतही तसेच आहे. आज सेझ हे नाव संकल्पना गोंडस वाटत असली तरी भविष्यात सेझचा पश्चाताप झाल्याखेरीज राहणार नाही. ही संकल्पनाच मुळात परदेशी असल्यामुळे इंग्रजी नाव देण्यात आले असून ‘मेड इन चायना’ शब्दप्रयोग सर्वत्र रुळला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
चित्रपटात ‘सेझ’चा प्रश्न मांडला आहे, पण उपाय सुचविले आहेत का? या रवींद्र सुकरे यांच्या प्रश्नावर ते म्हणाले की, मुळात इथल्या शेतकऱ्याला सेझ म्हणजे काय हेच अजून पूर्णत: कळलेले नाही. हा प्रश्न त्यांनी प्रथम समजून घेतल्यास त्यांना उपायही आपोआप सुचत जातील.
शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट शेतकऱ्यांना मल्टीफ्लेक्स टॉकीजात पन्नास, शंभर रुपयांच्या तिकिटाने पाहणे परवडणार नाही. तेव्हा शेतकऱ्यांना हा प्रश्न समजावा यासाठी तंबुतील चित्रपटगृहांना (टुरिंग टॉकीज) हा चित्रपट चालवायला द्यावा, म्हणजे खऱ्या अर्थाने चित्रपट निर्मितीचा हेतू सफल होईल, असे मत येथील अक्षय टुरिंग टॉकीजचे चालक अनिल कोठावळे यांनी व्यक्त केले. यावर सकारात्मक विचार करू, असे आश्वासन संतोष कोल्हे यांनी दिले.
काही चित्रपटशौकिनांनी उपेंद्र लिमये यांना चित्रपटातील डायलॉग सादर करा, असे सुचविले. त्यावर लिमये म्हणाले, मराठी चित्रपटाला प्रतिसाद म्हणून चित्रपट पाहा, म्हणजे डायलॉग आपोआप समजतील. मराठी माणसानेच मराठी चित्रपटाला भरभरून प्रेम दिले पाहिजे.
संयोजक प्रमुख प्रा. प्रमोद सुकरे यांनी प्रास्ताविक केले. चित्रपट निर्मात्यांनी जनतेशी थेट संवाद साधण्याचा हा उपक्रम इथे यशस्वी झाल्याचे दिसत होते.