Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

कोल्हापुरात बंद फ्लॅट फोडून आठ लाखांचा माल लंपास
कोल्हापूर, १६ मार्च / प्रतिनिधी

 

हॉटेल व्हिक्टर पॅलेसच्या पिछाडीस असलेल्या रुक्मिणीनगर येथील नारायण पार्कमध्ये एक बंद फ्लॅट अज्ञात चोरटय़ांनी फोडून सोन्याचे १३ तोळे वजनाचे दागिने, चांदीच्या वस्तू आणि रस्त्यावर लावलेले चार चाकी वाहन असा सुमारे आठ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.
व्य्ांकटेश जनवाडकर यांच्या मालकीचा हा फ्लॅट असून पोलिसांना फ्लॅटमध्ये चोरटय़ांनी हाताळलेल्या वस्तूंवर कांही ठसे मिळाले आहेत. घरफोडीचा हा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला.
व्यवसायाने कंत्राटदार असलेले व्यंकटेश जनवाडकर हे काही कामानिमित्त परगावी गेले आहेत. त्यांच्या पत्नी शीतल जनवाडकर या कोल्हापुरातीलच आपल्या माहेरी गेल्या होत्या. त्यांचा मुलगा शिक्षणाच्या निमित्ताने परगावी असतो. सौ.शीतल यांनी माहेरी जाताना फ्लॅटला कुलूप लावले होते. रविवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास शेजारच्या लोकांना जनवाडकर यांच्या फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले आढळले. म्हणून त्यांनी सौ.शीतल जनवाडकर यांना फोनवरून ही माहिती दिल्यानंतर सौ.शीतल या फ्लॅटवर परतल्या. तेव्हा त्यांना बेडखाली ठेवलेले सोन्याचे दागिने तसेच कपाटातील चांदीच्या वस्तू आणि फ्लॅटच्या खालीच लावलेली कार असा ऐवज लंपास झाल्याचे लक्षात आले. त्यांनी शाहुपुरी पोलीस ठाण्याला फिर्याद दिली.
पोलिसांनी घटनास्थळी श्वानपथक तसेच ठसेतज्ञांना पाचारण केले होते. फ्लॅटमध्येच एक कोयता आढळून आला असून त्यावर ठसे मिळालेले आहेत.
श्वानपथक नारायण पार्कमध्येच घुटमळले. याचा अर्थ श्री. जनवाडकर यांची कार चोरून चोरटे पसार झाले असावेत. विशेष म्हणजे सोन्याचे दागिने बेडखाली आहेत हे चोरटय़ांना कसे समजले. कदाचित चोरटे जनवाडकर कुटुंबाच्या माहितीतील असावेत काय, असाही संशय पोलिसांकडून व्यक्त केला जातो आहे.