Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

निवडणुकीच्या प्रशिक्षणाची प्रशासकीय पातळीवर तयारी
मंचर, १६ मार्च/वार्ताहर

 

पंधराव्या लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून पुण्यासह, जिल्हय़ातील शिरूर, लोकसभा निवडणुकीची तयारी प्रशासकीय स्तरावर सुरू झाली आहे. आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी अधिकारी वर्गाची नियुक्ती करण्याच्या दृष्टीने संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना तालुका तहसील कार्यालयात निवडणुकीदरम्यानचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.
शिरूर लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार जवळ जवळ निश्चित झाले आहेत. त्यामुळे राजकीय तंबूतही वातावरण तापू लागले आहे. आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी जिल्हा आणि तालुकास्तरावर देखील शासकीय अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. कार्यक्रम घोषित झाल्यापासून निवडणुका दिनांकापर्यंत आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. लोकसभेच्या निवडणुका शांततेत आणि निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पार पाडण्याच्या दृष्टीने आचारसंहितेची अंमलबजावणी करण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी यांनी संबंधित सर्वच सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिले आहेत. दरम्यान, आचारसंहितेच्या काळात शासनाच्या नवीन योजना कार्यान्वित होणार नाहीत. तसेच मतदारांना आकर्षित करणारी किंवा मतदारांवर प्रभाव टाकल्या जाणाऱ्या कोणत्याही कामांचे उद्घाटन लोकप्रतिनिधींमार्फत केले जाणार नाही.