Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

जागतिक मंदीवर उद्या कोल्हापुरात व्याख्यान
कोल्हापूर, १६ मार्च / प्रतिनिधी

 

येथील श्री संतराम पाटील श्रमिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कॉ. संतराम पाटील यांच्या बाराव्या स्मृतिदिनानिमित्त ‘जागतिक मंदी आणि भारतापुढील आव्हाने’ या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले असून अर्थतज्ज्ञ राजा पटवर्धन हे प्रमुख वक्ते म्हणून येणार आहेत.
साहित्यिक डॉ. राजन गवस यांच्या अध्यक्षतेखाली हे व्याख्यान बुधवार दिनांक १८ मार्च रोजी सायंकाळी शाहू स्मारक भवन येथे होणार आहे. याचवेळी ज्येष्ठ कामगार नेते कॉ.यशवंत चव्हाण, नाबार्डचे सहायक महाप्रबंधक डी. बी. घाडगे यांचा सत्कारही केला जाणार आहे.
संतराम पाटील श्रमिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आजपर्यंत संतराम पाटील स्मृतिग्रंथ प्रकाशन, फुटबॉल स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, कॉ.संतराम पाटील सभागृह, बेलेवाडी काळम्मा या गावच्या प्राथमिक शाळेच्या आवारात तयार करण्यात आलेले बालोद्यान असे अनेक उपक्रम ट्रस्टच्या वतीने घेण्यात आले आहेत, असे ट्रस्टच्या अध्यक्ष सुमित्रा पाटील यांनी म्हटले आहे. संतराम पाटील यांना जाऊन एक तप उलटले आहे. या बारा वर्षांत संतराम पाटील यांनी ज्या कामगार कष्टकरी यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी संघटित करण्यात आयुष्य वेचले, त्या श्रमिकांच्या चळवळीची स्थिती समाधानकारक राहिलेली नाही. याबद्दल सुमित्रा पाटील यांनी खंत व्यक्त केली आहे.
जागतिक मंदीच्या अरिष्टांमुळे त्याचे स्वरूप आणि कारणमीमांसा या संबंधी सर्वसामान्य जनतेला सजग करण्यासाठी यंदाच्या स्मृतिदिनी अर्थतज्ज्ञ राजा पटवर्धन यांचे संबंधित विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले असून सर्वसामान्य जनतेने त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन सुमित्रा पाटील यांनी केले आहे.