Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

साताऱ्यात ३७४ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
सातारा, १६ मार्च / प्रतिनिधी

 

लोकसभा निवडणुकीत आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर पोलीस यंत्रणा करडी नजर ठेवून आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनेखाली संशयितांवर नोटिसा बजावण्यात आल्या असून ३७४ जणांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती, पोलीस अधीक्षक प्रकाश मुत्याल यांनी पत्रकार परिषदेत सांगितली व परवानाधारकांनी आपली शस्त्रे पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्याचे आवाहन केले.
सातारा लोकसभा मतदारसंघात २ हजार ८६ व माढा लोकसभा मतदारसंघातील फलटण व माणमध्ये ६६२ असे मिळून जिल्ह्य़ात एकूण २ हजार ७४८ मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी १३९ मतदान केंद्रे संवेदनशील असल्याचे प्रकाश मुत्याल यांनी सांगितले.
जिल्ह्य़ात सुमारे ८ हजार परवानाधारकांकडे शस्त्रे आहेत. त्यापैकी आतापर्यंत १५९ शस्त्रे जमा झाली आहेत. बाकीच्या लोकांनी तातडीने शस्त्र जमा करणे आवश्यक आहे. विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी वाहनधारकांची कसून झडती व धाडी टाकून तपासणी मोहीम सुरू करण्यात आली असल्याचे प्रकाश मुत्याल यांनी सांगितले. निवडणूक काळात जातीय भावना भडकावणाऱ्यांवर तसेच पैशाचे आमिष दाखवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.