Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

इचलकरंजी शहरामध्ये पिण्याच्या पाण्यात किडे
इचलकरंजी, १६ मार्च / वार्ताहर

 

पंचगंगा नदी पात्रातील दूषित पाण्याचा प्रश्न कायम असताना गेल्या चार दिवसांपासून गावभागामध्ये नळावाटे जळू येण्याचे प्रकार घडू लागल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान नदीतील दूषित पाण्याचे नमुने घेऊन डीवायएफआयचे पदाधिकारी पालिकेमध्ये सोमवारी गेले होते. त्यांना पाटबंधारे खात्याकडे पाठपुरावा करण्याचा सल्ला देण्यात आला.येथील पंचगंगा नदीमध्ये पंधरवडय़ापासून दूषित पाणी वाहात आहे. अशातच नदीला जलपर्णीचा विळखा बसला असून त्यामध्ये लाल किडय़ांचा वावर वाढला आहे. या प्रकाराकडे पालिकेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न डीवायएफआयने केला होता. पण त्यास प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे संघटनेचे जिल्हा सचिव सदा मलाबादे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ सोमवारी पालिकेत गेले होते. मुख्याधिकारी त्रिंबक डेंगळे पाटील हे कार्यालयात उपस्थित नसल्याने कार्यकर्त्यांनी पाणी पुरवठा खात्याकडे मोर्चा वळवला. पाणीपुरवठा सभापती तानाजी पोवार यांच्या दालनात डीवायएफआयच्या कार्यकर्त्यांनी दूषित पाण्याच्या बादल्या ठेवल्या. पोवार यांना निवेदन देण्यात आले. पोवार यांनी नदीतील दूषित पाण्याचा प्रश्न केवळ पालिकेच्या अखत्यारित नसल्याने पाटबंधारे खात्याकडे पाठपुरावा करण्याचा सल्ला दिला. गेल्या चार दिवसांपासून गावभागातील नळधारकांमध्ये पाण्यातून जळू येऊ लागल्याने भीती व्यक्त केली जात आहे.