Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

केरेवाडीत दोघांचे खून, चौघांना अटक
सांगली, १६ मार्च / प्रतिनिधी

 

कवठेमहांकाळ तालुक्यातील केरेवाडी येथे प्रमोद कृष्णराव कांबळे व दत्तात्रय कारंडे या सोलापूर जिल्ह्य़ातील दोघांच्या खूनप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली असून हे दुहेरी खूनप्रकरण अनैतिक संबंधातून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या खुनातील मुख्य सूत्रधार पिंटू गेंड हा आपल्या कुटुंबासह फरारी झाला आहे.
फरारींच्या शोधासाठी पोलिसांची पथके ठिकठिकाणी रवाना झाली आहेत. अटक केलेल्यांना सोमवारी कवठेमहांकाळ न्यायालयात हजर केले असता २३ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
केरेवाडी गावातील रमेश पाटील यांच्या शेतजमिनीत दोन अज्ञात तरुणांचे मृतदेह गुरुवारी मिळून आले होते. मृतदेहाशेजारी असलेले एक वृत्तपत्र व मोटारसायकलवरून या दोन तरुणांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले.
हे दोन्ही तरुण सांगोला तालुक्यातील भटुंबरे या गावचे असून ५७ रुपयांच्या बिलावरून धाबाचालकाशी झालेल्या वादातून त्यांचा खून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. मात्र केवळ पैशासाठी हे खून झाले असावेत, याबाबत पोलिसांना साशंकता आहे. अनैतिक संबंधातून त्यांचा काटा काढला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
भटुंबरे गावातील प्रमोद कांबळे व दत्तात्रय कारंडे हे दोघे गावातील विरंगुळा धाब्यावर रात्री जेवणासाठी गेले होते. तेथे त्यांनी मद्यप्राशन केले. जेवणाचे ५७ रुपये बिल देण्यावरून धाबाचालक पिंटू गेंड, किरण गेंड व मॅनेजर नागनाथ गोडसे यांच्याशी त्यांची बाचाबाची झाली. त्यानंतर या तिघांनी त्यांना धाब्याच्या मागील बाजूच्या खोलीत नेले व तेथे मारहाण केली.
तेथे या तिघांव्यतिरिक्त समाधान चव्हाण, सुनील सुरळकर, दीपक यादव, हणमंत यादव, आबा हाके व ज्ञानेश्वर पवार हे पाचजण होते. त्यांनी मारहाणीनंतर त्यांच्या डोक्यात दगड घालून खून केला. या दोघांचे मृतदेह पिंटू गेंड याच्या इंडिका गाडीतून आणून केरेवाडी येथे टाकण्यात आले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी समाधान चव्हाण, ज्ञानेश्वर पवार, नागनाथ गोडसे, आबा हाके या चौघांना अटक केली आहे. उर्वरित सहाजण फरारी असून मुख्य सूत्रधार पिंटू गेंड हा घटनेनंतर कुटुंबासह पसार झाला आहे.