Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

संग्रामसिंह नलवडे बसप व सेनेच्या संपर्कात
गडिहग्लज, १६ मार्च / वार्ताहर

 

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराची माळ कोणाच्या गळय़ात पडणार यावरून जोरदार लाथाळय़ा सुरू आहेत. अशातच चंदगड मतदारसंघातला उमेदवार असेल तर आम्ही पाठिंबा देऊ, असा सूर चंदगडवासीयांतून उमटू लागला असतानाच म्हाळुंगे (चंदगड) येथे साखर कारखाना उभारणारे युवा नेते संग्रामसिंह नलवडे आता बसप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या संपर्कात आहेत.
गडिहग्लज साखर कारखाना उभारून हजारो शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणारे, हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणारे स्व. आप्पासाहेब नलवडे १९६२ मध्ये काँग्रेसचे आमदार म्हणून वावरले.
गल्लीपासून दिल्लीपर्यंत नलवडे यांचा राजकीय दबदबाही चर्चेचा विषय होता. नलवडे यांच्या निधनानंतर संग्रामसिंह नलवडे यांनी युवक काँग्रेसमध्ये सक्रिय राहून स्वत:ची विधायक प्रतिमा निर्माण केली आहे.
नलवडे घराण्याला मिळालेल्या राजकीय, सामाजिक पाश्र्वभूमीचा वापर करीत संग्रामसिंह नलवडे यांनी नलवडे उद्योग समूहाच्या माध्यमातून धडाडीने काम केले आहे. स्वत:च्या जन्मगावी हनिमनाळ येथे दुधावर चालणाऱ्या प्रक्रिया उद्योगाचा शुभारंभ केला. म्हाळुंगे (चंदगड) या अतिदुर्गम भागात नलवडे शुगर्स बॅनरखाली साखर कारखाना सुरू आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मागणी करण्यापूर्वीच उसाला १२०० रुपये दर देऊन महाराष्ट्रात पहिली उचल दिली. त्यामुळे मंत्री समितीला हा दर स्वीकारावा लागला.
तालुका फुटबॉल असोसिएशनच्या माध्यमातून दरवर्षी अखिल भारतीय स्तरावरील फुटबॉल स्पर्धा भरवून फुटबॉलप्रेमींना दिवाळी साजरी करण्यात मोलाचा वाटा उचलतात, अशी राजकीय, सामाजिक पाश्र्वभूमी देत संग्रामसिंह आता लोकसभेच्या िरगणात उडी मारणार आहेत.
काँग्रेसने आपल्यावर नेहमी अन्यायच केलेला आहे. विधानसभेची वीस वर्षांपूर्वी मिळालेली उमेदवारी बाबा कुपेकरांना देण्यात आली. त्यामुळे या भागातील राष्ट्रीय काँग्रेसचे अस्तित्वच शून्यात गेले आहे. म्हणून या वेळी आपण शिवसेना व बसपच्या संपर्कात आहोत आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहासाठी लोकसभा लढवणारच, असा निर्धार नलवडे यांनी केला आहे.