Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

पाच हजार टन बेदाणा काळा पडण्याची भीती
सांगली, १६ मार्च / प्रतिनिधी

 

सांगली जिल्हय़ात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून निर्माण झालेले ढगाळ हवामान, रिमझिम पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी हबकला असून, सुमारे पाच हजार टन बेदाणा काळा पडण्याची भीतीही व्यक्त होऊ लागली आहे.
जिल्हय़ात गेल्या तीन दिवसांपासून वातावरणात मोठय़ा प्रमाणात बदल झाला आहे. दिवसभर कडक ऊन अन् सायंकाळच्या सुमारास ढगाळ वातावरणामुळे बेदाणा उत्पादनावर परिणाम होत आहे. जिल्हय़ाच्या आटपाडी, कवठेमहांकाळ, जत, खानापूर, मिरज या तालुक्यांत काही ठिकाणी रिमझिम, तर काही ठिकाणी बऱ्यापैकी पावसाने हजेरी लावली आहे. तीन वर्षांपूर्वीचा दुष्काळ, त्यानंतरची अतिवृष्टी व यंदा दमट हवामानामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले.
तासगाव, कवठेमहांकाळ, मिरज पूर्वभागात प्रामुख्याने द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते. याच भागात बेदाणा उत्पादनाचे शेडही मोठय़ा प्रमाणात आहेत.
सध्या द्राक्षांचा हंगाम संपत आला असून, बेदाणानिर्मितीची प्रक्रियाही सुरू झाली आहे. अशातच दमट हवामान, पाऊस व ढगाळ वातावरणामुळे सुमारे पाच हजार टन बेदाणा काळा पडण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. हा काळा पडलेला बेदाणा पुन्हा विक्रीलायक करण्यासाठी शेतकऱ्याला किलोस तीन रुपये जादा मोजावे लागणार आहेत. त्यामुळे हा शेतकरी आर्थिक अडचणीत सापडणार आहे.
ढगाळ हवामानाचा फटका जिरायत शेतकऱ्यांनाही बसला आहे. सध्या सुगीचे दिवस जोरात असून रब्बी हंगामातील हरभरा, गहू, शाळू आदी पिकांची काढणी व मळणी सुरू आहे. यंदा रब्बीचे क्षेत्र वाढल्याने मजुरांची टंचाई आहे.