Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

इस्लाम कुटुंब व्यवस्थेत स्त्रीला अत्युच्च स्थान- डॉ. शरीफ
सोलापूर, १६ मार्च/प्रतिनिधी

 

इस्लाम धर्मात महिलांना कुटुंबातील राणीपदाचा दर्जा असून कुराणामध्ये महिलांच्या अधिकाराबाबत सुरतन्नीस्सा सुरा ए नूर या दोन सुरामध्ये विस्तृत माहिती दिली आहे. महिला या कुटुंबामध्ये सर्वोच्च असून कुटुंबातील नियमित कामे करणे हे त्यांच्या इच्छेवर अवलंबून आहे. इस्लामला विभक्त कुटुंब पद्धती मान्य असल्याने कुटुंबातील सर्व कामे करण्यासाठी पुरुषांनी मदत करावयास हवी, असे प्रतिपादन उस्मानिया विद्यापीठातील अरेबिक विभागप्रमुख प्रा. डॉ. मुस्तफा शरीफ यांनी केले.
येथील युनियन एज्युकेशन सोसायटीच्या महिला महाविद्यालयात ‘इस्लाम मे औरत का मकान’ या विषयावर डॉ. शरीफ बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुलाम दस्तगीर शेख हे होते.
इस्लाममध्ये महिलांना आई-वडिलांच्या संपत्तीतील चार आण्याचा हिस्सा देणे बंधनकारक असून पतीच्या संपत्तीमधून चार आण्याचा वाटाही तिला दिला जाणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. शरीफ म्हणाले की, कुटुंबामध्ये पुरुषांना जास्त अधिकार दिले असले तरी या अधिकाराचा वापर करताना त्याने कुटुंबातील महिलांचा सर्वप्रथम विचार केला पाहिजे. आई ही बालकाची प्रथम शाळा असून कुटुंबातील महिला समाधानी असतील तर कुटुंब समाधानी राहते, असेही त्यांनी सांगितले.
प्राचार्य शेख यांनी, महिलादिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने करण्यात आले. महिला या समाजातील महत्त्वाचा घटक असून महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या सर्वागीण विकासासाठी नियमितपणे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. फरजाना शेख यांनी तर आधारप्रदर्शन डॉ. जे. जी. बागवान यांनी केले.