Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

इचलकरंजीमध्ये पाणीटंचाई;नागरिकांचे प्रचंड हाल
इचलकरंजी, १६ मार्च / वार्ताहर

 

कृष्णा नदीच्या पात्रात पाणी नाही आणि पंचगंगा नदीच्या पात्रातील पाणी प्रदूषित, अशा दुहेरी समस्येमुळे इचलकरंजी शहरास पाणीटंचाई भेडसावत आहे. नागरिकांची विशेषत: महिलावर्गाची पाण्यासाठी दोन दिवस धावाधाव सुरू आहे. मार्च महिन्यातच पाणीटंचाईची तीव्रता आणखी तीन महिने वाढत जाईल, या भीतीने महिलावर्ग हवालदिल झाला आहे.
पंचगंगा नदीतील पाण्याच्या प्रदूषणामुळे उन्हाळय़ातील बहुतांशी दिवस नदीतील पाण्याचा उपसा बंद ठेवावा लागतो. पाण्याच्या दूषितपणाची तीव्रता वाढत जाऊन आठवडाभर पाण्याची टंचाई जाणवते.
आमदार प्रकाश आवाडे यांनी पुढाकाराने मजरेवाडी (ता. शिरोळ) येथून कृष्णा नदीतील पाणी उपसा करणारी नळयोजना कार्यान्वित केली. साधारणत: आठ वर्षांपूर्वी चालू झालेल्या कृष्णा नळ योजनेद्वारे मुबलक व स्वच्छ पाणी मिळेल अशी संकल्पना प्रचलित होती.
यंदा पंचगंगा नदीतील पाण्याच्या प्रदूषणास जानेवारी महिन्यापासूनच सुरुवात झाली. फेब्रुवारी महिन्यात तर दूषित पाण्याच्या तीव्रतेने पंचगंगेतील पाणी उपसा बंद ठेवावा लागला.
सध्याही पंचगंगेतील पाण्याचा दूषितपणा व त्याचबरोबर पाण्यावर झालेले जलपर्णीचे अतिक्रमण, यामुळे दरुगधीची तीव्रता वाढली आहे.
पालिकेने पाण्याचा उपसा बंद ठेवला आहे म्हणून गेल्या आठवडाभरापासून अधिक काळ फक्त कृष्णेचे पाणी मिळत असल्याने शहरास एक दिवसाआड पाणी मिळत आहे.