Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

अंगावरून साप गेल्याने घाबरलेल्या तरुणाचा मृत्यू
सोलापूर, १६ मार्च/प्रतिनिधी

 

झोपेत असताना अंगावरून साप गेल्याने घाबरलेल्या तरुणाचा जागीच अंत झाल्याची घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथे घडली. आप्पाराव ऊर्फ धर्मराज नागनाथ कोटे (वय २३) असे मृत दुर्दैवी तरुणाचे नाव आहे.
धर्मराज हा रात्री घरासमोर रस्त्यालगत पटांगणात झोपला होता. तेव्हा अचानकपणे अंगावरून साप गेल्याचे आढळून आले. ही माहिती त्याने आपली बहीण राजश्री हिला सांगितली होती. नंतर तो पुन्हा त्याच ठिकाणी झोपी गेला; परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी तो झोपेतून उठलाच नाही. साप अंगावरून गेल्यामुळे भीतीचा थरकाप उडाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. वळसंग पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.
माढय़ात गाडी अडवून चोरी
माढा तालुक्यातील शेटफळ चौकात माल घेऊन निघालेली महिंद्रा पिकअप गाडी अडवून दोघा तरुणांनी चालकाच्या डोळ्यांत चटणी टाकून त्याच्या ताब्यातील गाडी व रोख रक्कम बळजबरीने पळवून नेल्याची फिर्याद माढा पोलिसांत दाखल झाली आहे. वाहनचालक दरेप्पा नीलकंठ हत्तूर (वय २३, रा. हत्तवी, ता. इंडी, जि. विजापूर) हा केए २८-ए ६४५६ हे महिंद्र पिकअप वाहन घेऊन रात्री चडचण येथून भाडे ठरवून टेंभुर्णीकडे निघाला होता. वाटेत दोघा तरुणांनी गाडी थांबवून चालकाच्या डोळ्यांत चटणी टाकली आणि त्यास लुटले.
दवाखान्याची मोडतोड
पंढरपूर नगरपालिका दवाखान्यात दाखल झालेल्या रुग्णावर काळजीपूर्वक औषधोपचार केले नाहीत म्हणून नातेवाइकांनी दवाखान्यावर दगडफेक करून मोडतोड केली. या प्रकरणी डॉ. प्रकाश नरोटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पंढरपूर शहर पोलिसांनी अमर घाटे (रा. पंढरपूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.