Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

पंचगंगा कारखाना कामगारांचे काम बंद आंदोलन मागे
इचलकरंजी, १६ मार्च / वार्ताहर

 

देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्यातील कामगारांचे पाच महिन्यांचे थकीत वेतन दोन टप्प्यात देण्याचा निर्णय मान्य झाल्यानंतर कामगारांचे आठवडाभर सुरू असणारे काम बंद आंदोलन सोमवारी संपुष्टात आले. या निर्णयानुसार कायमस्वरूपी ८०० कामगारांना २ कोटी ७० लाख रूपये अडीच वर्षांच्या मुदतीच्या दोन ठेव रूपाने मिळणार आहे. गतहंगामातील थकीत वेतनाच्या मागणीसाठी कारखान्याच्या कामगारांनी गेल्या सोमवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले होते. कामगार संघ इंटकच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्याऐवजी कामगारांनी स्वतंत्रपणे आंदोलन सुरू केल्याने त्यास वेगळे महत्त्व प्राप्त झाले होते. या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी कारखान्याचे अध्यक्ष पी.एम.पाटील यांनी चर्चेचा सपाटा लावला होता. या चर्चेमध्ये कारखान्याची आर्थिक स्थिती, भूतकाळातील आर्थिक समस्या, आशा उत्पन्न करणारा भविष्यकाळ आदी मुद्दय़ांचा सांगोपांग विचार करण्यात आला. पी.एम.पाटील यांनी थकीत वेतन दोन टप्प्यात देण्याचे मान्य केल्यावर त्यांच्यावर विश्वास व्यक्त करून कामगार संघटनेने यापुढे काम बंद आंदोलन होणार नाही, अशा शब्दांत व्यवस्थापनास आश्वस्त केले.