Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९

झरदारी हरले, शरीफ जिंकले
इफ्तिकार चौधरी यांच्यासह सर्व न्यायाधीशांची पुनर्नियुक्ती होणार, ‘लाँग मार्च’ रद्द
इस्लामाबाद, १६ मार्च/पी.टी.आय.
पाकिस्तानचे अध्यक्ष असीफ अली झरदारी, पंतप्रधान गिलानी यांनी सोमवारी सकाळी पदच्युत करण्यात आलेले सरन्यायाधीश इफ्तिकार मोहम्मद चौधरी यांच्यासह नऊ न्यायाधीशांची पुनर्नियुक्ती करण्याचे आदेश जारी केल्याने पाकिस्तानातील राजकीय अस्थिरता नाटय़मयरित्या संपुष्टात आली आहे. विरोधी पक्ष नेते नवाझ शरीफ यांनी आज होणारा ‘लाँग मार्च’ रद्द केला असून भारत तसेच अमेरिकेने पाकिस्तानातील या ताज्या घडामोडींचे स्वागत केले आहे. इफ्तिकार मोहम्मद चौधरी यांची पुनर्नियुक्ती करण्याचे आश्वासन देतानाच नवाझ शरीफ यांनी केलेल्या अन्य मागण्यांवर विचार केला जाईल असे पाकिस्तान सरकारने स्पष्ट केल्याने राजकीय यादवीच्या उंबरठय़ावर उभा असलेला हा देश पुन्हा शांत झाला आहे. (अग्रलेख : झरदारी यांचे लोटांगण )

आत्मघाती हल्ल्यात नऊ ठार
इस्लामाबाद, १६ मार्च / पी. टी. आय.

तटबंदी असलेल्या रावळपिंडी शहरात आज आत्मघाती बॉम्बहल्ल्यात किमान नऊ जण ठार आणि २० जण जखमी झाले. शहराच्या पीर वधाई चौक परिसरात प्रवाशांनी भरलेल्या एका बसमध्ये हा आत्मघाती स्फोट घडविण्यात आला. जखमींना नजीकच्या इस्पितळात दाखल करण्यात आले असून, त्यापैकी चौघांची प्रकृती गंभीर आहे. आत्मघाती हल्ला करणाऱ्यांचे शिर धडावेगळे होऊन तेथेच जवळ पडलेले आढळले.

राष्ट्रवादी व शिवसेनेतील गुप्त समझोत्याबद्दल काँग्रेसमध्ये चिंता!
आघाडीवरून काँग्रेसमध्ये दोन तट
मुंबई, १६ मार्च / खास प्रतिनिधी
काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असतानाच काँग्रेसच्या प्रदेश पातळीवरील काही पदाधिकारी व जिल्हाध्यक्षांनी राष्ट्रवादीबरोबर आघाडीचा फेरविचार करण्याची मागणी आज केली. राष्ट्रवादी व शिवसेनेत पडद्याआडून हातमिळवणी झाली असल्यास त्याचा फटका काँग्रेसच्या उमेदवारांना बसेल, असा इशारा या वेळी देण्यात आला. एकूणच राष्ट्रवादीबरोबरील आघाडीवरून काँग्रेस नेत्यांमध्ये दोन तट पडले आहेत. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सौम्य भूमिका घेतली असतानाच माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे राष्ट्रवादीच्या विरोधात आक्रमक झाले आहेत.

महाबळेश्वर संमेलन उधळू नका
वारकऱ्यांना राम शेवाळकर यांचे आवाहन
नागपूर, १६ मार्च / प्रतिनिधी
महाबळेश्वर येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. आनंद यादव यांचा राजीनामा मागू नये तसेच, संमेलन उधळण्याची भाषा कृपया करू नये, असे भावनिक आवाहन माजी संमेलनाध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक राम शेवाळकर यांनी केले आहे.
डॉ. आनंद यादव यांच्या ‘संत तुकाराम’ या कादंबरीतील कथित आक्षेपार्ह मजकूरामुळे उठलेल्या वादावर संत साहित्याचा एक पिढीजात उपासक असा स्वत:चा उल्लेख करून वारकऱ्यांना कळकळीचे आवाहन करणारे एक पत्रक राम शेवाळकर यांनी आज प्रसिद्धीस दिले.

अवकाशात सापडले तीन नवीन जिवाणू
बंगलोर, १६ मार्च/पीटीआय

अतिशय प्रखर अशा अल्ट्रा व्हायोलेट किरणांना न जुमानता जिवंत राहणाऱ्या जिवाणूंच्या तीन जाती भारतीय वैज्ञानिकांना वातावरणाच्या स्ट्रॅटोस्फिअर या थरात सापडल्या असून या जाती पृथ्वीवर सापडत नाहीत. या संशोधनामुळे पृथ्वीवरील जिवांची उत्पत्ती अवकाशातील जिवाणूंपासून झाल्याच्या पॅनस्पर्मिआ सिद्धांताला बळकटी मिळाली आहे. ज्येष्ठ खगोलवैज्ञानिक जयंत नारळीकर यांनी या प्रयोगात प्रमुख भूमिका पार पाडली आहे.

आयपीएल झाली ‘इंडियन प्रॉब्लेम लीग’
मुंबई, १६ मार्च / क्री. प्र.
‘इंडियन क्रिकेट लीग’च्या पाठी लागलेल्या समस्या कमी होण्याऐवजी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. केंद्र सरकारने निवडणूकांदरम्यान क्रिकेट सामन्यांना सुरक्षा देण्यासाठी राज्यांना जादा कुमक देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि दिल्ली यांना निवडणुकांदरम्यान क्रिकेट सामन्यांना सुरक्षा पुरविण्यास असमर्थता व्यक्त केली आहे.

‘नुकसान टाळण्यासाठी इंडियन प्रीमिअर लीग खेळवावीच लागेल’
नगर, १६ मार्च/प्रतिनिधी
एकीकडे केंद्रातील सत्तेसाठी ‘इंडियन पोलिटिकल लीग’, दुसरीकडे बीसीसीआयची ‘ट्वेंटी-२०’ची ‘इंडियन प्रिमीअर लीग’.. केंद्रीय कृषिमंत्री तथा आयसीसीचे उपाध्यक्ष शरद पवार सध्या या दोन ‘आयपीएल’मध्ये गुंतले आहेत. पहिल्या आयपीएलबद्दल कमालीची संदिग्धता ठेवून आपणच सोडवू शकू असा गुंता ते निर्माण करीत आहेत, तर दुसऱ्या आयपीएलबद्दल मात्र ठाम आहेत. काही राज्यांमध्ये सुरक्षेचा प्रश्न आहे. मतदान व सामन्यांच्याही तारखांचा गुंता आहे, हे मान्य करीत मात्र विविध करारांचे ४०० कोटी आणि दंडाचे २०० कोटी अशा सुमारे ६०० कोटी किंवा त्याहीपेक्षा अधिक रकमेचे नुकसान टाळण्यासाठी इंडियन प्रिमीअर लीग खेळवावीच लागेल, असे पवार म्हणाले.

ईशान्य मुंबईतून किरीट सौमय्या की पूनम महाजन?
मुंबई, १६ मार्च / प्रतिनिधी

भाजपने राज्यातील लोकसभेच्या काही जागांसाठी आज उमेदवारांची नावे निश्चित केली. मात्र ईशान्य मुंबई मतदारसंघासाठी पूनम महाजन यांचेही नाव पुढे आल्याने त्यांना उमेदवारी द्यायची की, माजी खासदार किरीट सौमय्या यांना तिकीट द्यायचे याबाबत अनिश्चितता कायम आहे. उभयतांपैकी एकाचे नाव निश्चित करण्यासाठी भाजपमध्ये खलबते सुरू असून उद्या पुन्हा बोलविण्यात आलेल्या बैठकीत त्यावर तोडगा काढला जाणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी जालनामधून रावसाहेब दानवे, उत्तर मुंबईतून राम नाईक, गडचिरोलीतून अशोक नेते, बीडमधून गोपीनाथ मुंडे, माढातून सुभाष देशमुख, अकोलामधून संजय धोत्रे आणि पालघरमधून चिंतामण वनगा या उमेदवारांची नावे भाजपच्या उमेदवार निवड समितीने निश्चित केली. फारशा आक्षेपाविना निश्चित झालेली यादी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींना कळविण्यात येणार आहेत. मुंबईत पार पडलेल्या या बैठकीला गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी, विनोद तावडे आदी वरिष्ठ नेते उपस्थित होते. ईशान्य मुंबई मतदारसंघासाठी किरीट सौमय्या यांच्याव्यतिरिक्त पूनम महाजन यांचेही नाव सुचविण्यात आले. त्यामुळे या मतदारासंघातून कोणाला तिकीट द्यायचे याबाबत निर्णय होणे बाकी आहे. त्यासाठी भाजपने उद्या पुन्हा बैठक बोलविली असून, त्यावेळी याबाबतचा हा तिढा सोडविला जाणार आहे.

राजनाथ - जेटली वादामुळे निवडणूक समितीच गुंडाळणार?
नवी दिल्ली, १६ मार्च/पी.टी.आय.

भाजपचे अध्यक्ष राजनाथसिंग आणि अरूण जेटली यांच्यात सध्या सुरू असलेला संघर्ष संपुष्टात आला नाही तर उद्या केंद्रीय निवडणूक समितीच गुंडाळली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या परिस्थितीत पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांना उमेदवारनिवडीसंदर्भात सर्वाधिकार दिले जातील, अशीही शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे. अरूण जेटली यांनी गेल्या शुक्रवारी केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीकडे पाठ फिरविल्यानंतर लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्या निवासस्थानी बैठक आयोजित करून दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील उमेदवारांची नावे निश्चित केली होती. या पाश्र्वभूमीवर उद्यापर्यंत राजनाथ- जेटली संघर्ष मिटला नाही तर ही समितीच गुंडाळली जाण्याची शक्यता पक्षातील सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे. ही समिती गुंडाळून अडवाणी आणि राजनाथसिंग या दोघांना उमेदवार ठरविण्याचे सर्वाधिकार बहाल केले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

एलआयसीचे गृहकर्ज आणखी पाऊण टक्क्यांनी स्वस्त
मुंबई, १६ मार्च/ व्यापार प्रतिनिधी

गृहवित्त क्षेत्रातील अग्रेसर कंपनी एलआयसी हौसिंग फायनान्स लिमिटेडने आपल्या घरांसाठीच्या कर्जावरील व्याजाच्या दरात पाऊण टक्क्यांची घसघशीत कपात जाहीर केली आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे ही दर कपात विद्यमान ग्राहकांच्या कर्जावरही १ एप्रिल २००९ पासून लागू होणार आहे. गेल्या तीन महिन्यांतील ही कंपनीने केलेली दुसरी दर कपात आहे. एलआयसी हौसिंग फायनान्सने जानेवारी महिन्यांतच पाऊण टक्क्यांची व्याजदर कपात केली होती, त्यातही या नव्या कपातीची भर पडल्याने, गृहकर्जावरील व्याजाचे दर हे सध्याच्या १०.७५ टक्के ते ११.२५ टक्क्यांवरून अनुक्रमे १० टक्के आणि १०.५ टक्के इतके खाली आले आहेत, अशी माहिती कंपनीचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आर. आर. नायर यांनी दिली. त्यांच्या मते एलआयसी हौसिंग फायनान्सने दोन वर्षांपूर्वीचा व्याजदराचा नीचांक गाठला असून, हा आजच्या घडीला सर्वाधिक आकर्षक व्याजाचा दर आहे.

 


प्रत्येक शुक्रवारी