Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९

नाथषष्ठी यात्रोत्सव सुरू
औरंगाबाद, १६ मार्च/प्रतिनिधी

‘संत एकनाथ महाराज की जय’च्या जयघोषाला टाळमृदंगाची जोड देत लाखो भाविकांनी नाथषष्ठी उत्सवात रंगत भरली. सकाळी नाथवंशजांनी प्रथेप्रमाणे मानाची पहिली दिंडी काढली. बघता बघता नाथमंदिरात भक्तांनी प्रचंड गर्दी केली. औरंगाबादपासून ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या नाथमहाराजांच्या पैठण नगरीत सुमारे साडेचारशे वर्षांपासून नाथषष्ठी यात्रा भरते.

अ‍ॅबरडीन - फिशिंग व्हिलेज
‘कोळीवाडा’ या शब्दाभोवती आपल्या काही खास प्रतिमा हिंदी सिनेमावाल्यांनी तयार करून दिल्यात. मुंबई बेटावरचे आद्य नागरिक म्हणजे तिथले कोळीबांधव. ‘घर पाण्यामंदी, बंदराला करतो ये-जा’ असं सागराशी नातं असलेले. उधाणलेल्या दर्याची आयाळ धरून त्यावर बोटीने स्वार होणारे. शांताबाई शेळक्यांनी त्यांच्या गीतांमधून अगदी यथार्थपणे या दर्याच्या राजाचं वर्णन केलंय. जन्माला आल्यापासून सागराच्या अंगाखांद्यावर एखाद्या आजोबाच्या मांडीवर खेळल्यासारखं कोळीवाडय़ातली मुलं खेळतात आणि त्याच्या साथीनंच मोठी होतात.

..अखेर ‘बलसा’ वसले नव्या ठिकाणी!
परभणी, १६ मार्च/वार्ताहर

वर्षांनुवर्षे राहिलेल्या गावातून बाहेर पडून पुन्हा नव्या ठिकाणी आपला संसार थाटण्यासाठी ‘बलसा’ येथील ग्रामस्थ कामाला लागला आहेत. खानापूर-पिंगळी रस्त्यावर असलेल्या नव्या जागेवर सोमवारी सायंकाळपर्यंत तब्बल साठ कुटुंबे रहायला आली. वीज आणि पाणी यासारख्या सुविधा त्यांना पुरविण्यासाठी आणि विस्कटलेल्या संसाराची घडी पुन्हा बसवून देण्यासाठी जिल्हाधिकारी मोहन ठोंबरे आज पुनर्वसनाच्या ठिकाणी आले आणि त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला.

शासनाने उधार दिलेले ६१ कोटी रुपये परत करण्याचे गुरुद्वारा बोर्डाला आदेश
गुरु-ता-गद्दी त्रिशताब्दी सोहळा
नांदेड, १६ मार्च/वार्ताहर
गुरु-ता-गद्दी त्रिशताब्दी सोहळ्यानिमित्त मुख्य गुरुद्वारा परिसरातील विकास कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने गुरुद्वारा बोर्डाला उधार तत्त्वावर दिलेले ६१ कोटी रुपये तात्काळ परत करण्यात यावेत असे पत्र जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी यांनी प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष डॉ. परविंदर पसरिचा यांना दिले आहे. आज ते पत्र दिल्यानंतर एकच खळबळ उडाली.

अडीच लाखांच्या चोरीसाठी घडवले अपहरणनाटय़ !
‘स्लमडॉग’ इफेक्ट

लातूर, १६ मार्च/वार्ताहर

स्लमडॉग चित्रपट पाहून त्यात झोपडपट्टीतील गरीब मुलांना ज्या वयात ज्या बाबी करायला नकोत त्या नशिबी येतात हे पाहून आपण त्यांच्यासाठी काही करण्याकरिता घरातील अडीच लाख रुपयांची दागिने पळविल्याची कबुली लातूर येथील १२ वर्षांच्या मुलाने दिली. आई-वडील दोघेही शिक्षक असणाऱ्या कुटुंबाच्या घरातील घडलेली ही सत्य घटना आहे.

वैद्यनाथ साखर कारखाना गाळपात
बीड जिल्हा आघाडीवर
परळी, १६ मार्च/वार्ताहर
उसाची तीव्र टंचाई, ऊसतोड मजुरांची कमतरता आणि उसाचे घटलेले हेक्टरी उत्पादन अशा अडचणीच्या हंगामात बीड जिल्ह्य़ातील आठपैकी केवळ चारच साखर कारखाने सुरू झाले आणि या कारखान्यांनी एकूण ९ लाख ४८ हजार ३६२ मेट्रिक टन उसाचे गाळप करून ९ लाख ६५ हजार ८१० पोत्यांचे साखर उत्पादन केले आहे. बीड जिल्ह्य़ात सर्वाधिक गाळप करून वैद्यनाथ साखर कारखाना आघाडीवर आहे.

अपुऱ्या संख्याबळामुळे पोलिसांवर ‘ताण’ वाढला!
गंगाखेड पोलीस ठाण्याची व्यथा
गंगाखेड, १६ मार्च/वार्ताहर
परभणी जिल्ह्य़ातील सर्वाधिक ‘संवेदनशील’ तालुका म्हणून गंगाखेड तालुक्याची जिल्हा दरबारी नोंद असताना, वर्षांनुवर्षे मागणी करूनही येथील पोलीस ठाण्यास अत्यावश्यक असलेला अधिकारी-कर्मचारी वर्ग देण्यास वरिष्ठ तसेच जिल्हा पोलीस प्रशासनाकडून ठोस अंमलबजावणी होत नसल्याने उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिवस-रात्र एक करून आपले कर्तव्य निभवावे लागत आहे.

कॉपीविरोधी मोहिमेचे पुस्तक विक्रेत्यांकडून स्वागत
नुकसानीबद्दल चिंता व्यक्त
गंगाखेड, १६ मार्च/वार्ताहर
परभणीचे जिल्हाधिकारी मोहन ठोंबरे यांच्या बारावी-दहावी परीक्षेतील कॉपीविरोधी मोहिमेमुळे गैरमार्गाचा अवलंब करणाऱ्या संस्थाचालकांची ‘दुकानदारी’ उठलेली असतानाच गाईड व प्रश्नोत्तरांची पुस्तके विक्रेत्यांवरही या निमित्ताने पुस्तके विकली न गेल्याने संक्रांत आल्याचे दिसत आहे. मात्र या मोहिमेचे पुस्तक विक्रत्यांनी स्वागतही केले आहे.

तडीपार गुंडाचा पोलिसांवर हल्ला
औरंगाबाद, १६ मार्च/प्रतिनिधी
पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांवर कुख्यात तडीपार गुंड भुऱ्र्या याने शस्त्र हल्ला केला. भुऱ्र्याच्या प्रतिकाराला न जुमानता पोलिसांनी त्याला अटक केली. रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास बडी तकिया भागात ही घटना घडली. त्याच्याकडून दीड हजार रुपये रोख, कोयता आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. भुऱ्र्या उर्फ वाजेद असे या आरोपीचे नाव आहे. तडीपारीचा आदेश मोडून भुऱ्र्या हा शहरात आला असल्याची माहिती मिळाल्यानतंर जमादार किशोर काळे हे एका होमगार्डला सोबत घेऊन तेथे गेले होते. भुऱ्र्या दिसताच काळे यांनी झडप घालून त्याला पकडले. पोलिसांनी पकडल्याचे दिसताच त्याने प्रतिकार केला. त्याच्याकडील कोयत्याचा वार करण्याचा प्रयत्न त्याने केला. तो वार करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत असतानाही पोलिसांनी त्याला सोडले नाही.

एकाच कुटुंबातील चौघाजणांना खव्यातून विषबाधा
औरंगाबाद, १६ मार्च/प्रतिनिधी
एकाच कुटुंबातील चारजणांना खवा खाल्ल्यामुळे विषबाधा झाली. ही घटना रविवारी रात्री गंगापूर तालुक्यातील मलकापूर येथे घडली. हरिश्चंद्र दशरथ जाधव (वय ४०), फुलचंद दशरथ जाधव (वय ४५), हिराबाई फुलचंद जाधव (वय ४०) आणि अरुण फुलचंद जाधव (वय १९) अशी त्यांची नावे आहेत. रात्री सर्वानाच उलटय़ा आणि मळमळ सुरु झाली. त्यामुळे सर्वजण तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात आले. त्यांची प्रकृती आता स्थिर असून हळूहळू सुधारत असल्याचे रुग्णालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

शिपायाला कोंडून लाखोंचे बांधकाम साहित्य लांबविले
परळी वैजनाथ, १६ मार्च/वार्ताहर
शाळेच्या बांधकामासाठी आणलेले लोखंड दरोडेखोरांनी ट्रकमध्ये टाकून धाडसी चोरी केली. चोरटय़ांनी शाळेत झोपलेल्या शिपायाला खोलीत कोंडून सुमारे एक लाखाचे साहित्य लंपास केल्याची घटना तालुक्यातील मौजे ताडझरी येथे घडली. ताडझरी येथील नागेश्वर विद्यालयाच्या खोली बांधकामासाठी संस्थेने तीन ते साडेतीन टन लोखंड शाळेसमोर टाकले होते. १५ मार्चच्या रात्री शाळेचा शिपाई अशोक राघू मुंडे हा डय़ुटीवर थांबला असताना दीडच्या सुमारास एक ट्रक आला. बांधकामाचे साहित्य आले असे समजत असतानाच ट्रकमधील आलेल्या सात-आठजणांनी त्याचे तोंड बांधून त्याला खोलीत कोंडले व सुमारे एक लाख रुपये किमतीचे लोखंड ट्रकमध्ये भरून पलायन केले.

जैन मंदिरातील तीन मूर्तीची चोरी
बोरी, १६ मार्च/वार्ताहर

येथील १००८ श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिरातील तीन पितळी मूर्त्यां चोरीस गेल्या असून या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. १००८ श्री पाश्र्वनाथ दिगंबर जैन मंदिराचे बांधकाम चालू असल्यामुळे सर्व मूर्त्यां शेजारीच असलेल्या आदिनाथ मंदिरात ठेवण्यात आल्या होत्या. आज सकाळी रोजच्याप्रमाणे मूर्त्यांचा अभिषेक करण्यासाठी मंदिराचे पुजारी अनंता चोभे मंदिरात आले. अभिषेक करीत असताना २४ तीर्थंकरांच्या दोन पितळी मूर्त्यां चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. ही माहिती देण्यासाठी ते श्रीकांत बेंडसुरे यांच्याकडे गेले. तितक्यातच भगवान पाश्र्वनाथाची मूर्ती कुणीतरी चोरून नेल्याचे त्यांना सांगण्यात आले. म्हणजे केवळ १५ मिनिटांतच आज ही मूर्ती अज्ञात व्यक्तीने चोरून नेली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली नव्हती.

जीप व मोटारसायकलच्या धडकेत ग्रामसेवक ठार
मानवत, १६ मार्च/वार्ताहर
येथून जवळच असणाऱ्या परभणी रस्त्यावर रुढीपाटीजवळ जीप व मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन मोटारसायकलवरून जाणारे ग्रामसेवक कारभारी अप्पासाहेब शेळके (वय ४२, रा. मांडेनउगाव) ठार झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार असून आज सकाळी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. परभणीकडून मानवतला येणारी सवेरा जीप (क्र. एमएच-१२-इटी-४८०१) भरधाव वेगाने येत होती. त्याचवेळी जिंतूर येथे ग्रामसेवक म्हणून काम करणारे कारभारी शेळके मोटारसायकलवरून परभणीला जात होते. या वेळी समोरून येणाऱ्या जीपने शेळके यांच्या मोटारसायकलला धडकला जोरदार धडक दिली. त्यात शेळके यांना गंभीर मार लागला. उपचारासाठी त्यांना परभणीच्या सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. परंतु उपचारादरम्यान रविवारी रात्री ९.३० च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान जीपचालक श्रीकृष्ण मुद्राप्पा मेने (वय ४२, रा. पुणे) यास अटक करून त्याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक हरिदास मुंडेंच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.

शेतातील विहिरीत पडून हरणाचा मृत्यू
सोयगाव, १६ मार्च/वार्ताहर
कळपातून भरटकलेल्या एका हरणाचा फर्दापूर परिसरात असलेल्या शेतातील विहिरीत पडून मृत्यू झाला. जंगलातील पाण्याचे स्रोत कोरडे झाल्याने वन्यप्राण्यांची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण सुरू आहे. अजिंठय़ाच्या डोंगरात हरीण, नीलगाय, तरस, बिबटय़ा या वन्यप्राण्यांची संख्या मोठय़ा प्रमाणावर आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे तहानलेले हरणांचे कळप जंगलतांडा व फर्दापूर येथे शेतामध्ये पाण्याच्या शोधात येत असतात. अशाच एका कळपातील ३ वर्षे वयाचा नर हरीण कळपातून भरकटले. ते कळपाच्या शोधात भटकत असतानाच विहिरीचा अंदाज न आल्याने ते विहिरीत पडले. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी याच परिसरात नीलगायीचाही विहिरीत पडून मृत्यू झाला होता. जंगलात वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी तयार केलेली वनतळी कोरडी पडली असून, जलस्रोतामध्येही फारच कमी पाणी असल्याने वन्यप्राणी गाववस्तीकडे धाव घेऊ लागले आहे. त्यांच्यासाठी जंगलात कृत्रिम पाणवठा निर्माण करावा अशी मागणी होत आहे.

लातूर जिल्ह्य़ात २१ मार्चला मतदार जागृती अभियान
लातूर, १६ मार्च/वार्ताहर
वॉरियर ग्रुप व लोकलढा या संघटनेच्या वतीने लातूर जिल्ह्य़ात शनिवार (२१ मार्च) पासून ‘तुझा तू राजा हो, मतदारराजा जागा हो’ असे अभियान राबविले जाणार आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्य़ात जाहीर सभाही ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती वॉरियर ग्रुपचे अध्यक्ष अ‍ॅड. महेश ढवळे यांनी दिली.लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर हे मतदार जागृती अभियान सुरू होणार आहे. निवडणुकीच्या काळात मतदारांना अनेक आमिषे, खोटी आश्वासने पुढारी देत असतात. निवडणुका झाल्यानंतर त्यांना या मतदारांचा विसर पडतो. आपली व आपल्या नातेवाईकांची, कार्यकर्त्यांची मालमत्ता, ऐश्वर्य कसे वाढेल, एवढेच लक्ष समोर ठेवून निवडून आलेला उमेदवार पाच वर्षे काम करत असतो. त्यामुळे खोटय़ा आश्वासनाला बळी पडलेला मतदार आपल्या नशिबाला दोष देत बसतो. मतदारराजाला जागा करण्यासाठी वॉयलर ग्रुप पुढाऱ्यांचे सर्व डावपेच मतदारांना दाखविणार आहे. पूर्ण जिल्ह्य़ात हे अभियान २१ मार्चपासून राबविण्यात येणार आहे.

विवाहितेला जाळून मारले; सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल
लोहा, १६ मार्च/वार्ताहर

धर्मापुरी (ता. लोहा) येथील विवाहितेला सासरच्यांनी अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले. ही घटना शनिवारी सकाळी धर्मापुरी (ता. लोहा) येथे घडली. या विवाहितेचा नांदेड येथे उपचार सुरू असतानाच सोमवारी पहाटे मृत्यू झाला. विवाहितेचे नाव सुनीता राघू लोखंडे (वय २८) असून या प्रकरणी सासरच्या सहाजणांविरुद्ध लोहा पोलिसांनी खुनाचा दाखल केला आहे. पोलीस दिलेल्या माहितीनुसार, सुनीता लोखंडे या विवाहितेला माहेरहून ऑटोरिक्षासाठी पैसे आणण्यासाठी शारीरिक व मानसिक त्रास दिला जात होता. १४ मार्चला सकाळी ८ च्या सुमारास गोविंद श्यामराव लोखंडे, मुक्ताबाई गोविंद लोखंडे, प्रकाश गोविंद लोखंडे, सविता प्रकाश लोखंडे, राघू गोविंद लोखंडे, मीना बापूराव पवार (सर्व रा. धर्मापुरी) यांनी रॉकेल टाकून सुनीताला पेटवून दिले.

आचारसंहिता भंगाच्या तक्रारीसाठी कक्षाची स्थापना
औरंगाबाद, १६ मार्च/खास प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता भंगाबाबत तक्रारीसाठी कक्ष स्थापन करण्यात आल्याची माहिती औरंगाबाद लोकसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी संजीव जैस्वाल यांनी दिली.
आचारसंहिता भंगाबाबत कोणाच्या तक्रारी असल्यास २३२७९९९ या दूरध्वनी क्रमांकावर स्वत:च्या नावासह तक्रार द्यावी. निनावी तक्रार स्वीकारली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
आचारसंहिता आणि कायदा व सुव्यवस्था कक्षाचे प्रमुख निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. एन. आर. शेळके हे आहेत. या कक्षात आचारसंहिता भंगाची तक्रार आल्यास निवडणुकीच्या नियंत्रित यंत्रणेबरोबरच एक फिरते पथक कार्यान्वित राहणार आहे. त्यामध्ये एक तहसीलदार, अव्वल कारकून, तलाठी आणि दोन पोलीस कर्मचारी राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

राष्ट्र उभारणीत ग्रामस्वच्छतेला महत्त्व -पोपटराव पवार
अंबाजोगाई, १६ मार्च/वार्ताहर

राष्ट्र उभारणीचे काम गाव आणि खेडय़ापासून होत असून त्यासाठी ग्रामविकास स्वच्छता अभियानाला महत्त्व प्राप्त झाले आहे, असे प्रतिपादन हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी केले आहे. अंबाजोगाई तालुका सरपंच संघटनेच्या वतीने मानवलोक येथे तालुकास्तरीय ग्रामविकास स्वच्छता संमेलनाच्या कार्यक्रमात श्री. पवार बोलत होते. या वेळी राज्य जलसंधारण परिषदेचे सदस्य डॉ. द्वारकादास लोहिया, गटविकास अधिकारी पी. व्ही. बनसोड, तालुका कृषी अधिकारी श्री. खंदारे आदी उपस्थित होते. श्री. पवार पुढे म्हणाले, स्वच्छता अभियान आणि निर्मलग्राम योजनेच्या माध्यमातून खेडय़ांचे चित्र बदलू लागले आहे. मराठी चित्रपटातून ग्रामीण भागाचे वास्तव कधीच पुढे आले नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

अखेर जळकोटमधील कुटुंबांचे कबाले रद्द
जळकोट, १६ मार्च/वार्ताहर

सन १९८५ -८६ मध्ये जळकोट येथील बऱ्याच महिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेत शासनाला राष्ट्रीय कार्यात साह्य़ केल्याच्या पाश्र्वभूमीवर व त्या कुटुंबांना निवाऱ्यासाठी जागा नसल्याने उदगीरचे तत्कालीन तहसीलदार यांनी येथील जमीन सव्‍‌र्हे नंबर २२४ मध्ये ३९ कुटुंबांना प्लॉट वाटपाचे कबाले दिले होते. तथापि सदर कबाले रद्द केल्याचे आदेश तहसीलदार, जळकोट यांनी ६ मार्चला निर्गमित केले असून त्यामुळे संबंधित कुटुंबांत एकच खळबळ उडाली आहे. हे कबाले कायम रहावेत यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणाऱ्या ‘त्या’ कुटुंबाचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत.या संबंधी तहसीलदार, जळकोट यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, सन १९८५-८६ मध्ये कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेतलेल्या जळकोट येथील ३९ कुटुंबांना तत्कालीन तहसीलदार, उदगीर यांनी जमीन सव्‍‌र्हे नंबर २२४ (इनामी) मधील प्लॉट वाटप केले होते. परंतु त्यास जिल्हा वक्फ अधिकारी यांनी आक्षेप घेतल्यामुळे व प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्याने प्लॉट वाटपाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यात फक्त कागदोपत्री कबाले दिल्याचे दिसून येते असे तहसीलदार, जळकोट यांच्या आदेशात नमूद केले आहे.

दोन चोरांना अटक; तीन दुचाकी जप्त
औरंगाबाद, १६ मार्च/प्रतिनिधी

औरंगाबाद गुन्हे शाखेच्या पथकाने जालना येथील दोन दुचाकीचोरांना अटक केली असून त्यांच्याकडून तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. यातील दोन दुचाकी जालन्यातून तर एक शहरातून चोरण्यात आली होती. कृष्णा हरिभाऊ जाधव (वय १९) आणि रमेश बन्सी क्षीरसागर (वय २२, रा. चंदनझिरा, जालना) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक डॉ. कांचन चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक आर. एस. पडवळ यांनी ही कारवाई केली. या दोघांनी चोरीची कबुली दिली आहे. रमेश याला यापूर्वीही चोरीच्या गुन्ह्य़ात अटक करण्यात आली होती. त्याच्या अटकेमुळे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

परळी येथून युवक बेपत्ता
औरंगाबाद, १६ मार्च/प्रतिनिधी

परळी येथून सुधाकर श्यामराव गीते (रा. भवानीनगर) हा २४ वर्षांचा युवक बेपत्ता झाला आहे. गेल्या महिन्याच्या २१ फेब्रुवारीला घरातून कोणालाही न सांगता निघून गेला. त्याच्या डोक्यावर परिणाम झाला असून रंग काळा-सावळा, उंची साधारण साडेपाच फूट, लांबट चेहरा आणि मजबूत शरीरयष्ठीचा हा युवक कोणाला आढळून आल्यास परळी पोलीस ठाणे (०२४४६-२२२०३६, २८७१४०) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस आणि त्याच्या नातेवाईकांनी केले आहे.

राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कमलेश मुथाला अजिंक्यपद
औरंगाबाद, १६ मार्च/खास प्रतिनिधी

वायएमटी आयुर्वेद महाविद्यालयाच्या वतीने आयोजित राज्य बुद्धिबळ स्पर्धेत येथील छत्रपती शाहु महाराज शिक्षणसंस्थेच्या आयुर्वेद महाविद्यालयाचा विद्यार्थी कमलेश सतीश मुथा याने विजेतेपद मिळविले. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मुंबईच्या महापौर डॉ. शुभा राऊळ यांच्या हस्ते झाला. कमलेश मुथाने त्यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचा चषक आणि प्रमाणपत्र स्वीकारले. या स्पर्धेत राज्यातील विविध वैद्यकीय विद्या शाखेचे विद्यार्थी सहभागी झाले होते. पुण्याच्या आर्म फोर्सेस वैद्यकीय महाविद्यालयात फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या बुद्धिबळ स्पर्धेतही कमलेशला उपविजेतेपद मिळाले होते.

औरंगाबाद सी.ए. शाखेला राष्ट्रीय पुरस्कार
औरंगाबाद, १६ मार्च/खास प्रतिनिधी

द इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट ऑफ इंडियाच्या औरंगाबाद शाखेला राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट कामगिरी पुरस्कार मिळाला आहे. दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या वार्षिक कार्यक्रमात केंद्रीय कार्पोरेटमंत्री प्रेमचंद्र गुप्ता यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी इन्स्टिटय़ूटचे अध्यक्ष वेद जैन आणि उत्तम प्रकाश अग्रवाल हे उपस्थित होते. औरंगाबाद शाखेतर्फे राहुल लोहाडे, गिरीश कुलकर्णी आणि सुधीर जाजू यांनी हा पुरस्कार स्वीकारला. हा पुरस्कार मिळण्याची औरंगाबाद शाखेची ही दुसरी वेळ आहे.

‘आंबेडकर’ कारखान्याच्या अभ्यासदौऱ्यात ९० शेतकरी
उस्मानाबाद, १६ मार्च/वार्ताहर
केशेगाव ( ता. उस्मानाबाद ) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने काढण्यात आलेल्या अभ्यासदौऱ्यात ९० शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. ऊसउत्पादनात सूक्ष्म अन्नद्रव्याचे महत्त्व, ऊस जातींचे प्रयोग, जीवाणू खतांचा वापर आणि तंत्रज्ञानाच्या विविध प्रयोगांची या शेतकऱ्यांनी पाहणी केली. बारामती, पाडेगाव, माजंरी या तीन संशोधन केंद्रांवर अभ्यासदौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. सर्वंकष ऊसउत्पादकता वाढ योजनेंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष अरविंदराव गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना कार्यक्षेत्रात ऊसवाढीचे प्रयत्न सुरू आहेत.

डॉ. काचोळे यांना ५० हजारांची मदत
गंगाखेड, १६ मार्च/वार्ताहर

परभणी लोकसभा मतदारसंघातील शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाचे उमेदवार डॉ. मानवेंद्र काचोळे यांना आज सोमवारी पक्षाच्या गंगाखेड तालुका शाखेच्या वतीने ५० हजार रुपयांचा निधी देण्यात आला. आज येथील बळीराज्य कृषी केंद्र नवा मोंढा येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत डॉ. काचोळे यांच्या प्रचार यंत्रणेस मदत निधी म्हणून पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंत हारकळ यांच्याकडे ५० हजार रुपयांचा निधी सुपूर्द करण्यात आला. हा निधी पक्षाचे नाना पाटील, ब्रिगेडचे मराठवाडा अध्यक्ष किशोर ढगे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माधव शिंदे, वैजनाथ रसाळ, नूतन तालुकाध्यक्ष संजय सोळुंके, माजी तालुकाध्यक्ष भगवान शिंदे यांच्या उपस्थितीत देण्यात आला.

पंचायत राज्य समितीच्या सरबराईसाठी हजारोंची वसुली
उदगीर, १६ मार्च/ वार्ताहर
पंचायत राज्य समिती लातूर जिल्ह्य़ाचा दौरा करणार, अशी चर्चा होती. पण समिती लातूर जिल्ह्य़ात फिरकलीच नाही. पण त्यांच्या सरबराईसाठी जमा केलेल्या निधीचा प्र निर्माण झाला आहे. ५ ते ७ मार्चच्या दरम्यान जिल्हा परिषदेमार्फत चालणाऱ्या शाळा, ग्रामपंचायत, पंचायत समिती, प्राथमिक आरोग्य केंद्र आदींच्या तपासणी व अभिलेखे पाहण्यासाठी हे पथक येणार होते. म्हणून अनेक अधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन त्यांच्या सरबराईसाठी हजारोंचा निधी जमा केला आहे. उदगीर तालुक्यातील १२ केंद्रीय प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी प्रत्येक घटक शाळेतील मुख्याध्यापकाकडून चौथीपर्यंतच्या शाळेसाठी तीनशे रुपये तर सातवीपर्यंतच्या शाळेसाठी सहाशे रुपये अशी वर्गणी जमा करून वरिष्ठांकडे सुपूर्द केली. आदर्श आचारसंहिता चालू असल्यामुळे पंचायत राज पथकाचा दौरा रद्द झाला; त्यामुळे हा निधी कोणाच्या घश्यात जाणार की शिक्षक कर्मचाऱ्यांना परत मिळणार अशी चर्चा कर्मचाऱ्यांत आहे.

महाविद्यावियाच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी
लातूर, १६ मार्च/वार्ताहर
नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाच्या एम.ए., एम.कॉम., एमएस्सी.च्या परीक्षा १७ एप्रिलपासून सुरू करण्याचे वेळापत्रक विद्यापीठाने नुकतेच जाहीर केले आहे. या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थीवर्गातून केली जात आहे. या काळात नांदेड व मराठवाडय़ातील अन्य जिल्ह्य़ांतील लोकसभेच्या निवडणुका आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. विद्यापीठाने या परीक्षेच्या तारखा पुढे ढकलून त्या परीक्षा मे मध्ये घ्याव्यात अशा मागणीचे निवेदन दयानंद कला महाविद्यालयाचे विद्यार्थी संसदेचे सचिव गिरीधर तेलंगे यांनी कुलगुरु डॉ. सर्जेराव निमसे यांच्याकडे दिले आहे.

महाराष्ट्र कुस्ती महा-वीर स्पर्धेस ५०० मल्लांची उपस्थिती
लातूर, १६ मार्च/वार्ताहर

लातूर तालुक्यातील रामेश्वर (रूई) येथे १७ व १८ मार्चला होणाऱ्या राष्ट्रधर्म पूजक दादाराव साधू कराड स्मृती कुस्ती स्पर्धेस राज्यातून ५०० मल्ल उपस्थित राहतील व ही आगळीवेगळी स्पर्धा राहणार असल्याचे प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांनी रामेश्वर येथे पत्रकार परिषदेत सांगितले. मंगळवारी (दि. १७) दुपारी ३ वाजता ऑलिम्पिक कांस्यपदक विजेते सुशीलकुमार यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून हिंदकेसरी पद्मश्री सतपालसिंह, हिंदकेसरी जगदीश कालिरमन व भारतीय कुस्ती महासंघाचे प्रशिक्षक यशवीरसिंह उपस्थित राहणार आहेत. १८ मार्चला सायंकाळी बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. या समारंभास अखिल भारतीय कुस्ती महासंघ, नवी दिल्लीचे सरचिटणीस पद्मश्री करतारसिंह, रुस्तुम-ए-हिंद हरिश्चंद्र बिराजदार, सिनेअभिनेता राहुल सोलापूरकर उपस्थित राहणार आहेत. विजेत्यांना सुवर्ण, रौप्य व कांस्य गौरवपदक देण्यात येणार आहेत.

पोलीस उपनिरीक्षकास मारहाण, १६ जणांना अटक
लातूर, १६ मार्च/वार्ताहर
लातूर शहरातील रेणापूर नाक्यावर रंगपंचमीनिमित्त उघडय़ा असलेल्या बिअरबारवर छापा घालण्यास गेले असता पोलिसांनाच मारहाण करण्यात आली.याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, लातूर शहरात रंगपंचमीनिमित्त दारूची दुकाने बंद ठेवण्याचा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी आदेश दिलेला होता. असे असतानाही शहरातील जुन्या रेणापूर नाक्यावर देशी दारूची दुकान चालू ठेवून सर्रास विक्री होत असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गाडेवार व पोलीस कर्मचारी शेमवाड, सावंत यांना मिळाली. ते छापा घालण्यासाठी तेथे गेले असता देशी दारू दुकानाचे मालक व अन्य तळीरामांनीच पोलीस उपनिरीक्षक व कर्मचाऱ्यास बेदम मारहाण केली. यानंतर संबंधित पोलीस ठाण्यात तात्काळ संपर्क साधून पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर रामलिंग मदने, काशीनाथ मसलकर, सय्यद शहाजहाँ, नशीर देशमुख, दत्ता जाधव, भागवत चव्हाण, दत्ता येमगीर, गणेश खोले, सुरेश अभंगे यांच्यासह १६ तळीरामांना अटक करण्यात आली व देशी दारू दुकानातून २१ बॉक्स जप्त करण्यात आले.

अजिंठय़ाच्या जंगलात मोरांची संख्या घटली
सोयगाव, १६ मार्च/वार्ताहर
उन्हाळ्यात मोठय़ा संख्येने येणाऱ्या मोरांच्या संख्येत मोठी घट झाल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. अजिंठय़ाच्या जंगलात मोठय़ा संख्येने मोर आहेत. सोयगाव जवळ असलेल्या गलवाडा गावाजवळील शेतात रोज सकाळी व संध्याकाळी मोर पाणी पिण्यासाठी येतात. त्यांना पाहण्यासाठी पर्यटक मोठय़ा संख्येने येथे येतात.मोरांनी शेतकऱ्याला एवढा लळा लावला आहे की त्याच्या शेतावर मोर बिनधास्त कोणतीही भीती न बाळगता फिरतात. काही शेतकऱ्यांनी मोरासाठी पाण्याची विशेष व्यवस्थाही केली आहे.उन्हाळ्यात मोठय़ा संख्येने येणाऱ्या मोरांच्या संख्येत घट झाल्याने निसर्गप्रेमी मंडळींना चिंता लागली आहे. फेब्रुवारी महिन्यापासून मोरांच्या आगमनाला सुरुवात होते. तालुक्यातील दुर्गम भागातील काळदरी येथेही मोरांची संख्या अधिक आहे. आदिवासी कुटुंबाच्या घरातही मोरांचा मुक्त संचार आहे. यावर्षी उन्हाळ्यात काळदरी भागात मोरांची संख्या वाढू लागली आहे, असे गावकऱ्यांनी सांगितले.

‘रेल्वे प्रश्नावर राष्ट्रवादीने जनतेच्या तोंडाला पाने पुसली’
बीड, १६ मार्च/वार्ताहर

परळी-बीड-नगर रेल्वेप्रश्नावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कागदोपत्री घोडे नाचवीत जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत. प्रत्येक निवडणुकीत आश्वासन देऊन हे नेते विकासाच्या प्रश्नांची चेष्टा करीत आहेत. त्यामुळे आपणच हा प्रश्न मार्गी लावू, असे सांगून जिल्ह्य़ाच्या औद्योगिक विकासासाठी शिकस्त करू, अशी ग्वाही आमदार गोपीनाथ मुंडे यांनी दिली. व्यापारी संघटना, रोटरी क्लब, माहेश्वरी संघटना, जैन संघटना यांच्या पदाधिकाऱ्यांशी मुंडे यांनी शनिवारी सायंकाळी जैन भवन येथे संवाद साधला. यावेळी व्यापारी महासंघाचे सत्यनारायण लाहोटी, उद्योगपती अशोक सामत उपस्थित होते. मुंडे म्हणाले, आपला जिल्हा पूर्वीपासूनच ‘मागासलेला जिल्हा’ ओळखला जातो. मागासलेपण दूर करण्यासाठी विविध प्रकल्प, टेक्स्टाईल झोन, दूध प्रक्रिया प्रकल्प व इतर आवश्यक प्रक्रिया उद्योग निर्माण होणे गरजेचे आहे. औद्योगिक विकासासाठी रेल्वे व विमानतळ या दळणवळणाच्या सुविधा असणे आवश्यक आहे.

दुचाकीस्वार ठार
गेवराई, १६ मार्च/वार्ताहर

शहराजवळ असलेल्या बागपिंपगाव फाटय़ाजवळ मालमोटारीची धडक बसून दुचाकीस्वार बाजीराव शिंदे (वय २६, तलवाडा) जागीच ठार झाला. हा अपघात रविवारी झाला. या अपघातात अन्य एक जण जखमी झाला. शहागड येथून बीडकडे भरधाव वेगात मालमोटार (क्रमांक एमएच ०३ एल ४१६) निघाली होती. त्या वेळी गेवराईहून तलवाडा येथे दुचाकीवर निघालेल्या शिंदे यास त्या मालमोटरीची जोराची धडक बसली. यामध्ये शिंदे जागीच ठार झाला.