Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

झरदारी हरले, शरीफ जिंकले
इफ्तिकार चौधरी यांच्यासह सर्व न्यायाधीशांची पुनर्नियुक्ती होणार, ‘लाँग मार्च’ रद्द
इस्लामाबाद, १६ मार्च/पी.टी.आय.

 

पाकिस्तानचे अध्यक्ष असीफ अली झरदारी, पंतप्रधान गिलानी यांनी सोमवारी सकाळी पदच्युत करण्यात आलेले सरन्यायाधीश इफ्तिकार मोहम्मद चौधरी यांच्यासह नऊ न्यायाधीशांची पुनर्नियुक्ती करण्याचे आदेश जारी केल्याने पाकिस्तानातील राजकीय अस्थिरता नाटय़मयरित्या संपुष्टात आली आहे. विरोधी पक्ष नेते नवाझ शरीफ यांनी आज होणारा ‘लाँग मार्च’ रद्द केला असून भारत तसेच अमेरिकेने पाकिस्तानातील या ताज्या घडामोडींचे स्वागत केले आहे. इफ्तिकार मोहम्मद चौधरी यांची पुनर्नियुक्ती करण्याचे आश्वासन देतानाच नवाझ शरीफ यांनी केलेल्या अन्य मागण्यांवर विचार केला जाईल असे पाकिस्तान सरकारने स्पष्ट केल्याने राजकीय यादवीच्या उंबरठय़ावर उभा असलेला हा देश पुन्हा शांत झाला आहे.
तत्कालीन अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी पुकारलेल्या आणिबाणीच्या काळात २००७ मध्ये सरन्यायाधीश इफ्तिकार चौधरी यांना पदच्युत करण्यात आले होते. आता पाकिस्तानचे सध्याचे सरन्यायाधीश अब्दुल हमीद डोगर जेव्हा निवृत्त होतील तेव्हा म्हणजे या महिन्याच्या २१ मार्चला पुन्हा या पदाची सूत्रे ताब्यात घेतील, असे पाकिस्तान शासनातर्फे जाहीर करण्यात आले. अध्यक्ष असीफ अली झरदारी, लष्करप्रमुख अश्फाक कयानी यांच्यासह पंतप्रधान गिलानी यांनी रविवारी रात्रभर निर्माण झालेल्या राजकीय अस्थिर परिस्थितीवर चर्चा करून सदर निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानातील राजकीय परिस्थिती नाटय़मयरीत्या बदलली आहे. नवाझ शरीफ यांनी सरन्यायाधीश चौधरी यांच्यासह सर्व पदच्युत न्यायाधीशांची पुनर्नियुक्तीचा प्रश्न लावून धरला होता, त्याखेरीज गिलानी, कयानी आणि झरदारी यांच्यावर अमेरिकेचाही तसाच दबाव होता. सर्व बाबी विचारात घेऊन सर्व पदच्युत न्यायाधीशांची पुनर्नियुक्ती आणि शरीफ यांनी केलेल्या अन्य मागण्यांवर निर्णय घेण्याचे आश्वासन देऊन पाकिस्तान सरकारने परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळविले आहे.
पाकिस्तानातील मध्यवर्ती गुजरानवाला शहरात शरीफ यांनी केलेल्या भाषणामध्ये लाँग मार्च रद्द करण्याचे आवाहन केले. त्यानंतर त्यांच्या समर्थक व वकील मंडळींनी एकमेकांना मिठाई वाटून आनंदोत्सव व जल्लोष व्यक्त केला. ‘आज पाकिस्तानने चांगली बातमी मिळविली आहे. आमचा पक्ष पदच्युत न्यायाधीशांची पुनर्नियुक्ती इच्छित असून न्यायपालिकेच्या सार्वभौमत्वाची मागणीही करीत आहे आणि अल्लाच्या कृपेने आमची मागणी पूर्ण झाली आहे’, असे नवाझ शरीफ यांनी भाषणामध्ये सांगताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. ‘यानंतर आता पाकिस्तानमध्ये बदलांचे नवे वारे वाहतील, क्रांतीच जणू अवतरेल. पाकिस्तानात खरीखुरी लोकशाही आणण्यासाठी आमचा पक्ष महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल’, असेही शरीफ यांनी जीपमधून भाषण करताना सांगितले.
पंतप्रधान गिलानी यांच्या या आदेशानंतर इफ्तिकार चौधरी यांच्या घरासभोवतालची सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. चौधरी यांना बातमी कळताच त्यांनी आनंद व्यक्त केला व त्यांनी प्रार्थना केली. चौधरी यांच्यासह ज्या न्यायाधीशांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे त्यांची नावे जावेद इक्बाल, खलिनूर रेहमान रामदे, राजा मोहम्मद फायाझ आणि एजाझ अहमद अशी आहेत. मुशीर आलम आणि मकबूल बरार यांची सिंध उच्च न्यायालयात पुनर्नियुक्ती करण्यात आली असून न्या. एजाझ अफजल यांची पेशावर उच्च न्यायालयात आणि ख्वाजा शरीफ व एजाझ अहमद यांची लाहोर उच्च न्यायालयात पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. पाकिस्तान शासनाच्या हुकूमनाम्यामध्ये या सर्वांच्या नावाची रीतसर घोषणा करण्यात आली आहे. मुशर्रफ यांच्या काळात ६० न्यायाधीशांना जरी पदच्युत करण्यात आले होते तरी पाकिस्तान पीपल्स पार्टीने त्यापैकी ४० जणांची पुनर्नियुक्ती केली होती. गेल्या वर्षी काही निवृत्त झाले होते. आता इतर न्यायाधीशांना न्याय देऊन नवाझ शरीफ यांच्या पक्षाची मागणी पूर्ण करण्यात आली आहे.