Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

राष्ट्रवादी व शिवसेनेतील गुप्त समझोत्याबद्दल काँग्रेसमध्ये चिंता!
आघाडीवरून काँग्रेसमध्ये दोन तट
मुंबई, १६ मार्च / खास प्रतिनिधी

 

काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असतानाच काँग्रेसच्या प्रदेश पातळीवरील काही पदाधिकारी व जिल्हाध्यक्षांनी राष्ट्रवादीबरोबर आघाडीचा फेरविचार करण्याची मागणी आज केली. राष्ट्रवादी व शिवसेनेत पडद्याआडून हातमिळवणी झाली असल्यास त्याचा फटका काँग्रेसच्या उमेदवारांना बसेल, असा इशारा या वेळी देण्यात आला. एकूणच राष्ट्रवादीबरोबरील आघाडीवरून काँग्रेस नेत्यांमध्ये दोन तट पडले आहेत. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सौम्य भूमिका घेतली असतानाच माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे राष्ट्रवादीच्या विरोधात आक्रमक झाले आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी तातडीची बैठक बोलाविली होती. त्यात काही पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेसबद्दलच्या संबंधांना तोंड फोडले. राष्ट्रवादी व शिवसेनेत गुफ्तगू वाढले आहे. निवडणुकीत दोन्ही पक्ष पडद्याआडून परस्परांना मदत करण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचे उदाहण म्हणजे शिरुर मतदारसंघातील राष्ट्रवादीचा कमकुवत उमेदवार हे असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. तसेच शिवसेनेच्या मुखपत्रात कालच पवारांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीला अनकुलता दर्शविण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. शिवसेना व राष्ट्रवादीत गुप्त समझोता झाल्यास त्याचा फटका काँग्रेसला बसेल, असे जिल्हाध्यक्षांचे म्हणणे होते. आघाडी असली तरी राष्ट्रवादीची नेतेमंडळी काँग्रेसचा उमेदवार पाडतील अशीही भीती व्यक्त करण्यात आली.
यूपीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार डॉ. मनमोहन सिंग हे असताना आर. आर. पाटील यांच्यासह राष्ट्रवादीची नेतेमंडळी शरद पवार यांचे पंतप्रधानपदासाठी नाव पुढे करीत आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या व्यासपीठांवर पंतप्रधानपदांचे दोन वेगवेगळे उमेदवारांची नावे पुढे आल्यास त्यातून गोंधळ निर्माण होईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली. पंतप्रधानपदाच्या मुद्दय़ावरून यामुळेच काँग्रेसने राष्ट्रवादीच्या मागे फरफटत जाण्यापेक्षा स्वतंत्रपणे लढावे, असा युक्तिवाद करण्यात आला. एकूणच विलासराव देशमुख यांच्या भूमिकेची री ओढण्याचे काम काही जिल्हाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी केले. मात्र आघाडीचा प्रश्न पक्षश्रेष्ठींच्या पातळीवर असून चर्चा करण्याची ही वेळ नाही, असे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केले. शिवसेना व भाजपचे जागावाटप पूर्ण झाल्याने उभय पक्षांकडून प्रचाराला सुरुवात झाली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीत अद्यापही जागावाटपाचा घोळ सुरूच आहे. त्यामुळे दोन्हीकडून दावा करण्यात आलेल्या जागांवरील काँग्रेस व राष्ट्रवादीच्या इच्छुकांची गोची झाली आहे. जागावाटपाला मुर्त स्वरूप येण्यास आणखी दोन-तीन दिवस लागण्याची शक्यता आहे.