Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

महाबळेश्वर संमेलन उधळू नका
वारकऱ्यांना राम शेवाळकर यांचे आवाहन
नागपूर, १६ मार्च / प्रतिनिधी

 

महाबळेश्वर येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. आनंद यादव यांचा राजीनामा मागू नये तसेच, संमेलन उधळण्याची भाषा कृपया करू नये, असे भावनिक आवाहन माजी संमेलनाध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक राम शेवाळकर यांनी केले आहे.
डॉ. आनंद यादव यांच्या ‘संत तुकाराम’ या कादंबरीतील कथित आक्षेपार्ह मजकूरामुळे उठलेल्या वादावर संत साहित्याचा एक पिढीजात उपासक असा स्वत:चा उल्लेख करून वारकऱ्यांना कळकळीचे आवाहन करणारे एक पत्रक राम शेवाळकर यांनी आज प्रसिद्धीस दिले. वारकऱ्यांनी महाबळेश्वर साहित्य संमेलन संपेपर्यंत हा वाद तूर्त स्थगित ठेवावा आणि संमेलनाध्यक्षपदाचा राजीनामा मागण्याची किंवा संमेलन उधळण्याची भाषा कृपया करू नये. संतांनी समृद्ध केलेल्या मराठी सारस्वताच्या या सोहोळ्यात वारकऱ्यांनीही सहृदयपणे सहभागी व्हावे व संत वचनांचा उदार वस्तूपाठ मराठी वाचकांसमोर गिरवून दाखवावा. त्यातच क्षमाशस्त्र हाती बाळगणाऱ्या संस्कृतीची प्रतिष्ठा आहे, असे या पत्रकात शेवाळकर यांनी नमूद केले आहे. ‘संत तुकाराम’ या कादंबरीतील काही चित्रणामुळे एक वादळ निर्माण झाले आहे. कादंबरीतील संत तुकारामविषयक काही उल्लेखांवर वारकरी समाजाने तीव्र आक्षेप घेतला आहे. ते उल्लेख अशोभनीय व अन्यायकारक असल्याच्या ठाम समजुतीमुळे वारकरी समाजाच्या भावना दुखावल्या असणे स्वाभाविकच आहे, असे नमूद करून शेवाळकर यांनी पुढे म्हटले आहे की, प्रतिभावंताचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित असल्याचे नि:संदिग्ध मान्य असणाऱ्यांनासुद्धा लोकमानसातील अतिसंवेदनशील विषयाबद्दल काही पथ्य कटाक्षाने पाळणे अत्यावश्यक वाटते. संत श्रेष्ठ तुकाराम हा केवळ दहा लाख वारकऱ्यांचाच नव्हे तर, कोटय़वधी मराठी भाषकांच्या नितांत श्रद्धेचा विषय आहे आणि गेल्या ४०० वर्षांंपासून महाराष्ट्र ही श्रद्धा जोपासत आला आहे, असे नमूद करून राम शेवाळकर यांनी पुढे म्हटले आहे की, लिहिताना स्खलन झाले, त्याबद्दल डॉ. आनंद यादव यांनी सर्व वारकरी बांधवांची क्षमायाचना केली आहे. इतकेच नव्हे तर, वारकऱ्यांच्या आग्रहामुळे त्यांचे पुस्तकही त्यांनी परत घेतले आहे. लिहिलेले पुस्तक परत घेण्याची वेळ मराठी साहित्याच्या इतिहासात आजपर्यंत कुणावरही आली असेल, असे वाटत नाही.