Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

अवकाशात सापडले तीन नवीन जिवाणू
बंगलोर, १६ मार्च/पीटीआय

 

अतिशय प्रखर अशा अल्ट्रा व्हायोलेट किरणांना न जुमानता जिवंत राहणाऱ्या जिवाणूंच्या तीन जाती भारतीय वैज्ञानिकांना वातावरणाच्या स्ट्रॅटोस्फिअर या थरात सापडल्या असून या जाती पृथ्वीवर सापडत नाहीत. या संशोधनामुळे पृथ्वीवरील जिवांची उत्पत्ती अवकाशातील जिवाणूंपासून झाल्याच्या पॅनस्पर्मिआ सिद्धांताला बळकटी मिळाली आहे. ज्येष्ठ खगोलवैज्ञानिक जयंत नारळीकर यांनी या प्रयोगात प्रमुख भूमिका पार पाडली आहे.
या जिवाणूंपैकी एका जातीला जॅनीबॅक्टर हॉयली असे नाव देण्यात आले आहे. ख्यातनाम खगोलवैज्ञानिक फ्रेड हॉयल यांच्या सन्मानार्थ या जिवाणूला ते नाव दिले आहे. दुसऱ्या जिवाणूला बॅसिलस इस्रोनेसिस असे नाव दिले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने बलूनच्या मदतीने हे जिवाणू शोधण्यासाठी संशोधन केले म्हणून इस्रोचे नाव या जिवाणूला दिले आहे. तिसऱ्या जिवाणूला बॅसिलस आर्यभट असे नाव दिले आहे, प्राचीन काळातील खगोलवैज्ञानिक आर्यभट यांच्या तसेच भारताचा पहिला उपग्रह असलेल्या आर्यभटच्या नावावरून हे नाव दिले आहे.
इस्रोने दिलेल्या माहितीनुसार बलून प्रयोगात २६.७ दशलक्ष घनफुटाचे
बलून ४५९ किलोचा पेलोड घेऊन पाठवले होते. हा पेलोड ३८ किलो द्रव निऑनमध्ये भिजवण्यात आला होता. हैदराबाद येथील नॅशनल बलून यंत्रणेच्या मदतीने तो अवकाशात पाठवण्यात आला. हे केंद्र टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या माध्यमातून चालवले जाते. या पेलोडमध्ये क्रायोसॅम्पलर ठेवलेले होते, ते स्टीलचे बनवलेले होते व स्टरलाईज्ड म्हणजे निर्जुतूक केलेले होते. क्रायोपम्प परिणाम साधण्यासाठी ते द्रव निऑनमध्ये बुडवून ठेवून नंतर वापरले होते. या उपकरणांनी २० ते ४२ किमी उंचीवर हवेचे नमुने घेतले.
या नमुन्यांचे विश्लेषण हैदराबाद येथील सेंटर फॉर सेल्युलर अँड
माल्युक्युलर बायॉलॉजी या संस्थेत करण्यात आले. पुण्यातील नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्सेस या संस्थेनेही या नमुन्यांचे विश्लेषण करून दिले. या नमुन्यांमध्ये १२ जिवाणू व सहा बुरशी सापडल्या. त्यातील नऊ नमुने हे १६ आरएनए सिक्वेन्सवर आधारित होते त्यामुळे एकूण ९८ नमुन्यांमध्ये पृथ्वीवरील जिवाणूंशी साधम्र्य आढळून आले. पीव्हीएएस१, बी३ डब्ल्यू२२ व बी ८ डब्ल्यू २२ या जिवाणू समूहांचे अस्तित्व मात्र पूर्णपणे नवीन होते, हे तीनही जिवाणू पृथ्वीवर सापडत नाहीत व पृथ्वीवरील जिवाणूंच्या तुलनेत ते अतिनील किरणातही जिवंत राहू शकतात हे त्यांचे वैशिष्टय़ आहे. यातील पीव्हीएएस१ जिवाणूला जानीबॅक्टर हॉयेली,बी३ डब्ल्यू२२ या जिवाणूला बॅसिलस इस्रोनेसिस व बी ८ डब्ल्यू २२ या जिवाणूला बॅसिलस आर्यभट असे नाव देण्यात आले आहे.
या संशोधन मोहिमेत आयुकाचे ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ.जयंत नारळीकर यांचा प्रमुख पुढाकार होता. इस्रोचे ज्येष्ठ वैज्ञानिक यू.आर.राव, अवेशनाचे पी.एम.भार्गव, पुण्याच्या एनसीसीएसचे डॉ.योगेश शौचे, हैदराबादच्या सीसीएमबीचे एस.शिवाजी, टीआयएफआरचे रवी मनचंदा यांनीही यात मोठी भूमिका पार पाडली. पेलोड तयार करण्यात इस्रोचे सीबीएस दत्त यांनी मोठा वाटा उचलला. यापूर्वी २००१ मध्ये इस्रोने असाच प्रयोग केला होता. आता अशा प्रकारचे प्रयोग आणखी काहीवेळा करून निष्कर्ष काढले जाणार आहेत.