Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

आयपीएल झाली ‘इंडियन प्रॉब्लेम लीग’
मुंबई, १६ मार्च / क्री. प्र.

 

‘इंडियन क्रिकेट लीग’च्या पाठी लागलेल्या समस्या कमी होण्याऐवजी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. केंद्र सरकारने निवडणूकांदरम्यान क्रिकेट सामन्यांना सुरक्षा देण्यासाठी राज्यांना जादा कुमक देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि दिल्ली यांना निवडणुकांदरम्यान क्रिकेट सामन्यांना सुरक्षा पुरविण्यास असमर्थता व्यक्त केली आहे. याचाच अर्थ आयपीएल स्पर्धा अन्यत्र हलवावी लागेल किंवा मे महिन्यात खेळवावी लागेल. आयपीएल स्पर्धा मे महिन्यात खेळविल्यास समस्यांचा दुसरा अध्याय सुरू होईल. ऑस्ट्रेलियाच्या साऱ्या प्रमुख खेळाडूंनी या स्पर्धेकडे पाठ फिरविली आहे. पाकिस्तानने आपल्या खेळाडूंना भारतात जाण्यास मज्जाव केला आहे. मे महिन्यात स्पर्धा झाल्यास इंग्लिश क्रिकेट बोर्डाने आपल्या खेळाडूंना ‘अ‍ॅशेस’साठी सज्ज व्हा, भारतात जाऊ नका, असा सल्ला दिला आहे. एकूणच पहिल्याच स्पर्धेत क्रिकेट जगतात लोकप्रियतेचे शिखर गाठणारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची इंडियन प्रिमियर लीग सध्या ‘इंडियन प्रॉब्लेम लीग’ झाली आहे. या स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाच्या कार्यक्रमाच्या मंजुरीसाठी आयोजकांना गृहमंत्रालयाचे खेटे मारावे लागत असून आज पुन्हा एकदा या स्पर्धा कार्यक्रमात बदल करा, अशा सूचना गृहमंत्रालयाने केल्या आहेत. ज्या राज्यात सामने आयोजित करायचे आहेत, त्या राज्यांना नेमक्या कुठल्या तारखांना हे सामने आयोजित करावेत, याची विचारणा करूनच पुन्हा नवा स्पर्धा कार्यक्रम आखावा, अशी सूचना त्यांनी आयोजकांना केली.