Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
प्रादेशिक

भालचंद्र पेंढारकर यांना जीवनगौरव प्रदान
मुंबई, १६ मार्च/नाटय़-प्रतिनिधी

‘नटश्रेष्ठ’ प्रभाकर पणशीकर यांच्या नावे देण्यात येणारा महाराष्ट्र शासनाचा ‘रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार’ संगीत रंगभूमीवरील नटश्रेष्ठ भालचंद्र पेंढारकर यांना आज प्रदान करण्यात येत आहे, हा एक मणिकांचनयोगच आहे. गेल्या तीन वर्षांत अण्णांना चतुरंग प्रतिष्ठानच्या पुरस्कारासह हा तिसरा जीवनगौरव पुरस्कार मिळत आहे.

घणसोलीतील सहा वर्षांच्या अपहृत मुलाची बिहारमधून सुटका
नवी मुंबई, १६ मार्च/प्रतिनिधी

घणसोली गावातील सुनील म्हात्रे चाळीतून महिनाभरापूर्वी पळविण्यात आलेल्या आदेश वानखेडे या अवघ्या सहा महिने वयाच्या बालकाची बिहार येथून सुखरूप सुटका करण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले आहे. लग्न होऊन आठ वर्षे उलटूनही मूल होत नसल्याने मुलाच्या हव्यासापोटी या चाळीतच राहणाऱ्या इंदू राकेश सिंग तसेच विजय ठाकूर या दोघांनी आदेशचे अपहरण करून त्याला बिहार येथे नेले होते.

‘आर्थिक मंदीतही राज्याची स्थिती भक्कम’
मुंबई, १६ मार्च/ खास प्रतिनिधी

भारतातील प्रमुख औद्योगिक राज्य म्हणून महाराष्ट्र सतत अग्रेसर राहिले आहे. जून २००५ मध्ये विशाल प्रकल्पांचे धोरण घोषित करण्यात आल्यापासून १३५ मेगा प्रकल्पांना मान्यता देण्यात आली असून या प्रकल्पांमध्ये सुमारे एक लाख ५३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. यातून तीन लाख ३१ हजार नवीन नोकऱ्या निर्माण होतील. आर्थिक मंदी असतानाही चालू वित्तीय वर्षांत ३५ नवीन प्रकल्पांना मान्यता देण्यात आल्याचे प्रतिपादन राज्यपाल एस. सी. जमीर यांनी आज विधिमंडळातील अभिभाषणात केले. त्याचप्रमाणे दीर्घकाळ प्रलंबित असलेला सीमा प्रश्न सोडविण्यासाठी आपले सरकार कटिबद्ध असल्याचेही राज्यपालांनी सांगितले.

नाना पटोले यांच्या राजीनाम्यावरून गोंधळ
पक्षांतर केलेल्या तीन आमदारांचे राजीनामे
मुंबई, १६ मार्च / खास प्रतिनिधी
गोविंदराव आदिक व यशवंतराव गडाख या काँग्रेसमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या दोघांनी विधान परिषदेच्या आमदारकीचा तर राष्ट्रवादीमधून शिवसेनावासी झालेल्या सुरेश जैन यांनी विधानसभा सदस्यत्वाचा आज राजीनामा दिला. पक्षांतर केलेल्या तिघांचे राजीनामे स्वीकृत झाले. मात्र काँग्रेसचे नाना पटोले यांच्या राजीनाम्यावरून विधानसभेत गोंधळ झाला. पटोले यांचा राजीनामा का स्वीकृत होत नाही, असा सवाल करीत विरोधी पक्ष सदस्यांनी अध्यक्षांच्या आसनापुढील मोकळ्या जागेत धाव घेतली.

जादूटोणाविरोधी कायदा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
मुंबई, १६ मार्च/ खास प्रतिनिधी

जादूटोणाविरोधी कायदा करण्याची सरकारची भूमिका आहे. मात्र त्याबाबतचे गैरसमज दूर करून संवाद व समन्वयाने हा कायदा करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शिष्टमंडळाला दिले. विधिमंडळात जादूटोणाविरोधी विधेयक मांडण्यात आल्यानंतर त्याला अनेक आमदारांनी आक्षेप घेतल्यामुळे हे विधेयक चिकित्सा समितीकडे पाठविण्यात आले आहे. या विधेयकाचे कायद्यात रूपांतर करण्याची इच्छाशक्ती सरकारकडे नसल्याचा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला आहे.

गृहराज्यमंत्र्यांना हवा पोलीस अधिकाऱ्यांच्या मालमत्तेचा तपशील
मुंबई, १६ मार्च / प्रतिनिधी

मंत्रिमंडळ विस्तारात मुंबईचा कार्यभार गमवावा लागल्यामुळे संतप्त झालेल्या गृहराज्यमंत्री नितीन राऊत यांनी नवे पोलीस महासंचालक एस. एस. विर्क यांना पत्र पाठवून राज्यातील आयपीएस आणि राज्य सेवेतील पोलीस अधिकाऱ्यांच्या मालमत्तेचा तपशील मागविला आहे.

मुंबईहून मनमाडमार्गे रेल्वेने पावणेसात तासांत शिर्डी!
मुंबई, १६ मार्च / प्रतिनिधी

वीकेण्डचा मुहुर्त साधून साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या साईभक्तांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे येत्या शुक्रवारी रात्री मुंबई-शिर्डीदरम्यान एक विशेष गाडी चालविणार आहे. ही गाडी अवघ्या पावणेसात तासांत शिर्डीला पोहोचणार आहे. प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन ही गाडी कायम करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे मध्य रेल्वेने म्हटले आहे.

पक्षांतर केलेल्या तीन आमदारांचे राजीनामे
मुंबई, १६ मार्च / खास प्रतिनिधी

गोविंदराव आदिक व यशवंतराव गडाख या काँग्रेसमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या दोघांनी विधान परिषदेच्या आमदारकीचा तर राष्ट्रवादीमधून शिवसेनावासी झालेल्या सुरेश जैन यांनी विधानसभा सदस्यत्वाचा आज राजीनामा दिला. पक्षांतर केलेल्या तिघांचे राजीनामे स्वीकृत झाले. मात्र काँग्रेसचे नाना पटोले यांच्या राजीनाम्यावरून विधानसभेत गोंधळ झाला.

बोर्डाच्या अधिकाऱ्यांचेच कॉपीबहाद्दरांना संरक्षण!
ठाणे, १६ मार्च/प्रतिनिधी

शालांत परीक्षेच्या ठाण्यातील श्रीरंग विद्यालयात असलेल्या परीक्षा केंद्रात काही विद्यार्थी सर्रासपणे कॉपी करीत असल्याच्या पालकांच्या तक्रारी असून एसएससी बोर्डाचे अधिकारीही त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. श्रीरंग विद्यालयात दहावी परीक्षेचे केंद्र आहे. या केंद्रात परीक्षेच्या काळात अक्षरश: सावळा गोंधळ सुरू असून व्यवस्थापन व केंद्रातील पर्यवेक्षकांकडे तक्रारी करूनही ते दुर्लक्ष करीत असल्याने इतर विद्यार्थ्यांची एकाग्रता भंग होत असल्याचे अनेक पालकांचे म्हणणे आहे. परीक्षेच्या खोलीत काही विद्यार्थी सर्रासपणे एकमेकांना कॉपी पुरविणे, एकमेकांकडे कागद फेकणे, माहिती विचारणे असे प्रकार करीत आहेत. त्याचा त्रास प्रामाणिकपणे पेपर सोडविणाऱ्या विद्यार्थ्यांना होत आहे. काही विद्यार्थिनींनी यासंदर्भात पर्यवेक्षकांकडे तक्रार केली. त्यामुळे पेपर अंगावर फेकून मुलींना त्रास दिल्याचे पालकांनी सांगितले. त्यामुळे आता तक्रारी करण्यासही विद्यार्थी घाबरत आहेत. काही पालकांनी यासंदर्भात एसएससी बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडे दूरध्वनी करून तक्रार केली, परंतु पेपर सुरू होण्याची वेळ ११ची असताना बोर्डाचे अधिकारी मात्र सकाळी १० वाजताच श्रीरंग विद्यालयाला भेट देऊन निघून गेल्याने बोर्डाकडूनही कॉपी बहाद्दरांना संरक्षण दिले जात आहे काय, असा प्रश्न पालक विचारीत आहेत.

रमाबाई नगर गोळीबार प्रकरणाचा निकाल ३० मार्चला?
मुंबई, १६ मार्च / प्रतिनिधी

घाटकोपरच्या रमाबाई नगर गोळीबारप्रकरणी शिवडी सत्र न्यायालय येत्या ३० मार्च रोजी निकाल देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणात राज्य राखीव पोलीस दलाचा अधिकारी मनोहर कदम हा मुख्य आरोपी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्यानंतर ११ जुलै १९९७ रोजी रमाबाई नगरात दंगल उसळली होती. पुतळा विटंबना प्रकरणाचा निषेध करण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर दलित जमाव जमला होता. त्यावेळी मनोहर कदम याच्या आदेशावरून जमावावर गोळीबार करण्यात आला. त्यामध्ये १० जण ठार तर २५ हून अधिक जण जखमी झाले होते. या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने न्या. गुंडेवार आयोगाची नियुक्ती केली होती. या चौकशीतही कदम यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान कदम यांनी आरोपांचा इन्कार केला. जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी गोळीबाराचा आदेश द्यावा लागला, असे कदम याने न्यायालयास सांगितले होते.

विक्रोळीत चकमक; अट्टल दरोडेखोर ठार
मुंबई, १६ मार्च / प्रतिनिधी
जॉय मुरगन उर्फ मुरगेशन हा अट्टल दरोडेखोर सोमवारी रात्री विक्रोळी येथे पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाला. मुंबई व परिसरातील विविध दरोडय़ांच्या गुन्ह्यांसह मुरगेशन याच्याविरोधात पोलिस ठाण्यांमध्ये १८ हून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद आजवर झाली होती. विक्रोळीत पूर्व द्रुतगती महामार्गावर पोलिसांशी झालेल्या चकमकीत तो ठार झाला. मुरगनचा दहिसरमध्ये २००७ साली घातलेल्या ३५ लाखांच्या एका मोठय़ा दरोडय़ातही सहभाग होता. गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनिट सातने ही कारवाई केली.

कॉपी करताना पकडल्या गेलेल्या दहावीतील विद्यार्थीनीची आत्महत्या
मुंबई, १६ मार्च / प्रतिनिधी
शालान्त परीक्षेत कॉपी करताना पकडल्या गेल्याच्या कारणावरून घाटकोपर पूर्व येथील भावी दीपक देसाई (१६) या विद्यार्थीनीने राहत्या इमारतीच्या गच्चीवरून उडी घेऊन आज सायंकाळी आत्महत्या केली. मात्र पोलिसांनी नैराश्य आल्याने तिने आत्महत्या केल्याचा दावा केला. घाटकोपर पूर्व येथील पंतनगर शांती पार्कमधील भावी ही गरोडिया नगर येथील पुणे विद्या भवनची विद्यार्थिनी होती. आज तिचा भूगोलाचा पेपर होता. तिला कॉपी करताना पर्यवेक्षकाने पाहिले. त्यामुळे तिला परीक्षा उपकार्यवाहकाच्या ताब्यात देण्यात आले. त्याने तिची जबानी नोंदविली आणि तिला पुन्हा पेपर लिहिण्यास दिला. त्यानंतर ती घरी गेली आणि सायंकाळी तिने आत्महत्या केली.

सोशल सव्‍‌र्हिस लीगचा १९ मार्चला कार्यक्रम
मुंबई, १६ मार्च/प्रतिनिधी

ना. म. जोशी, सर भालचंद्र भाटवडेकर, जमशेटजी जिजीभॉय, सर हेन्री प्रॉक्टर, जी. के. देवधर अशा ख्यातकीर्तानी स्थापलेल्या ‘सोशल सव्‍‌र्हिस लीग मुंबई’ या संस्थेला १९ मार्च २००९ रोजी ९८ वर्षे पूर्ण होत असून २०११ मध्ये संस्था शतकमहोत्सव साजरा करणार आहे. या शतकमहोत्सवाची तयारी म्हणून संस्थेने ९८ वर्षांच्या वाटचालीवर आधारित एका माहितीपटाची निर्मिती केली असून येत्या १९ मार्च रोजी सायंकाळी परळच्या दामोदर नाटय़गृहात पाच वाजता आयोजिलेल्या कार्यक्रमात हा माहितीपट प्रकाशित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात संस्थेच्या नव्या उपक्रमाचेही उद्घाटन होणार आहे. संस्थेतर्फे कुटुंब समुपदेशन केंद्र सुरु करण्यात येणार असून विवाहपूर्व सल्ला, व्यवसाय मार्गदर्शन आदी क्षेत्रांतील तज्ज्ञ संस्थेच्या उपक्रमात सहभागी होणार आहेत. या उपक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध सोनोलॉजिस्ट डॉ. राजन भोसले यांच्या हस्ते होणार आहे.