Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९

जरा विसावू या वळणावर..
पोटाला बसणारे चटके इतके तीव्र असतात की, वाढत्या तापमानामुळे शरीराला बसणाऱ्या चटक्यांची कदाचित जाणीवच होत नसावी.. रणरणत्या उन्हातही चार पैसे कमावता आले तर पाहावे अशा विचाराने या मातेने मुलासह चौपाटीवरच पथारी पसरली..

आचारसंहितेच्या नावाखाली ‘चांगभलं!’
बंधुराज लोणे

अपुरा पाणीपुरवठा, गळती, बेकायदा बांधकामांकडे दुर्लक्ष!
नागरिकांच्या तक्रारींना वाटाण्याच्या अक्षता लावण्याची सवय असणारे अधिकारी सध्या आचारसंहितेच्या नावाखाली नागरी समस्याची दखल घेण्यासही टाळाटाळ करीत आहेत. अनेक वरिष्ठ नगरसेवकांना असा अनुभव आला असून तुमच्या तक्रारींची दखल घेऊन कामे केली तर म्हणे मतदारांवर प्रभाव टाकला गेल्याचा आरोप होऊ शकेल, असे त्यांना सांगितले जात आहे.

पादचाऱ्यांची सोय की गैरसोय?
शशिकांत कोठेकर

मुंबईत सध्या रेल्वे स्थानक परिसरात स्कायवॉक उभारणीवरून वाद सुरू झाला आहे. वांद्रे रेल्वे स्थानक ते कलानगर हा ‘स्कायवॉक’ जून २००८ मध्ये सुरू झाला आणि स्कायवॉकच्या उपयुक्ततेबाबत संमिश्र प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. मुंबईत ५० स्कायवॉक बांधण्यात येणार आहेत.

मराठी पीचवर विनोद कांबळीची इनिंग्ज
सुनील डिंगणकर

क्रिकेटच्या पिचवर विनोद कांबळी फारसा दिसलाच नाही. तरीही तो वेगळ्याच कारणांनी नेहमी प्रसिद्धीच्या झोतात राहिला आहे. आता तो मराठी चित्रपटात पहिल्यांदाच दिसणार आहे. ‘लागली पैज’ या चित्रपटात त्याने ठसकेबाज नृत्य केले आहे. या गाण्याच्या निमित्ताने विनोदने मराठीतील इनिंग्जला सुरुवात केली आहे.

रेल्वे पोलिसांना मिळणार ‘अ‍ॅनिमल थेरपी’चा आधार!
प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) रेल्वे स्थानकावरील २६/११ च्या भीषण दहशतवादी हल्ल्यात मृत्यूचे भयाण तांडव आणि प्रचंड रक्तपात पाहिल्यामुळे अनेक रेल्वे पोलिसांना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. कामाच्या ताणामुळे आधीच तणावाखाली वावरणाऱ्या पोलिसांच्या दैनंदिन कामकाजावर तसेच त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर त्याचा प्रतिकूल परिणाम जाणवत आहे. त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी आता ‘अ‍ॅनिमल असिस्टेड थेरपी’ची (एएटी) मदत घेण्यात येणार आहे.

‘आयएएस टॉपर’ महाराष्ट्रातील होण्यासाठी..
राजीव कुळकर्णी

केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या नागरी सेवा (मुख्य)
परीक्षेचे निकाल जाहीर झाले असून बिहार-दिल्ली- उत्तर प्रदेशची मक्तेदारी मोडून सनदी सेवेत मराठी टक्का वाढावा व आयएएस टॉपर महाराष्ट्रातील असावा यासाठी पुण्यातील ‘यशदा’ , मुंबईतील राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षणसंस्था व ठाण्यातील सी. डी. देशमुख इन्स्टिटय़ूटने विशेष कार्यक्रम हाती घेतला आहे. आयएएस केडर मिळण्यासाठी मुलाखतींमध्ये मिळणारे गुण महत्त्वाचे असल्याने उमेदवारांनी मुलाखतींना आत्मविश्वासाने सामोरे जावे यासाठी त्यांना कसून प्रशिक्षण दिले जात आहे.

लाखमोलाचे हिरे
सहार येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर थाय एअरलाइन्सने गुजरातमधील एका कंपनीचा अत्यंत मोलाचा कंटेनर आला आणि तो उतरविण्यात आल्यानंतर लगेच गायब झाला. इतकेच नव्हे तर बेवारस कंटेनर्सच्या यार्डात तो काही वेळाने सापडला. परंतु त्यातील साडेचार कोटी रुपयांचे हिरे लांबविण्यात आले होते. विमानतळ सुरक्षा व्यवस्थेला हा प्रचंड हादरा होता. प्रवाशांच्या बॅगेमधून किमती वस्तू चोरीला जाणे हे विमानतळ पोलिसांना नवे नव्हते.

एनसीपीएत आजपासून लावणीवर कार्यशाळा
प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि एनसीपीए यांच्या सहकार्याने मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमी अंतर्गत शाहीर अमर शेख अध्यासनातर्फे १७, १८ आणि १९ मार्च २००९ या दरम्यान लावणीवरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा दुपारी ३ ते संध्या. ५ या वेळात टाटा थिएटरच्या मुख्य सभागृहाशेजारील सभागृहात होईल. या कार्यशाळेचे उद्घाटन १७ मार्च रोजी ज्येष्ठ नाटय़ दिग्दर्शिका डॉ. विजया मेहता यांच्या हस्ते होणार आहे. १७ मार्च रोजी लावणीतील नृत्य या विषयावर सुबल सरकार मार्गदर्शन करणार असून छाया खुटेगावकर आणि रेश्मा परितेकर प्रात्यक्षिके सादर करतील. १८ मार्च रोजी लावणीतील गायन या विषयावर डॉ. अशोक रानडे मार्गदर्शन करतील तर मंगल कुडाळकर प्रात्यक्षिक सादर करतील. १९ मार्च रोजी लावणीतील अदाकारी या विषयावर डॉ. संध्या पुरेचा मार्गदर्शन करणार असून गुलाबबाई संगमनेरकर प्रात्यक्षिक सादर करतील. ही कार्यशाळा मुंबई विद्यापीठातील विद्यार्थी तसेच लोककला व नाटय़ क्षेत्रातील अभ्यासक, जाणकार आणि विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य आहे. कार्यशाळेतील प्रवेशासाटी लोककला अकादमी, विद्यापीठ विद्यार्थी भवन, तिसरा मजला, ‘बी’ रोड, चर्चगेट, मुंबई- ४०००२०. दूरध्वनी- २२८७१७८८/ ९८२०८४५८२४ येथे संपर्क साधावा.

दहिसर विद्यामंदिरचे अभिनव संस्कार शिबीर
प्रतिनिधी

विद्या प्रसारक मंडळाच्या दहिसर विद्यामंदिरमध्ये इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी आगळेवेगळे संस्कार शिबीर नुकतेच घेण्यात आले. या निवासी शिबिरात विद्यार्थ्यांना आपल्या गुरूजनांचा सहवास लाभला. मुलांना आवडेल अशा पद्धतीने हसतखेळत, जादूच्या खेळांतून तसेच अन्य खेळांद्वारे संस्कार करण्याचा अभिनव उपक्रम या शिबिराद्वारे करण्यात आला. दोन दिवस संध्याकाळी पणत्यांची आरास करून सायंप्रार्थना करण्यात आली. तसेच रात्री सर्व मुलांनी शेकोटी पेटविण्याची मजाही केली. दुसऱ्या दिवशी ‘आजी-आजोबांशी हितगुज’ हा कार्यक्रम करून नातवंडांनी आजी-आजोबांशी संवाद साधला. वीरमाता अनुराधा गोरे यांनी आजच्या पालकांसमोरील आव्हाने या कार्यक्रमातून पालकांना मार्गदर्शन केले. तसेच देशाच्या रक्षणासाठी पालकांनी आपल्या पाल्याला लष्करी सेवेत दाखल करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. मौजमजा आणि कळत-नकळत घडविण्यात येणारे संस्कार यामुळे लहानगे विद्यार्थीही या संस्कार शिबिरात दरवर्षी आनंदाने सहभागी होतात.

सुजाता पाब्रेकर स्मृती काव्य स्पर्धा
प्रतिनिधी

डोंबिवली येथील सुजाता पाब्रेकर चॅरिटी ट्रस्टतर्फे सुजाता पाब्रेकर स्मृती राज्यस्तरीय काव्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सुजाता पाब्रेकर स्मृती काव्यसंग्रह पुरस्कारही देण्यात येणार आहेत. यासाठी कविता आणि काव्यसंग्रह पाठविण्याचे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे. काव्यलेखन स्पर्धेसाठी दोन अप्रकाशित कविता तर काव्यसंग्रह पुरस्कारासाठी १ जुलै २००७ ते ३० जून २००८ या कालावधीत प्रकाशित झालेल्या काव्यसंग्रहाच्या दोन प्रती ३० मार्चपर्यंत पाठवायच्या आहेत. कविता आणि काव्यसंग्रह ‘अनिल आठल्ये, अ-१४ तिसरा मजला, हरी गणेश सोसायटी, वीर सावरकर रोड, डोंबिवली (पू.)’ किंवा ‘डॉ. प्रमोद पाब्रेकर, अध्यक्ष, सुजाता पाब्रेकर चॅरिटी ट्रस्ट, बी-३, अंबिका पॅलेस सोसायटी, रामनगर, डोंबिवली (पू.)’ या पत्त्यांवर पाठवावेत. अधिक माहितीसाठी ९५२५१-२४३०३४६ किंवा ९५२५१-२४५११४५ या क्रमांकांवर संपर्क साधावा.