Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९

फुलेल इथे हिरवाई.. नगरपासून २१ किलोमीटर अंतरावर असलेल्या गोरक्षनाथगडाच्या पायथ्याचं हे दृश्य. मांजरसुंबे ते केकताई दरम्यानच्या डोंगररांगांमध्ये वन विभागाने समतल चर खोदले आहेत. पावसाचे वाहून जाणारे पाणी अडून तेथे लवकरच वनसृष्टी फुलेल.

गडाखसमर्थक सदस्य काय निर्णय घेणार?
नगर, १६ मार्च/प्रतिनिधी

आमदार यशवंतराव गडाख यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे जिल्हा परिषदेतील त्यांच्या समर्थक सदस्यांच्या भूमिकेतून सत्तासमीकरणात बदल होणार का, याविषयी उत्सुकता आहे. विशेषत राष्ट्रवादीचे सदस्य याबद्दल अधिक चर्चा करताना दिसतात. जिल्हा परिषदेत सध्या काँग्रेसचे ३३, राष्ट्रवादीचे २५, भाजप-सेना युतीचे ११, विकास आघाडीचे ४ व २ अपक्ष असे पक्षीय बलाबल आहे. काँग्रेसचे पूर्ण बहुमत असले, तरी राष्ट्रवादीला सत्तेत सहभागी करून घेण्यात आले आहे. राष्ट्रवादीला सत्तेत सहभाग दिल्याबद्दल काँग्रेस सदस्यांत नाराजीची भावना आहे.

वटवाघळांच्या गुहेत
नगर महाविद्यालयाने प्राणीशास्त्राची शैक्षणिक सहल महाबळेश्वरला आयोजित केली होती. तेव्हा मी एमएससीचा विद्यार्थी होतो. आमच्याबरोबर आम्हा सर्वानाच आवडणारे प्रा. बनसोडे होते. आम्ही सलग चार दिवस महाबळेश्वरला थांबून विविध बाबींचे अध्ययन करणार होतो. सहलीच्या तिसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही महाबळेश्वरच्या घनदाट जंगलातील गुहा पाहण्यासाठी गेलो. ‘जॉन्स केव्हज’च्या प्रवेशद्वाराशी आलो, तेव्हा गुहेची, तिच्या अवाढव्य लांबी-रूंदीची, तेथील उग्र वासाची व प्राणीजीवनाची जाणीव झाली नाही.

गोदावरी कालवा फुटून वस्त्यांमध्ये पाणी शिरले
निफाड रस्ता ७ तास बंद

कोपरगाव, १६ मार्च/वार्ताहर

गोदावरी डावा तट कालवा नांदूर-मधमेश्वर गावाजवळ पाच किलोमीटर अंतरावर रविवारी रात्री फुटून हजारो क्यूसेक पाणी वाया गेले. गावालगत असलेला पाझर तलाव तुडूंब भरल्याने तोही फुटून आदिवासी व दलित वस्तीत पाणी शिरले. या रहिवाशांचे मोठे नुकसान झाले. रस्त्यावर पाणी पसरल्याने निफाड महामार्गावरील वाहतूक सात तास बंद पडली होती. कालवा त्याच ठिकाणी फुटण्याची ही दुसरी वेळ आहे.

स्थायी समिती निवडीची प्रक्रिया सुरू
तीन अपक्षांच्या याचिकेवर निर्णय नाहीच

नगर, १६ मार्च/प्रतिनिधी

महापालिका प्रशासनाने स्थायी समिती निवडीची प्रक्रिया सुरू केल्याचे समजते. दरम्यान, युतीबरोबर केलेली गटनोंदणीच ग्राह्य़ धरण्याच्या नाशिक विभागीय आयुक्तांच्या निर्णयास आव्हान देणाऱ्या ३ अपक्ष नगरसेवकांच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील याचिकेवर आजही काहीच कामकाज झाले नाही.

स्वस्तात सोन्याचे आमीष दाखवून पुण्यातील शिक्षिकेला लुबाडले
पारनेर, १६ मार्च/वार्ताहर

स्वस्तात सोने देण्याचे आमीष दाखवून पुणे येथील शिक्षिकेला ५० हजार रुपयांना लुबाडण्यात आल्याचा प्रकार तालुक्यातील म्हसणे फाटा येथे घडला. रविवारी दुपारी तीनच्या सुमारास घडलेल्या या प्रकाराबाबत पोलीस ठाण्यात गुन्ह्य़ाची नोंद नसली, तरी म्हसणे, बाबुर्डी, सुपे परिसरातील गावांमध्ये या बाबत जोरदार चर्चा होत आहे. फसविल्या गेलेल्या शिक्षिकेची सुपे परिसरातील काही महिलांशी ओळख आहे. या महिलांनी संबंधित शिक्षिकेला आपल्याकडे चांगल्या प्रकारचे व जुन्या काळातील सोन्याचे दागिने आहेत. सध्याच्या सोन्याच्या भावापेक्षा पाव किमतीत हे दागिने आपण विकणार असल्याचे सांगितले. स्वस्तात सोने मिळविण्याच्या लोभापायी संबंधित शिक्षिका रविवारी दुपारी तीनच्या सुमारास म्हसणे फाटा येथे आली. तेथे आधीपासून थांबलेल्या तीन ते चार महिलांनी व दोन पुरुषांनी शिक्षिकेला काही दागिने दाखविले व पैशांबाबत विचारणा केली. शिक्षिकेने पैसे आणल्याचे सांगत पर्समधील पैसे दाखविले. त्याचबरोबर पुरुषांनी पर्स हिसकावली व महिलांनी संबंधित शिक्षिकेला मारहाण केली. नगर-पुणे रस्त्यावरील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या म्हसणे फाटय़ावर अनेकजणांनी हा प्रकार पाहिला. परंतु आपसांतील प्रकार असे समजून कोणी हस्तक्षेप केला नाही. आपण फसविलो गेल्याचे लक्षात आल्यावर संबंधित शिक्षिकेनेही प्रकरण जास्त वाढविले नाही. सोबत असलेल्या अन्य महिलेबरोबर तिने तेथून काढता पाय घेतला.

न्यायाधीशांच्या चाणाक्षपणामुळे बनावट पंचासह तिघे गजाआड
नगर, १६ मार्च/प्रतिनिधी

मूळ पंचाऐवजी बनावट पंच उभा करण्याचा प्रयत्न न्यायाधीशांच्या चाणाक्षपणामुळे आज उघड झाला. खोटी साक्ष देणाऱ्या बनावट पंचासह दोन्ही आरोपींना कोतवाली पोलिसांनी अटक केली. दारूबंदीच्या एका खटल्यात सुनावणी सुरू असताना हा प्रकार घडला. भरत भागुजी बारस्कर (वर्षे ४०, रा. नागापूर), राजू लालू पवार (रा. निंबळक), बाळू राघुजी बोरगे (रा. बाबुर्डी घुमट) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. बाळू बोरगे हा बनावट पंच म्हणून साक्ष देण्यास आला होता. एमआयडीसी ठाण्याचे सहायक निरीक्षक यादव सातपुते यांनी फिर्याद दिली आहे.
सन २०००मध्ये एमआयडीसी पोलिसांनी दारूअड्डय़ावर छापा घालून भरत व राजू यांना अटक केली होती. हा खटला न्यायाधीश सुप्रिया कुलकर्णी यांच्यापुढे सुरू आहे. आज सुनावणी सुरू असताना पंच मोहन थोरात यांना पुकारण्यात आले. परंतु थोरात यांच्याऐवजी बाळू बोरगे साक्ष देण्यास उभा राहिला. न्यायाधीशांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी चौकशी केली असता बोरगे हा बनावट पंच असल्याचे स्पष्ट झाले. न्यायाधीशांनी पोलिसांना बनावट साक्षीदार व मुख्य आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. त्यानुसार पोलिसांनी बोरगे व त्याच्याशी संगनमत करणारे बारस्कर, पवार यांना अटक केली.

शिर्डीतील लॉजमधून साईभक्ताचा ६० हजार रुपयांचा ऐवज चोरीस
राहाता, १६ मार्च/वार्ताहर

येथील एका लॉजच्या बंद खोलीचा कडी-कोयंडा तोडून हैदराबाद येथील साईभक्ताचे १२ हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर, काही भारतीय चलन, लॅपटॉप, मोबाईल असा ५० ते ६० हजार रुपयांचा ऐवजाची चोरी झाली. हा प्रकार शिर्डी येथे शनिवारी रात्री घडला. मनोजकुमार बी. प्रकाश (राहणार हैदराबाद) असे या साईभक्ताचे नाव असून, ते शिर्डीतील ओमसाई चॅरिटेबल ट्रस्ट, हॉटेल अशोकाशेजारी असलेल्या एका नवीन लॉजमध्ये शनिवारी सकाळी कुटुंबासह उतरले होते.
सर्व सामान या लॉजच्या खोलीत ठेवून मनोजकुमार शनिवारी सायंकाळी साईबाबांच्या दर्शनास गेले. ते रात्री ११ वाजता आल्यानंतर चोरीचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. मनोजकुमार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शिर्डी पोलिसांनी अज्ञात चोरटय़ांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला.

वीजप्रश्नी उपोषण आश्वासनानंतर मागे
श्रीगोंदे, १६ मार्च/वार्ताहर

पालिका हद्दीतील वाडय़ा-वस्त्यांना शहराप्रमाणे वीजपुरवठा करावा, या मागणीसाठी आज राष्ट्रवादीच्या नगरसेवकांसह नागरिकांनी तहसील कार्यालयासमोर केलेले उपोषण आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. शहरात विजेची वेगळी व वाडय़ा-वस्त्यांवर ग्रामीण भागाप्रमाणे कपात असते. वीजजोड अनामत घेताना वाडय़ांवरील रहिवाशांकडून शहराप्रमाणे बिल आकारले जाते. त्यामुळे वीजपुरवठा शहराप्रमाणे होणे गरजेचे आहे. वाडय़ांवर सिंगल फेज योजना राबविण्याबाबत २ वर्षांपूर्वी संबंधितांनी लेखी आश्वासन दिले. मात्र, या बाबत अजूनही हालचाल झाली नाही, तसेच पालिका हद्दीतील दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींना १५ रुपयांप्रमाणे वीजजोड द्यावा, या मागण्या उपोषणकर्त्यांनी केल्या.महावितरणचे कार्यकारी अभियंता एस. ए. मीर यांनी वाडय़ांवरील वीजकपातीचे वेळापत्रक बदलताना ६ महिन्यांत सिंगल फेज योजना मार्गी लावू, असे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. उपोषणात नगराध्यक्ष भागचंद घोडके, उपनगराध्यक्ष राजू गोरे, मनोहर पोटे, अख्तर शेख, शहाजी खेतमाळीस, संतोष क्षीरसागर, सतीश मखरे या नगरसेवकांसह बापूराव सिदनकर, प्रकाश वाळके सहभागी झाले होते.

‘पस्तिशीनंतर आरोग्याबाबत महिलांनी दक्षता बाळगावी’
राहुरी, १६ मार्च/वार्ताहर

वयाच्या पस्तीशीनंतर उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांकडे महिलांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अनुराधा देशमुख यांनी व्यक्त केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठात महिला दिनानिमित्त आयोजित आरोग्य तपासणी शिबिरात ‘पस्तीशीनंतर महिलांचे आरोग्य आणि घ्यावयाची काळजी’ या विषयावर महिलांना त्या मार्गदर्शन करीत होत्या. अध्यक्षस्थानी निर्मिती महिला मंडळाच्या अध्यक्षा जयश्री देशमुख होत्या. डॉ. बी. आर. सिन्नारे यांनी आपले आरोग्य आपल्या हाती, मधुमेह या विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी १६४ महिलांची आरोग्य तपासणी करून उपचार करण्यात आले. प्रारंभी कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख, जयश्री देशमुख, डॉ. बी. आर. सिन्नारे, कुलसचिव राजेंद्रकुमार पाटील, विस्तार शिक्षण संचालक डॉ. किरण कोकाटे यांच्या हस्ते विद्यापीठ दवाखाना परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. महिलांनी नोकरी करावी का? या विषयावर आयोजित परिसंवादात ६ स्त्रिया, ४ विद्यार्थी, तसेच विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजीव नाईक व क्रीडा अधिकारी डी. एम. गायकवाड यांनी मनोगते व्यक्त केली. जयश्री कुलकर्णी, महानंदा पवार, वैशाली अहिरे, अनिता दुरगुडे, सुभद्रा फुलपगारे, ममता पाटील, सरला हिरे, मंगला गारसे, विजया बढे, अंजली पत्की यांना या प्रसंगी गौरविण्यात आले. सूत्रसंचालन निशा त्रिभुवन हिने केले. श्रद्धा धावडे हिने आभार मानले.

‘तनपुरे’च्या कामगारांचे शरद पवारांना निवेदन
राहुरी, १६ मार्च/वार्ताहर

डॉ. तनपुरे साखर कारखान्याच्या अन्यायग्रस्त कामगारांनी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची नगर येथे आज (मंगळवारी) श्री. यशवंतराव गडाख यांच्या निवासस्थानी भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले. श्री. पवार यांना कामगारांनी सविस्तर निवेदन दिले. श्री. पवार यांनी गोविंदराव आदिक यांना याप्रश्नी लक्ष घालण्याचे सांगून दोन दिवसांत सर्व माहिती संकलित करून आपल्याकडे पाठविण्यास सांगितले. नुकतेच नगर येथे राष्ट्रीय साखर कामगार महासंघाचे अधिवेशन पार पडले. तेथेही पॅकेज कामगारापर्यंत पोहोचू न देणाऱ्या कारखान्यांविरुद्ध कारवाई करण्याचे सूतोवाच केले होते. ‘तनपुरे’च्या कामगारांनी आज नव्याने पवार यांची स्वतंत्र भेट घेऊन लक्ष वेधले. कामगार कृती समितीचे अध्यक्ष अप्पासाहेब गावडे, सचिव अशोक शेळके यांनी बाजू मांडली. दरम्यान, कामगारांनी द्वारबंद व कामबंद आंदोलन चालूच ठेवले आहे.

लीलाबाई भागवत यांचे निधन
पाथर्डी, १६ मार्च/वार्ताहर

सेवानिवृत्त शिक्षिका लीलाबाई मुरलीधर भागवत (वय ६७) यांचे काल निधन झाले. त्यांच्या मागे ३ मुली, १ मुलगा, नातू, पणतू असा परिवार आहे. आंध्र प्रदेशातील खमाम जिल्ह्य़ाचे पोलीसप्रमुख महेश भागवत यांच्या त्या मातुश्री होत. एक महिन्यापूर्वीच उपचारासाठी त्यांना हैदराबाद येथील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काल दुपारी दोनच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. आदर्श शिक्षिका म्हणून त्या परिचित होत्या. आज सकाळी कोरडगाव रोडवरील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी बबनराव ढाकणे,डॉ. दीपक देशमुख, नंदकुमार शेळके, मिठूभाई शेख, मनसे जिल्हाध्यक्ष देवीदास खेडकर, संतोष जिरेसाळ, डॉ. नितीन खेडकर, डॉ. मृत्युंजय गर्जे, नगर येथील डॉ. सुनील जाधव, डॉ. पोपट कर्डिले आदी उपस्थित होते.

वीज वितरण कंपनीच्या विरोधात उपोषणाचा इशारा
राहाता, १६ मार्च/वार्ताहर

भविष्यनिर्वाह निधीची रक्कम मिळावी व मुलाला अनुकंपा तत्त्वावर नोकरी द्यावी, या मागणीसाठी येथील वीज वितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा तालुक्यातील पिंप्री निर्मळ येथील महिला जिजाबाई घोरपडे यांनी दिला आहे. वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांना पाठविलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, माझे पती सुखदेव घोरपडे वीज वितरण कंपनीच्या येथील उपविभागीय कार्यालयात सेवेत होते. शिर्डी येथे विद्युत खांबावर काम करीत असताना त्यांचे दि. २६ फेब्रुवारी २००६ रोजी अपघाती निधन झाले. त्यांच्या भविष्यनिर्वाह निधीची रक्कम मिळण्यासाठी सर्व कागदपत्रे कार्यालयाकडे सुपूर्द केली. मात्र, दोन वर्षे होऊनही आपल्याला अद्यापि ही रक्कम मिळालेली नाही. पतीचे निधन होऊन तीन वर्षे झाली. या संदर्भात आपण वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात वारंवार जाऊनही अधिकारी अपमानास्पद वागणूक देऊन उडवाउडवीची उत्तरे देतात. माझा मुलगा चंद्रकांत याला अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळण्याचा प्रस्ताव पाठवून बरेच दिवस झाले. तरीही अद्याप कार्यवाही झालेली नाही. अधिकाऱ्यांच्या विरोधात कार्यालयासमोर दि. १ एप्रिल रोजी उपोषणास बसण्याचा इशारा श्रीमती घोरपडे यांनी दिला आहे.

जिवाजीराव शिंदे महाविद्यालयास ३० लाखांचा निधी - जगदाळे
श्रीगोंदे, १६ मार्च/वार्ताहर

रयत शिक्षण संस्थेच्या महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयास मुलींच्या वसतिगृहासाठी दुसऱ्या टप्प्यात ६० लाख रुपये मंजूर झाले. त्यापैकी ३० लाख रुपयांचा निधी महाविद्यालयास मिळाल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलास जगदाळे यांनी दिली. ११व्या पंचवार्षिक योजनेंतर्गत ट्रॅव्हल्स अ‍ॅण्ड टुरिझमसाठी ५ लाख रुपये मिळाले आहेत. पुणे विद्यापीठ गुणवत्ता सुधार योजनेंतर्गत लेडीज कॉमन रूमसाठी ३ लाख रुपये, तसेच स्पोर्टस् साहित्य, इंटरकॉम सिस्टिम, विविध चर्चासत्रे, व्याख्यानमाला यासाठी ७ लाखांचे अनुदान असे या चालू शैक्षणिक वर्षांत ८५ लाखांचे अनुदान मंजूर झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलास जगदाळे यांनी दिली. तसेच गेल्या शैक्षणिक वर्षांतही १५ लाखांचे अनुदान यूजीसी व पुणे विद्यापीठाकडून मिळाले होते.

पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला पोलीस कोठडी
देवळाली प्रवरा, १६ मार्च/वार्ताहर

राहुरी तालुक्यातील चिकलठाण येथील खूनप्रकरणातील आरोपीला न्यायालयाने २३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. चिकलठाण येथील गंगाराम मावळा केदार (वय ४५) गुरुवारी (१२ मार्च) पत्नीसह राहुरी येथे आठवडेबाजारासाठी आला होता. बाजारहून परतताना पत्नी गजराबाई हिच्याशी गंगारामचा वाद झाला. त्यावरून गंगारामने हत्याराने तिच्या तोंडावर व छातीवर वार करून ठार केले. ही घटना १३ मार्च रोजी घडली.

‘मार्क्‍सवाद व आंबेडकरवादाच्या समन्वयातून समता प्रस्थापित होईल’
नगर, १६ मार्च/प्रतिनिधी

मार्क्‍सवाद व आंबेडकरवाद म्हणजे कष्टकऱ्यांच्या मुक्तीचे क्रांतिकारक तत्त्वज्ञान आहे. त्यांच्या समन्वयातूनच भारतात समता प्रस्थापित होईल, असे मत राजकीय विचारवंत डॉ. आदिनाथ इंगोले (नांदेड) यांनी व्यक्त केले. लोक सांस्कृतिक मंचाच्या वतीने कार्ल मार्क्‍स यांच्या स्मृतिदिनानिमित्त महापालिका सभागृहात आयोजित व्याख्यानमालेत इंगोले बोलत होते. समाजवाद कालबाह्य़ झाल्याची हाकाटी पिटणारे साम्राज्यवादी भांडवलदार जागतिकीकरणाची कटू फळे दिसू लागल्यावर आता समाजवादाची भाषा बोलू लागले आहेत, असे त्यांनी सांगितले. चित्रकार राजानंद सुराडकर यांनी शोषितांच्या वेदनांना शब्दबद्ध करणाऱ्या निवडक कवितांना दिलेल्या चित्ररुपाचे प्रदर्शन या वेळी आयोजित करण्यात आले होते. चित्रकार रवींद्र सातपुते यांनी या प्रदर्शनाचे उद्घाटन केले.
मंचाचे शहर अध्यक्ष संदीप सकट यांनी प्रास्ताविक केले. दिवंगत कामगार नेते प्रभाकर संझगिरी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दीपक पापडेजा यांचे भाषण झाले. कार्यक्रमाला माजी नगरसेवक बहिरनाथ वाकळे, लोकभारतीचे असिफखान दुलेखान, प्रा. महेबूब सय्यद, अशोक सब्बन, विठ्ठल बुलबुले, तारा सातपुते, प्रियंका सातपुते, मंदा पोळ आदी या वेळी उपस्थित होते. संतोष शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सय्यद यांनी आभार मानले.

दुसरे लग्न केले म्हणून मेहुण्यास तलवारीने मारहाण
नगर, १६ मार्च/प्रतिनिधी

दुसरे लग्न केल्याच्या रागातून मेहुण्यास तलवारीने मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले. रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून त्याच्याजवळील अडीच तोळे सोन्याची साखळी व १४ हजार रुपयेही चोरण्यात आले. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी आठजणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न व दरोडय़ाबद्दल गुन्हा दाखल केला आहे. अय्याज खान दौलतखान (रा. मंगलगेट) यांनी फिर्याद दिली आहे. अय्याज खान यांनी दुसरे लग्न केल्याच्या रागातून त्यांच्या सासरच्या लोकांनी त्यांना मारहाण केली. हा प्रकार मोचीगल्लीत घडला. अय्याज खान यांच्यावर तलवारीने वार करून त्यांना गंभीर जखमी करण्यात आले. तसेच रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून त्यांच्याजवळील सोन्याची चेन व १४ हजार रुपये लांबविण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी सलीम रज्जाक शेख, शब्बीर रज्जाक शेख, तस्लीम रज्जाक शेख, अन्वर रज्जाक शेख, हबीब रज्जाक शेख, फैरोज रज्जाक शेख, बबलू शेख, अजर शेख यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, तसेच दरोडय़ाचा गुन्हा दाखल केला. अय्याज खान यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तपास उपनिरीक्षक शिवाजी कोळी करीत आहेत.

नगरच्या खेळाडूंना ६ सुवर्ण, १ कास्य
पॅरालिंपीक अ‍ॅथलेटिक्स
नगर, १६ मार्च/प्रतिनिधी

गेल्या महिन्यात जयपूर येथे झालेल्या पॅरालिंपीक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत नगरच्या खेळाडूंनी उत्तम कामगिरी करून ६ सुवर्ण व १ कास्यपदक पटकावले. विलास दवणे यांनी एफ-५४ गटात भालाफेकीत सुवर्णपदक पटकावले. उल्हास दुगड यांनी एफ-५८ गटात भालाफेक व गोळाफेकीत सुवर्णपदक, तर थाळीफेकमध्ये कास्यपदक मिळविले. दीपा मलिक यांनी एफ-५३ गटात भालाफेक, गोळाफेक व थाळीफेक या तीनही क्रीडाप्रकारांत सुवर्णपदक मिळविले. या खेळाडूंचे जिल्हाधिकारी डॉ. पी. अन्बलगन यांनी अभिनंदन केले. स्पर्धकांना रावसाहेब बाबर यांनी मार्गदर्शन केले.

गडाखांचे व्यक्तिमत्त्व सुसंस्कृत - पाटील
नगर, १६ मार्च/प्रतिनिधी

आमदार यशवंतराव गडाख यांच्या ‘अर्धविराम’ आणि ‘सहवास’ या पुस्तकांतून त्यांचे सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व व समाजकारण दिसून येते, अशा शब्दांत गोरेगाव फिल्मसिटीचे व्यवस्थापकीय संचालक संजय पाटील यांनी कौतुक केले. मुळा एज्युकेशन सोसायटी (सोनई) संचलित इंग्रजी व मराठी माध्यमांच्या अध्यापक महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण कार्यक्रमात श्री. पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी ऋतुरंग प्रकाशनचे अरुण शेवते होते. श्री. पाटील यांनी कवितावाचनही केले. पाहुण्यांचा परिचय प्राचार्या सुकन्या भाटे यांनी करून दिला. नितीन केणे यांनी आभार मानले. प्रा. डॉ. महेश रच्चा, संस्थेचे समन्वयक व्यंकटेश बेल्हेकर आदी उपस्थित होते. श्री. पाटील यांच्या हस्ते स्मृतिग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.

आर्थिक निकषांवर आरक्षणाच्या मुद्यावर क्रांतिसेना भर देणार
नगर, १६ मार्च/प्रतिनिधी

आर्थिक निकषांवर आरक्षण मिळावे व अ‍ॅस्ट्रॉसिटी कायदा रद्द व्हावा, या मुद्दय़ांवर क्रांतिसेना पक्ष लोकसभा व विधानसभा निवडणूक लढविणार असल्याची माहिती शहरप्रमुख गणेश जाधव यांनी पत्रकाद्वारे दिली. जातीनिहाय आरक्षणामुळे समाजात जातीयवाद वाढत चालला आहे. काही राजकारणी मंडळी विविध समाजातील लोकांना भडकाविण्याचे काम करून आपला राजकीय हेतू साध्य करतात. काही नेते निवडणुका जवळ आल्या म्हणून मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करतात, तर काहीजण विरोध करतात. क्रांतिसेना आर्थिक आरक्षणावर ठाम असून, पक्षाने लोकसभेसाठी नगरमधून डॉ. कृषिराज टकले व शिर्डीमधून सचिन धोत्रे यांना उभे करण्याचा निर्णय घेतला आहे, असे पत्रकात म्हटले आहे.