Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९

जागो ग्राहक जागो -वस्तू आणि खाद्यपदार्थ खरेदी करताना ग्राहकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी ग्राहक दिनानिमित्त सोमवारी राज्याच्या अन्न व औषध प्रशासन खात्यातर्फे ग्राहक जागृतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.

निवडणुकांमुळे परीक्षांचे वेळापत्रक बिघडणार
नागपूर, १६ मार्च/ प्रतिनिधी

उन्हाळी परीक्षेची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने जय्यत तयारी केली असली तरी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमुळे काही परीक्षांचे वेळापत्रक बिघडणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. उन्हाळी परीक्षांमध्ये एकूण ५२ परीक्षा होऊ घातल्या असून १,८७,०२६ विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत. मे अखेपर्यंत सर्व परीक्षा पूर्ण होतील याची खबरदारी आधीच्या वेळापत्रकात घेण्यात आली होती.

पावसानंतर उन्हाचा चटका
नागपूर, १६ मार्च / प्रतिनिधी

चार दिवसांचे ढगाळ वातावरण आणि काही भागात बरसलेल्या अवकाळी पावसानंतर सोमवारी पावसाच्या सरींचा अंदाज असतानाही आकाश निरभ्र झाले आणि पुन्हा उन्हाचा चटका नागरिकांनी अनुभवला. कडक उन्हाळ्याला सुरुवात झालेली असतानाच विदर्भात सलग चार दिवस बदललेल्या वातावरणाचा अनुभव नागरिक घेत आहेत. गेल्या चार दिवसात विदर्भात अपवाद सोडता सर्वत्र मेघगर्जना, वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली.

महाबळेश्वर संमेलन उधळू नका
राम शेवाळकर यांचे वारकऱ्यांना आवाहन

नागपूर, १६ मार्च / प्रतिनिधी

महाबळेश्वर येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. आनंद यादव यांचा राजीनामा मागू नये तसेच, संमेलन उधळण्याची भाषा कृपया करू नये, असे भावनिक आवाहन माजी संमेलनाध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक राम शेवाळकर यांनी केले आहे. डॉ. आनंद यादव यांच्या ‘संत तुकाराम’ या कादंबरीतील कथित आक्षेपार्ह मजकूरामुळे उठलेल्या वादावर संत साहित्याचा एक पिढीजात उपासक असा स्वत:चा उल्लेख करून वारकऱ्यांना कळकळीचे आवाहन

चंद्रकांत चन्न् यांना प्रकाश देशपांडे स्मृती कुशल संघटक पुरस्कार
नागपूर, १६ मार्च / प्रतिनिधी

ज्येष्ठ पत्रकार दिवंगत प्रकाश देशपांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मानव मंदिरतर्फे देण्यात येणाऱ्या कुशल संघटक पुरस्कारासाठी यंदा ज्येष्ठ चित्रकार आणि बाल चित्रकारांच्या बसोली या चळवळीची सूत्रे गेली साडेतीन दशके सांभाळणारे चंद्रकांत चन्न् यांची निवड करण्यात आली आहे. पुरस्कारात रोख रक्कम, स्मृतीचिन्ह आणि प्रशस्तीपत्राचा समावेश आहे. अत्यंत साक्षेपी पत्रकार असलेले प्रकाश देशपांडे यांनी एक कुशल संघटक म्हणूनही मोलाची कामगिरी बजावली आहे. नागपूर-विदर्भातील अनेक संस्था-संघटनांच्या उभारणीत आणि त्यांना वैभव प्राप्त करून देण्यात एक संघटक म्हणून प्रकाश देशपांडे यांची कामगिरी महत्त्वपूर्ण आहे.

अनीस अहमद यांच्या अटकेची बजरंग दलाची मागणी
पोलिसांवर हल्ला करणाऱ्या आरोपींना अभय

नागपूर, १६ मार्च / प्रतिनिधी

पोलिसांवर हल्ला करणाऱ्या आरोपींवर कारवाई टाळण्यासाठी राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री अनीस अहमद यांनी टाकलेल्या दबावामुळे लोकक्षोभ वाढत असून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी अनीस अहमद यांच्याविरोधात मिरवणूक काढून त्यांच्या अटकेची मागणी केली.
मोतीबाग पुलाजवळ रविवारी सकाळी वाहतूक जाम झाली असताना ती सुरळीत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाचपावली पोलीस ठाण्याच्या दोघा पोलीस शिपायांना जमावाने धक्काबुक्की व मारहाण केली.

रेल्वे प्रवाशांचा उत्साह आटला; अनेक गाडय़ांना सहजी आरक्षण
नागपूर, १६ मार्च / प्रतिनिधी

आर्थिक मंदी, दहशतवादी हल्ला आणि सार्वत्रिक निवडणूक यांचा रेल्वेवर परिणाम झाल्याचे दिसून येते. यंदा एप्रिल ते मे या उन्हाळ्याच्या महिन्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत तिकीट रिझव्‍‌र्हेशनला अल्प प्रतिसाद मिळत आहे. दहावी, बारावी आणि त्याखालील वर्गातील परीक्षा आटोपल्यानंतर सामान्यत: अनेक पालक प्रवासाचा बेत आखतात. त्यामुळे साधारणत: एप्रिलच्या शेवटच्या आठवडय़ापासून जुनच्या दुसऱ्या आठवडय़ापर्यंत रेल्वे तिकीट आरक्षण ‘फुल्ल’ असते.

कलिंगडाला ग्राहकांची पसंती
नागपूर, १६ मार्च / प्रतिनिधी

उन्हाळ्यात इतर फळांच्या तुलनेत कलिंगडाला जास्त मागणी असते. मात्र, मागणीच्या तुलनेत कलिंगडांची आवक गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी आहे. मात्र, पारा वाढल्यानंतर व मागणीत वाढ झाल्यानंतर बाजारात कलिंगडांची आवक वाढण्याची शक्यता बाजारपेठेतील विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे. बाजारात द्राक्षे, संत्री, मोसंबी आदी फळांची आवक सध्या जास्त आहे. शहरात दररोज दोन ट्रक कलिंगडाची आवक होत असून त्यातील काही माल आंध्र प्रदेशातूनही येतो. कलिंगड १५ ते ३५ रुपये प्रति नग असा भाव आहे. गेल्या वर्षी दररोज १० ट्रक भरून कलिंगडाची आवक व्हायची, असे कॉटेनमार्केट मधील विक्रेत्यांनी सांगितले. यामध्ये दोन जातींचा माल येतो. एक नामधारी हा हिरवा पट्टा आहे. तर दुसरा ब्लँक बॉय हा काळा असतो. हा खाण्यासाठी चविष्ट आहे. कलिंगडात ए, बी, डी, एफ, एच ही जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात तसेच यात लोह, तांबे, मँगनीज, पोटॅशिअम, सोडिअम, गंधक, सिल्का ही मानवी शरिराला आवश्यक खनिजेही भरपूर आहेत. कलिंगडामध्ये सुक्रोज, फ्रुक्टोज, ग्लुकोज या तिन्ही प्रकारची नैसर्गिक साखर असते. शहरात विविध छोटय़ा स्टॉल्सवर पाच रुपये प्लेट प्रमाणे कलिंगडची विक्री होत असते. या फळाच्या रसास ग्राहकांची प्रथम पसंती असल्याची माहिती बागवान यांनी दिली. बर्फावर ठेवलेल्या या फळाच्या आकर्षक फोडी ग्राहकांना आकर्षित करतात. इतवारी, महाल, गोकुळपेठ मधील मार्केटमध्ये कलिंगड विक्रीला आले आहेत.

नागपूरच्या ‘सेल्समन’ची अमरावतीत आत्महत्या
नागपूर, १६ मार्च / प्रतिनिधी

नागपूर येथे ‘सेल्समन’ म्हणून काम करणाऱ्या युवकाने आज अमरावती येथील जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहासमोर विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. शैलेश शिवराम पेठे (३०) रा. मानेवाडा रोड नागपूर) असे या युवकाचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही. अमरावतीच्या प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार शैलेश हा रविवारी रात्री एस.टी. बसने अमरावतीत पोहोचला होता. शैलेश हा नागपूर येथील ब्रशन इंडिया लि. या कंपनीत ‘सेल्समन’ म्हणून कामाला होता. कंपनीच्या कामासाठीच तो अमरावतीत पोहोचला होता. आज सकाळी जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहासमोर त्याचा मृतदेह लोकांना दिसला. याची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पंचनामा केला. शैलेशने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याचा कयास आहे. त्याने अमरावतीत येऊन आत्महत्या का केली, हे गूढ कायम आहे.

निवडणूक कामात १४,३८० कर्मचारी
बुलढाणा, १६ मार्च / प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी बुलढाणा लोकसभा मतदारसंघात १४ हजार ३८० कर्मचारी कामाला लागले आहेत. या मतदारसंघात १ लाख ६८ हजार ४६९ मतदार वाढले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी व निवडणूक अधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी दिली.जुन्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील मलकापूर विधानसभा मतदारसंघ हा प्रथमच रावेर लोकसभा मतदारसंघात गेला आहे, तर खामगाव विधानसभा मतदारसंघ बुलढाणा लोकसभा मतदारसंघात आला आहे.बुलढाणा मतदारसंघात कर्मचाऱ्यांची एकूण संख्या १४ हजार ३८० इतकी आहे. त्यात राज्य सरकारचे कर्मचारी १ हजार ९८८, केंद्रीय कर्मचारी ४१०, निमशासकीय कर्मचारी ४ हजार १५३, शिक्षक कर्मचारी ३ हजार ८५९ व इतर ३ हजार ९७० असे एकूण १४ हजार ३८० कर्मचारी राहणार आहेत.

बकरी घरात शिरल्याने जीवघेणी मारामारी
नागपूर, १६ मार्च / प्रतिनिधी

बकरी घरात शिरल्याने गोंधळ उडून दोन कुटुंबात हाणामारी झाल्याची घटना नवीन फुटाळा वस्तीत रविवारी सायंकाळी सव्वापाच वाजताच्या सुमारास घडली. जखमींमध्ये एका पोलीस हवालदाराचाही समावेश आहे. नवीन फुटाळा वस्तीत विष्णू वानखेडे यांच्या शेजारी यादव कुटुंब राहते. वानखेडेंच्या घरात यादवची बकरी शिरल्याने त्यांचा कुत्रा बकरीमागे धावला. त्यामुळे रामदेव यादवने कुत्र्याला दगड मारला. तो दगड शंकर वानखेडे यास लागला असता, पण ते थोडक्यात वाचले. शंकरने रामदेवला हटकले. या कारणावरुन आरोपी जग्गु बंडुराम यादव, रामदेव बुधराम यादव, सीताराम जग्गु यादव, परशुराम यादव, शिवराम यादव, दीपक मुनेश्वर यादव व इतर तीन साथीदार वानखेडेच्या घरासमोर गोळा झाले. तेवढय़ात पोलीस मुख्यालयातील हवालदार विष्णू वानखेडे घरी परतले. ते घरी येताच आरोपींनी त्यांना अश्लील शिवीगाळ करीत विष्णू व त्यांच्या कुटुंबावर काठय़ांनी हल्ला केला. श्रीकांत विष्णू वानखेडे, शंकर वानखेडे, दिनेश चिंतामण रोडके हे गंभीर जखमी झाले. त्यांना मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले. विष्णू वानखेडे यांच्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी जग्गु बंडुराम यादव, रामदेव बुधराम यादव, सीताराम जग्गु यादव, दीपक मुनेश्वर यादव यांना अटक केली. कुत्र्याला दगड मारल्याच्या कारणावरून विष्णू वानखेडे, शंकर वानखेडे, पंकज वानखेडे, हेमंत वानखेडे, सोनू वानखेडे यांनी अश्लील शिवीगाळ आणि मारहाण केल्याची तक्रार यादव यांनी केली. या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

हिंद सेवा आणि हिंद पत्रकारिता पुरस्काराचे शुक्रवारी वितरण
नागपूर, १६ मार्च / प्रतिनिधी

हिंद परिवारातर्फे देण्यात येणारे हिंद सेवा पुरस्कार आणि हिंद पत्रकारिता पुरस्कार शुक्रवारी, २० मार्चला ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांच्या हस्ते वितरीत करण्यात येणार आहे. सायंटिफिक सभागृहात सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य राम शेवाळकर तर, अध्यक्षस्थानी बाळासाहेब देवपुजारी उपस्थित राहणार आहेत. वाघमारे मसाले यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहाच्या सुधारणेसाठी विशेष प्रयत्न केल्याबद्दल तत्कालीन उपमहानिरीक्षक आणि सध्याचे सोलापूरचे पोलीस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय, गायनामधून राष्ट्रीय एकात्मता साधण्यासाठी प्रयत्न करणारे एम.ए. कादर व शेतक ऱ्यांच्या विकासासाठी कार्य करणारे शेतकरी नेते विजय जावंधिया यांना हिंद सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय प्रसार माध्यमात काम करून सर्व सामान्यांच्या प्रश्नाना वाचा फोडणारे पत्रकार बाळ कुळकर्णी, किशोर जामकर, राहुल पांडे, कृष्णकांत तिवारी, राहुल पांडे, संजय तिवारी यांना हिंद पत्रकारिता पुरस्कार देण्यात येणार आहे. कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार एस.एन. विनोद, प्रकाश वाघमारे, नगरसेवक संदीप गवई उद्योजक यशवंत इंगळे उपस्थित राहणार आहेत. पुरस्कार समारंभानंतर बालकलावंताचा अक्षय स्वरधारा हा संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.