Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
नवनीत

जी व न द र्श न
शब्बाथ पालन

 

ज्यू धर्मशास्त्राप्रमाणे शब्बाथचा (म्हणजे शनिवार) दिवस हा परमविश्रांतीचा दिवस असतो. कारण परमेश्वराने सहा दिवसांत विश्वाची निर्मिती केली आणि सातव्या दिवशी विश्रांती घेतली. शब्बाथच्या दिवशी माणसाने विश्रांती घ्यावी. नोकरचाकर आणि गुरेढोरे यांनाही आराम करण्यास वेळ द्यावा, असा मानवतावादी विचार यामागे होता. त्यावरूनच यंत्रयुगात आठवडय़ाच्या सुट्टीचा प्रघात सुरू झाला. त्यासाठीही कामगारांना संघर्ष करावा लागला. उगमापाशी नदी शुद्ध असते, पुढे तिची गटारगंगा होत जाते. अनेक चांगल्या गोष्टींचेही तसेच होते. शब्बाथसंबंधीच्या नियमांचा भंग करणाऱ्या व्यक्तीला देहान्त शासन करावे, असा नियम मोझेसने घालून दिला. एका माणसाने शब्बाथ दिवशी चुलीला लावण्यासाठी लाकडे फोडली म्हणून त्याला धोंडमार करून ठार करण्यात आले. (जुना करार, गणना, १५:३२-३६) येशूने धर्मशास्त्राची पारायणे केली. धर्माच्या नावाने सुचविलेल्या अमानुष शिक्षेची वर्णने वाचताना त्याचे अंग अंग शहारले. त्याच्या कोमल मनाला अपार वेदना झाल्या. करुणेचा कलाम असलेला धर्म क्रौर्याचे हत्यार बनला होता. धर्माच्या नावाने चाललेला अधर्म येशूला मान्य नव्हता. माणुसकीचा गळा घोटणाऱ्या धर्माच्या कालबाह्य़ नियमांना कुणीतरी आव्हान देणे आवश्यक होते; परंतु तसे धाडस करणाऱ्यांसाठी मृत्युदंडाची शिक्षा ठरलेली होती. मृत्यू हा माणसाचा शेवट नसतोच मुळी आणि माणुसकीची जोपासना करणाऱ्या विचारांना मरण नसते याची येशूला पूर्ण खात्री होती. त्यामुळे त्याला कसलीच भीती वाटत नव्हती, मृत्यूची तर नव्हतीच नव्हती. एका शब्बाथ दिवशी येशू आपल्या शिष्यांसह शिवारातून जात होते. भुकेले शिष्य गव्हाच्या ओंब्या तोडून खाऊ लागले. धर्माच्या ठेकेदारांनी त्यांना तसे करताना पाहिले. त्यांनी येशूकडे तक्रार केली, ‘शब्बाथ दिवशी जे करणे निषिद्ध आहे ते तुमचे शिष्य का करतात?’ तेव्हा तो त्यांना म्हणाला, ‘नियम माणसासाठी आहेत, माणूस नियमासाठी नाही.’ निरंकुश नियम माणसाचे स्वातंत्र्य धोक्यात आणीत असतात. नियमांना जेव्हा धर्माचे समर्थन मिळते तेव्हा या धोक्याची तीव्रता वाढते. माणूस आणि त्याची गरज यांना प्राधान्य दिले पाहिजे, अशी भूमिका ख्रिस्ताने घेतली.
फादर फ्रान्सिस दिब्रिटो
francisd43@gmail.com

कु तू ह ल
सौरचक्र

सौरचक्र हे कशाशी संबंधित आहे? ते किती वर्षांचे असते? सौरचक्राचा शोध कोणी लावला?
सौरचक्र हे सूर्याच्या पृष्ठभागावर अधूनमधून दिसणाऱ्या काळय़ा डागांशी -सौरडागांशी- संबंधित आहे. सौरडागांची संख्या ही कमी-जास्त होत असते. मात्र सौरडागांच्या संख्येतील या बदलात एक वारंवारता आढळली आहे. यालाच सौरचक्र असे संबोधले जाते. याचा कालावधी हा अकरा ते साडेअकरा वर्षांचा असतो. जर्मनीतील हौशी खगोल अभ्यासक हाईन्रीश श्वाब याने सूर्यावर दिसणाऱ्या या डागांची रोज निरीक्षणे करून ती नोंदवून ठेवली. आपण केलेल्या १७ वर्षांच्या नोंदीचा अभ्यास करताना त्याला इ.स. १८४३ साली त्यातील वारंवारता लक्षात आली आणि सौरडागांचे एक चक्र असल्याचे स्पष्ट झाले. सौरडागांच्या एका चक्राचा कालावधी हा आज जरी अकरा ते साडेअकरा वर्षांचा असला तरी गेल्या तीनशे वर्षांच्या नोंदींचा आढावा घेतल्यावर हा कालावधी काही वेळा तेरा वर्षांपर्यंत वाढत गेल्याचे आढळून आले आहे. सौरडागांची संख्याही कमाल अवस्थेत काही वेळा दोनशेच्याही पुढे जाते. याउलट किमान अवस्थेत सूर्यबिंबावर काही काळ सौरडागांचा संपूर्ण अभावही आढळलेला आहे. सौरडागांच्या पूर्वीपासूनच्या नोंदी लक्षात घेऊन सौरचक्रांना क्रमांक दिले गेले असून, इ.स. १७५५ ते १७६६ या काळातल्या सौरचक्राला पहिला क्रमांक दिला गेला आहे. इ.स. १९९६ सालच्या ऑक्टोबर महिन्यापासून तेविसावे सौरचक्र सुरू झाले. या वेळी किमान पातळीत असलेली सौरडागांची संख्या त्यानंतर वाढत जाऊन इ.स. २००० सालच्या जुलै महिन्यात ती १७० वर पोहोचली. यानंतर ही संख्या कमीकमी होत गेली आणि इ.स. २००७ सालच्या उत्तरार्धात ती पुन्हा किमान पातळीवर गेली. यानंतर इ.स. २००७ सालच्या शेवटपासून चोविसाव्या सौरचक्रानुसार ही संख्या वाढणे अपेक्षित होते; परंतु तसे झालेले नाही.
श्रीनिवास औंधकर
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दि न वि शे ष
खल्दून

इतिहास लिहिताना जात, पात, धर्म, राष्ट्र न पाहता वास्तवतेवर आधारित, धर्मनिरपेक्ष वृत्तीने लिहावा हे जगाला सर्वप्रथम इब्न खल्दून या इतिहासकाराने सांगितले. त्यांचा जन्म टय़ूनिशियातील टय़ूनिश या प्रांती २७ मे १३३२ रोजी झाला. टय़ूनिश येथे न्यायाधीशाचे काम केल्यावर मोरोक्कोच्या सुलतानाचे ते सचिव झाले; परंतु सुलतानाच्या मर्जीतून उतरल्यावर ग्रॅनेडाच्या सुलतानाकडे ते गेले. पण तेथेही त्यांच्या निष्ठेविषयी शंका उपस्थित झाल्यावर ते आफ्रिकेत गेले. भटकंतीत अशी बरीच वर्षे गेल्याने ते कंटाळले. स्थैर्यता मिळण्यासाठी त्यांनी अल्जेरियातील किल्ल्यात आश्रय घेतला. येथेच त्यांनी ‘मुकद्दिन’ हा ग्रंथ लिहिला. यातून राजकीय व सामान्य जीवनाचे समाजशास्त्र लिहिले आहे. ‘कलात इब्न सलमाह’ हा त्यांचा आणखी एक महत्त्वपूर्ण ग्रंथ. अल-अझर या ऐतिहासिक इस्लामी विद्यापीठातही त्यांनी अध्यापन केले. इजिप्तच्या सुलतानाने त्यांची ककामियाह महाविद्यालयात न्यायशास्त्राचे प्राध्यापक म्हणून नेमणूक केली. यानंतर काही काळ न्यायदानाचेही काम त्यांनी नि:स्पृह वृत्तीने केले. परिणामी न्यायाधीशपद त्यांना गमवावे लागले. यानंतर मक्केची यात्रा, दमास्का, पॅलेस्टाईन या शहरांना त्यांनी भेटी दिल्या. क्रूरकर्मा तैमूरलंगने इजिप्तवर स्वारी केली असता इजिप्तच्या सुलतानाने वाटाघाटीसाठी इब्न खल्दून यांना बरोबर घेतले. हा क्रूरकर्माही त्यांच्या विद्वत्तेपुढे प्रभावित झाला होता. इतिहास हे उत्कर्ष व ऱ्हास यांचा अंत नसलेले चक्र असे ते म्हणत. त्यांच्या इतिहासाच्या योगदानाबद्दल बोलताना रॉबर्ट फ्लिंट हा इतिहासकार म्हणतो,‘‘त्याच्या तोडीचा सैद्धांतिक इतिहासकार अजूनपर्यंत झाला नाही.’’ ‘इतिहासाचे तत्त्वज्ञान’ या संकल्पनेचे जनकत्व त्यांनाच बहाल केले होते. मध्ययुगीन मुस्लिम इतिहासाचा हा चालता-बोलता इतिहासकार १७ मार्च १४०६ रोजी पैगंबरवासी झाला.
संजय शा. वझरेकर

गो ष्ट डॉ ट कॉ म
अथर्वची कॅडबरी आणि किस्ना

नेहमीप्रमाणे कामवाल्याबाई त्यांच्या किस्नाला घेऊन गोखल्यांच्या घरी कामाला गेल्या. बाईंचा मुलगा किस्ना आठ वर्षांचा. म्युनिसिपालिटीच्या शाळेत जाणारा. गोखल्यांच्या अथर्वला तो अजिबात आवडायचा नाही. काळा रंग, चपटं नाक, किडकिडीत अंग.. अथर्वला तो घरात आलेलाही नको वाटायचा. त्याने आपली खेळणी घेतली तर..? पुस्तकांना हात लावला तर..? नवी पुस्तकं खराब केली तर..? अशी भीती त्याला वाटत राहायची. त्याला किस्नाचे जुनाट, कळकट कपडे आवडायचे नाहीत. किस्नाचं बोलणं त्याला गावठी वाटायचं. एकूण काय, किस्ना अगदी त्याच्या डोक्यात जायचा. चौथीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेत अथर्वला गणितात पैकीच्या पैकी मार्क्‍स मिळाले. त्याच्या बाबांनी बक्षीस म्हणून त्याला मोठी कॅडबरी आणून दिली. एवढी मोठी कॅडबरी पाहून किस्नाच्याही तोंडाला पाणी सुटलं. तो अपूर्वाईने कॅडबरीकडे एकटक पाहात होता. अथर्वला अर्थातच आपली कॅडबरी किस्नाला मुळीच द्यायची नव्हती. पण बाबा म्हणाले,‘‘अरे अथर्व, किस्नालाही दे बरं तुझ्यातली कॅडबरी.’’ तोंड वाकडं करत नाईलाजाने त्याने दोन तुकडे किस्नाच्या हातावर ठेवले. त्यानंतर दोनच आठवडय़ांतली गोष्ट. अथर्वला पुन्हा कॅडबरी खावीशी वाटत होती. तो बाबांकडे पुन:पुन्हा कॅडबरी मागत होता. ऑफिसची महत्त्वाची फाईल सापडत नव्हती म्हणून चिडलेल्या बाबांनी, तुला आता कॅडबरी अजिबात मिळणार नाही, असं त्याला सांगितलं आणि ते ऑफिसला निघून गेले. अथर्वच्या हट्टाचा, रडण्याचा त्यांच्यावर काही परिणाम झाला नाही. अथर्व हुंदके देत घरात एका कोपऱ्यात रुसून बसला. त्या दिवशी शाळेला सुट्टी होती म्हणून किस्ना आईबरोबर कामावर आला होता. तो हे सारं पाहात होता. आईचं काम झाल्यावर किस्नानंही कधी नव्हे ते त्याच्या आईकडे कॅडबरी मागितली. आईने दिलेली कॅडबरी हातात घेऊन किस्ना तडक अथर्वच्या घरी आला आणि अर्धी कॅडबरी तोडून त्याने अथर्वच्या समोर धरली. त्याच्या काळय़ाभोर टपोऱ्या डोळय़ांत आनंद होता. प्रेम होते. आपल्यासाठी किस्नाने त्याच्या आईकडे कधी नव्हे ते चॉकलेट मागितले हे अथर्वलाही कळले. आपण खडूसपणा केला, तुसडेपणाने वागलो, किस्ना मोलकरणीचा मुलगा आहे, कळकट आहे, गरीब आहे म्हणून त्याच्याशी मैत्री केली नाही, तरीही चांगुलपणाने वागणारा किस्ना त्याला एकदम आवडून गेला आणि दोघांनीही कॅडबरी एकत्र बसून आनंदात खाल्ली.
समोरच्याचे कपडे, रंगरूप, परिस्थिती यावरून त्याची परीक्षा करू नये. तो मनाने किती चांगला आहे, हे पाहावे. आपली परिस्थिती, आपलं रंगरूप आपल्याही हातात नसतं. पण चांगलं वागणं मात्र नक्कीच आपल्या हातात असतं. आजचा संकल्प- मी नेहमी चांगला वागेन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com