Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९


पनवेल-बदलापूर बस सुरू
पनवेल/प्रतिनिधी

राज्य परिवहन महामंडळाच्या पनवेल-बदलापूर या नव्या बससेवेचा शुभारंभ सोमवारी पनवेल आगारामध्ये झाला. प्रामकृष्ण चौधरी या प्रवाशाला या सेवेचे पहिले तिकीट देण्यात आले. ४२ किलोमीटरचे हे अंतर कापण्यासाठी या गाडीला दीड तास लागणार असून, त्यासाठी प्रवाशांना ३० रुपये मोजावे लागतील.

‘एकलव्य वाल्मिकी सेना समता परिषदेशी संलग्न होणार’
पनवेल/प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्य पातळीवर कार्यरत आदिवासी समाजात लोकप्रिय एकलव्य वाल्मिकी सेना आता समता परिषद या बहुजन विकासासाठी झटणाऱ्या व्यापक संघटनेशी संलग्न होत आहे. छगन भुजबळ यांच्यासह संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक रायगड जिल्हा समता परिषदेच्या संतोषी मोरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.

‘साहेब, तुम्ही खासदार व्हा!’
पनवेल/प्रतिनिधी :
साहेब, तुम्ही मावळ मतदारसंघातून उभे रहा आणि खासदार व्हा, असा हट्ट काँग्रेसचे कार्यकर्ते पनवेलचे नगराध्यक्ष प्रशांत ठाकूर यांना करीत आहेत. ठाकूर यांनी मात्र याबाबत ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’चा पवित्रा घेतल्याचे दिसत आहे. मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर मावळ मतदारसंघ निर्माण झाला असून या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केल्याने काँग्रेसच्या तंबूत नाराजी आहे.
दरम्यान खासदार व्हायचेच, या हेतूने ठाकूर राष्ट्रवादीची कास धरणार असल्याच्या बातम्यांनाही उधाण आले आहे. याबाबत प्रशांत ठाकूर यांच्याशी संपर्क साधला असता, आपण मावळमधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविण्यास इच्छुक आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. निवडणुकीच्या तोंडावर अशा अनेक बातम्या येतात, मात्र येत्या एक-दोन दिवसात सर्व काही स्पष्ट होईल, असे ते म्हणाले. मावळचा मतदारसंघ कोणाला मिळतो, यावर काँग्रेस कार्यकर्त्यांचा हट्ट पूर्ण होतो अथवा नाही हे ठरेल.

बेलापूर किल्ल्याच्या इतिहासावरील धूळ झटकली जाणार
बेलापूर/वार्ताहर :
इतिहासाचा साक्षीदार असलेल्या परंतु अनेक वर्षे दुर्लक्षित असलेल्या बेलापूर किल्ल्याचे जतन व संवर्धन करणे व पर्यटन स्थळ विकसित करणे याबाबतच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रस्ताव व प्रयत्नास यश आले असून, शासनाने त्यास मंजुरी दिली आहे.
नवी मुंबईतील किल्ले गावठाण भागातील बेलापूर किल्ल्याचे जतन आणि संवर्धन करणे व पर्यटन केंद्र विकसित करणे याबाबत आमदार मंदा म्हात्रे यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यानुसार शासनाने विधानसभा व विधान परिषद सदस्यांची समिती स्थापन केली होती. याबाबत आमदार मंदा म्हात्रे यांच्या पाठपुराव्यानुसार सुरेश वरपुडकर, समितीचे सदस्य, जिल्हाधिकारी, ठाणे व नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक यांच्यासह पाच बैठका घेतल्या. त्यानुसार सिडको प्रशासनाने बेलापूर किल्ला संवर्धनासाठी पुण्याच्या शनवारवाडय़ाचे सवंर्धन व जतन करण्याचे काम करणाऱ्या अनुभवी कंपनीस काम देण्याचे निश्चित केले असून, काम पहिल्या टप्प्यात सुमारे २.६ कोटी व दुसऱ्या टप्प्यात सुमारे २.१५ कोटी खर्चाचे करण्यात येणार आहे.