Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

गारपिटीच्या संकटातही शोधली पुढाऱ्यांनी संपर्काची संधी
संदीप तिवारी / वणी

नाशिक जिल्ह्य़ात झालेल्या गारपिटीमुळे द्राक्ष बागायतदारांवर संकट कोसळले असताना लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शेतकऱ्यांवरील हे संकटही आपल्यासाठी फायदेशीर कसे ठरेल, याचा

 

अंदाज घेत राजकीय पुढाऱ्यांनी सोमवारी सकाळपासून बांधा-बांधावर हजेरी लावण्यात धन्यता मानल्याचे दिसून आले. महत्वाची बाब म्हणजे, मतदारसंघाची पुनर्रचना होण्यापूर्वी विधानसभा निवडणुकीत ज्यांनी आपल्याला मतदान केले, ते मतदार या प्रक्रियेत वगळले गेल्यामुळे अशा नुकसानग्रस्तांची साधी भेट घेण्याची तसदीही काही लोकप्रतिनिधींनी घेतली नाही. गारपिटीच्या संकटातही पुढाऱ्यांनी ‘राजकारण’ करण्याचा प्रयत्न केल्याने शेतकऱ्यांमध्ये मात्र त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली.
नाशिकसह दिंडोरी तालुक्याच्या काही भागात रविवारी सायंकाळी गारपिटीसह झालेल्या जोरदार पावसामुळे द्राक्ष उत्पादकांचे कोटय़वधी रूपयांचे नुकसान झाले. तसेच गहू, हरबरा आदी पिकांनाही मोठा फटका बसल्याने हातातोंडाशी आलेला घास पावसाच्या फटकाऱ्याने हिरावून नेला. अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांविषयी ममत्व दाखविण्याची ही एक संधी असल्याची जाणीव निवडणुकीच्या धामधुमीत गर्क असणाऱ्या पुढाऱ्यांना झाली. त्यामुळे त्यांनी सोमवारचा संपूर्ण दिवस जणू नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राखीव ठेवल्याचे पहावयास मिळाले. प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू होण्याआधीच पुढाऱ्यांची लगबग भल्या पहाटेपासून सुरू झाली. मखमलाबाद, दुगांव, गिरणारे, दरी, मातोरी, दिंडोरी तालुक्यातील जुने धागूर, नवे धागूर, देहेरेवाडी, रासेगाव आदी गावात लोकप्रतिनिधी व राजकीय नेत्यांच्या वाहनांचा ताफा संचार करू लागला. त्यामध्ये नाशिकचे माजी महापौर दशरथ पाटील, दिंडोरीचे आ. नरहरी झिरवाळ, पंचायत समितीचे माजी सभापती सदाशिव शेळके, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद पाटील आदींचा समावेश होता.
माजी महापौर पाटील यांनी सायंकाळी पाऊस झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याची विनंती केली होती. ही विनंती मान्य करून जिल्हाधिकारी पी. वेलरासू यांनी मखमलाबाद भागातील शेतीची पाहणी केली. त्यानंतर पाटील यांनी पुढाकार घेऊन स्थानिक शेतकरी व जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक घडवून आणली. नाशिक, दिंडोरी, निफाड व त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या काही भागात पावसामुळे द्राक्ष, कांदा, गहू यांच्यासह भाजीपाला पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले असून याचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देवून दिलासा द्यावा, अशी मागणी पाटील व शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
दुसरीकडे दिंडोरी भागात लोकप्रतिनिधींनी केलेला दौरा तर शेतकऱ्यांसाठी होता की प्रसिद्धीसाठी असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. त्यातही या लोकप्रतिनिधींनी दिंडोरी तालुक्यातील विशिष्ट गारपिटग्रस्त भागाला भेट दिली. परंतु त्याच्यालगत असलेल्या काही गावांना भेट देण्याचे टाळले. यामागे मतदारसंघाची व्याप्ती हे कारण असल्याचे लक्षात येताच स्थानिक शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. ज्या गावांना लोकप्रतिनिधींनी भेट दिली नाही ती गावे मतदारसंघ पुनर्रचनेत नाशिकला जोडली गेल्याने ते इकडे फिरकले नाहीत, असे शल्य शेतकऱ्यांनी बोलून दाखविले. गेल्या निवडणुकीत आम्ही त्यांना मतदान केले असल्याची भावनाही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी बोलून दाखविली. दरम्यान, नुकसानीच्या प्रश्नाविषयी नाशिकच्या पालकमंत्र्यांशी संपर्क साधला असल्याचे आ. नरहरी झिरवाळ यांनी सांगितले. द्राक्ष शेतीसाठी एकरी ८५ हजार ते एक लाख रूपयांपर्यंत खर्च होत असताना शासन केवळ पाच ते दहा हजार रूपयांची मदत करते. तोंडाला पाने पुसण्याचा हा प्रकार असल्याचे सांगत झिरवाळ यांनी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला घरचा आहेर दिला. शासकीय पातळीवर द्राक्षपिकाबाबत उदासिन धोरण अवलंबले जात असल्याचे ते म्हणाले. लोकसभा निवडणूक लक्षात घेत मतदारांना आत्कृष्ट करण्यासाठी पाहणी दौरा व शेतकऱ्यांची आस्थेने चौकशी करण्याकडे बहुतेकांचा कल असल्याचे दिसून आले.