Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

जय हो!
भाऊसाहेब : दोन दिस झाले पंचमीला, पर तुझ्या अंगावरला रंग अजून उतरला न्हाई, भावडय़ा..
भावडय़ा : यंदा रंग जरा जास्तच घट्ट होता अन् डी.जे.च्या तालावर स्वत: ‘भाऊ’ ठेका धरत असल्यानं आणखीनच उत्साहात एकमेकांना रंगवायची चढाओढ लागली होती आमची, म्हणून असेल कदाचित.
भाऊराव : रंगपंचमीला तुम्हा पोरा-टोरांमध्ये येऊन नाचायला वेळ मिळाला म्हणजे तुमच्या भाऊंच्या तिकीटाचं काही खरं नाही वाटतं ?
भावडय़ा : झालं का सुरू तुमचं राजकारणातलं पॉल्टिक्स ? अहो, आमच्यामध्ये ते नेहमी असेच

 

मिसळतात, म्हणून तर आम्ही त्यांच्यासाठी काहीही करायला तयार असतो.
भाऊराव : ते नेहमी कसे मिसळतात अन् तुम्ही काहीही म्हणजे काय करणार रे त्यांच्यासाठी ?
भावडय़ा : कुणाचा काही प्रॉब्लेम झाला तर भाऊ पहिल्यांदा धाऊन जातात, राडा झाला तर पोलीस स्टेशनला, प्रकरण कोर्टात गेलं तर जामीनाची व्यवस्था करायला, कुणाचा वाढदिवस असो त्याची पार्टी भाऊंकडेच असते, कुणाच्या घरी लग्नकार्य असो भाऊ हजर असतात.. मग आम्ही त्यांचा ‘जय हो’ करणारच.
भाऊराव : तू म्हणतोस ते ठीक, ते तुमच्या सुखदु:खाला धाऊन येतात, संपर्क राखतात हेही बरोबर, पण त्या बळावर एकदम खासदारकीची निवडणूक लढवायची म्हणजे..
भावडय़ा : का, तुमचे इतर पुढारी एवढं तरी करतात का, मतदारसंघात कधी दिसतात का, लोकांना भेटतात का ?
भाऊसाहेब : लग्नाला जानं, मौतीला जानं, पोलीस ठान्यातं हजेरी लावनं ही काय खासदाराची काम हायेत, व्हय रे ?
भाऊराव : हेच तर यांना समजत नाही दादा, अरे खासदार म्हणजे देशपातळीवर प्रतिनिधित्व करणारा नेता. त्यानी असं गल्लोगल्ली फिरणं मुळातच अपेक्षित नाही. दिल्लीत बसून आखली जाणारी विविध ध्येयधोरणं, त्याचे आपल्या भागावर होणारे बरे-वाईट परिणाम याचा अभ्यास, त्यामाध्यमातून मतदारसंघाचा विकास हे त्याचं खरं काम. पण..
भावडय़ा : त्याचा आमच्याशी काय संबंध ?
भाऊसाहेब : आरं, भावराव काय सांगतोय त्ये ध्यानात घ्ये, जरा दुसऱ्याचं बी ऐकून घ्येत जा, भावडय़ा.
भाऊराव : आता तुम्ही पण मतदान करणार भावडय़ा, तेव्हा जरा समजून घ्या. केवळ मतदानयंत्रावरची कळ दाबण्यापुरताच आपला मतदानाशी संबंध येतो असं नाही. त्यामुळेच भावनेच्या भरात जाऊन मतदान करून मोकळं व्हायचं नसतं. विशेषत: लोकसभेसारख्या निवडणुकीत मतदान करताना तर राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घेऊन, त्याबाबत विविध पक्षांची ध्येयधोरणं समजावून घेऊन मत द्यायचं असतं.
भाऊसाहेब : खासदार किती गुनाचा असावा, त्ये बी सांग जरा त्याला.
भाऊराव : खरं तर खासदार म्हणजे ‘पॉलिसी मेकर्स’. देशपातळीवरची ध्येयधोरणे ठरविणे, नवीन कायदे तयार करणे, राज्यघटनेतील विविध तरतुदींचा सखोल अभ्यास करणे, संसद अधिवेशनाप्रसंगी चर्चा, सूचना या माध्यमातून आपले मुद्दे प्रभावीपणे मांडणे, केंद्रीय पातळीवरून सोडविण्याजोगे आपल्या मतदारसंघाचे प्रश्न मार्गी लावणे ही खरी खासदाराची कामं. नाहीतर तुम्ही अन् तुमचे नेते.. नगरसेवकांच्या कामांनाच खासदारकीचं लेबल लावण्यात धन्यता मानता.
भावडय़ा : डॅड, उगीच तत्वज्ञानाचे डोस का पाजता ? नगरसेवक असो की खासदार, आम्हाला आपलं सरळ कळतं जो आपल्या कामाला येईल, त्याचा जय हो !
भाऊसाहेब : तुज्यावालं खरं असलं तरी लोकांन्ला त्ये बरं वाटत न्हाई, भावराव. म्हनून हे असचं चालायचं अन् निवडनुका आल्या की साऱ्यांनी एकाच सुरात म्हनायचं जय हो..
पॉलिटिशन
rangeelarangari@gmail.com