Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

‘पायाभूत सुविधांकडे लक्ष देणे आवश्यक’
उत्तर महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासात पायाभूत सुविधांचा अभाव हा सर्वात मोठा अडथळा आहे.

 

गेल्या पाच वर्षांपासून आपण नाशिक-मुंबई महामार्गाच्या चौपदरीकरणाविषयी ऐकतो आहोत. तो पूर्ण व्हायला अजून एक वर्ष लागणार आहे. हवाई सेवा आताशी कुठे सुरू झाली आहे. नाशिकला रेल्वे टर्मिनस नसल्याने कोणतीही गाडी या स्थानकावरून सुटत नाही. विकास प्रक्रियेत अवरोध ठरणारी ही बाब असून त्यामुळे स्थानिक प्रवाशांना मर्यादीत कोटय़ावर विसंबून रहावे लागते. प्रवासी, व्यापारी व उद्योजकांच्या संघटनांनी केलेल्या रेल्वेच्या विविध मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. या सर्व बाबींमुळे भौगोलिक स्थिती आणि हवामान चांगले असूनही नाशिक पर्यटनाच्या क्षेत्रात मागे पडले आहे. स्थानिक खासदाराने या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेतले पाहिजे. पूर्वी नाशिक हे तांब्या-पितळापासून कलात्मक वस्तू निर्मितीचे प्रमुख केंद्र होते. सद्यस्थितीत असे पारंपरिक उद्योग नामशेष होत आहेत. उत्तर महाराष्ट्रात शेतीचा विषयही दुर्लक्षित राहिला. शेतीचा विकास घडवून आणण्यासाठी सिंचन सुविधा म्हणाव्या तशा उपलब्ध झालेल्या नाहीत. सिंचन सुविधेचा अभाव शेतीबरोबर उद्योगावरही परिणाम करणारा ठरतो. सिंचनाच्या प्रश्नाला प्राधान्य देऊन अनेक वर्षांपासून रखडलेले प्रकल्प पूर्णत्वास नेणे गरजेचे आहे. शहरात चार तास तर ग्रामीण भागात १५ तास विजेचा तुटवडा असल्यामुळे शेतीसह उद्योग व व्यापारावर विपरित परिणाम झाला आहे. भारनियमनाच्या समस्येने सर्वच क्षेत्र प्रभावित झाली असून या प्रश्नांवर तोडगा काढण्याचे आव्हान स्थानिक खासदारांसमोर आहे. सध्या देशात गावोगावी अभिमत विद्यापीठांची स्थापना झाली असली तरी नाशिक त्यापासून वंचित राहिले आहे. असे विद्यापीठ नाशिकला झाल्यास शैक्षणिक विकास घडवून आणता येईल. चंदीगड सारख्या छोटय़ा शहराची सुयोग्य नियोजनामुळे शिस्तबद्धपणे वाढ झाली. रेल्वे टर्मिनसमुळे इटारसी सारखे छोटे शहर भारताच्या नकाशावर आले आहे. आज नाशिकरोड स्थानकाबाहेर रिक्षा, बस आणि वाहतूक कोंडीचे दृष्य नित्याचेच दिसते. नियोजनबद्धतेचा अभाव अशा समस्या निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात.
नाशिकचे औद्योगिकरण झाले असले तरी गेल्या दशकभरात त्याची म्हणावी तशी वाढ झालेली नाही. या परिस्थितीत नाशिकच्या कायापालटाची भाषा अजून दहा वर्ष तरी आपण करू शकत नाही. नाशिकच्या खासदाराला मंत्रीपद लाभणे हे आपले स्वप्न राहते की काय अशी स्थिती आहे.
देशात केवळ महाराष्ट्रात जकातीचा प्रश्न व्यापाऱ्यांना भेडसावत आहे. जकातीमुळे ग्राहकांना वस्तू महाग मिळतात. परंतु, या महत्वाच्या विषयावर एकही खासदार काही बोलत नाही. आपल्या शेजारील राज्य ज्या गतीने प्रगती करीत आहे, त्यामुळे भविष्यात आपण आपले अव्वल स्थान टिकवू का, अशी शंका आहे. या सर्वाचा विचार करून स्थानिक खासदाराने प्रत्येक प्रश्नावर पाठपुरावा करणे आवश्यक आहे.
दिग्विजय कपाडिया
उपाध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स