Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

नाशिकमध्ये मत विभागणीचे गणित मांडण्यात पदाधिकारी व्यस्त
नाशिक / प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात सर्वत्र प्रचाराची रणधुमाळी उडविली असताना

 

नाशिक लोकसभा मतदार संघात मात्र उमेदवार निश्चितीवरून अडलेले घोडे लवकर पुढे सरकण्याचे चिन्ह दिसत नसल्याने कार्यकर्त्यांमधील अस्वस्थता अधिकच वाढीस लागली आहे. राष्ट्रवादीचा उमेदवार ठरत नसल्याने शिवसेना उमेदवाराची घोषणाही लांबणीवर पडत आहे. दोन प्रमुख राजकीय पक्षांची उमेदवारी जाहीर होणे बाकी असले तरी या मतदार संघात पंचरंगी लढत अटळ मानली जात असून मत विभागणी कोणत्या उमेदवाराला लाभदायक ठरेल, याचे गणित मांडण्यात इच्छुक उमेदवार व त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी व्यस्त आहेत.
राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्यातील जागा वाटपाची बोलणी अंतिम टप्प्यात असताना दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांना आव्हान देणेही सुरू केल्याने कार्यकर्ते संभ्रमित आहे. आघाडी होईल की नाही, हा प्रश्न दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून विचारला जात आहे. आघाडीचा घोळ जितके दिवस चालेल तितके दिवस दोन्ही बाजूंकडून उमेदवारांची यादी जाहीर होणेही लांबणीवर पडणार आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात पडद्यामागे सुरू असलेल्या घडामोडींचा परिणाम प्रचार मोहिमांमध्येही दिसू लागला आहे.
राष्ट्रवादीकडून शिवसेनेऐवजी भाजप तर शिवसेनेकडून राष्ट्रवादीऐवजी काँग्रेसला लक्ष्य करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत नाशिकमध्ये शिवसेना विरूध्द राष्ट्रवादी अशी लढत होणार असल्याने प्रचारादरम्यान दोन्ही बाजू एकमेकांविरूध्द आरोप करतील काय, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. परिस्थितीने ‘नाजूक’ वळण घेतले असल्याने नेहमीच्या प्रचार तंत्रापेक्षा वेगळीच व्यूहरचना आखण्यास दोन्ही पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना भाग पडत आहे.
युती व आघाडीकडून उमेदवार जाहीर होण्यास लागणाऱ्या वेळेचा सदुपयोग आता पदाधिकाऱ्यांकडून पंचरंगी लढतीत मत विभागणी कशीकशी होऊ शकते, याचे गणित मांडण्यात करण्यात येत आहे. मतदार संघातील कोणत्या गावात कोणत्या समाजाचे किती मतदार आहेत, याची पडताळणी होऊ लागली असून एकाच समाजाचे अनेक उमेदवार उभे राहिल्यास कोणाला फटका बसू शकतो, याविषयी बैठकांमध्ये गांभिर्याने चर्चा रंगू लागली आहे. बसपकडून महंत सुधीरदास रिंगणात उतरले असताना जय बाबाजी भक्त परिवारचे मौनगिरी महाराज यांनीही खरोखर नाशिकमधून उमेदवारी केल्यास या संत, महंतांची उमेदवारी कोणाला घातक ठरू शकतो, याचा अंदाज बांधणेही सुरू झाले आहे.