Leading International Marathi News Daily
मंगळवार, १७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

पतसंस्था ठेवीदार कृती समितीचा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा
जळगाव / वार्ताहर

लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर जळगाव जिल्ह्य़ातील पतसंस्थांच्या ठेवीदार कृती समिती आणि चाळीसगाव तालुक्यातील नामसवाडीच्या ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जाहीर केला आहे. निवडणुकी आधी आणि नंतरही केवळ आश्वासनेच मिळतात, अशी

 

संबंधितांची तक्रार आहे.
जिल्ह्यातील डबघाईस आलेल्या तसेच गैरव्यवहार आणि अपहार झालेल्या अनेक सहकारी पतसंस्थांत हजारो ठेवीदारांचे कोटय़वधी रुपये अडकून पडले आहेत. पैसे परत न मिळविण्यासाठी ठेवीदारांनी कृती समिती स्थापन केली असून त्या माध्यमातून विविध आंदोलने करण्यात येत आहेत, पण ठेवीदारांच्या पदरी निराशाच आहे. राजकीय पक्ष व नेत्यांशी हितसंबंध असणाऱ्या संस्था चालकांवर ठोस कारवाई केली जात नाही व सहकार मंत्रालय तसेच विभागाकडून न्याय मिळत नसल्याने ठेवीदार कृती समितीने लोकसभा निवडणूक मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
चाळीसगाव तालुक्यातील तामसवाडी गावातील सरपंच, उप सरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांनी रस्ता दुरूस्तीची मागणी करीत मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे. तामसवाडी चाळीसगाव तालुक्याच्या शेवटच्या भागात आहे. कित्येक वर्षांपासून पिलखोड ते तामसवाडी या तीन किलोमीटर रस्त्याची बिकट अवस्था असून दुचाकी वाहन चालविणेही कठीण असल्याचे सरपंच कविता पाटील व उपसरपंच रमेश पाटील यांनी म्हटले आहे. खराब रस्त्यांमुळे तामसवाडीपर्यंत ही बस सेवा नाही. पिलखोड गावापर्यंत लोकांना पायीच जावे लागते. आजारी माणसाला दवाखान्यात नेण्यासाठी सुविधा नसल्याने तामसवाडीच्या ग्रामस्थांनी लोक प्रतिनिधींना धडा शिकविण्याच्या उद्देशाने मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे.
अतिक्रमण हटाव मोहिमेचा वाद
महापालिका प्रशासनाने शहरात विशेष अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे. या कारवाईचे शहरातून स्वागत केले जात असतानाच ही मोहीम बाजार फी वसुलीच्या वादातून असल्याची चर्चा सुरू झाली आहे. जळगाव शहरात मोठय़ा प्रमाणात वाढलेल्या अतिक्रमणामुळे व त्यामुळे होणाऱ्या वाहतुक समस्येबद्दल तक्रारी होऊ लागल्या होत्या. शहराचे सर्व प्रमुख रस्ते व चौकातील वाढलेल्या अतिक्रमणास महापालिका अतिक्रमण विभाग तसेच प्रशासनातील काही अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप झाल्यानंतर महानगर आघाडीचे ज्येष्ठ नगरसेवक नरेंद्र पाटील यांनी अतिक्रमण प्रश्नी विशेष महासभेची मागणी केली.
महापालिका आयुक्तांनी आरोप आणि तक्रारींची दखल घेत विशेष अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली. यात महापालिका अभियंत्यासह अनेक अधिकाऱ्यांची पथके निर्माण करण्यात आली आहेत. या कारवाईत शहरातील पाचशेवर अतिक्रमण धारकांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांना २४ तासांची मुदत देण्यात आली असून अतिक्रमण काढून घ्या अन्यथा आम्ही काढू अशा सूचना देण्यात आल्या आहेत. कारवाई अंतर्गत साने गुरूजी चौक, टॉवर चौक, घाणेकर चौक, सेंट्रल फुले मार्केट, गांधी मार्केट, अजिंठा चौक, बस स्टँड परिसर मोकळा करण्यात आला आहे.
दरम्यान, दैनिक बाजार फी वसुलीच्या मक्तया करून दोन ज्येष्ठ नगरसेवकात वाद झाल्याने मक्ता घेतलेल्या गटाच्या वसुलीवर परिणाम व्हावा म्हणून ही मोहीम राबविण्यात येत असल्याची चर्चा आहे. अतिक्रमण हटाव मोहिमेच्या विरोधात हॉकर्स व टपरीधारक संघटनेने बंद पाळून सोमवारी महापालिकेवर मोर्चा नेला. पर्यायी जागा द्या, अशी प्रमुख मागणी त्यांनी केली आहे. दुसरीकडे ही कारवाई अशीच सुरू ठेवावी अशी शहरातील नागरिकांची मागणी आहे.